आता गेले आमदार कुणीकडे? तिपटीने वाढतायत कोरोनाबाधित..तरीही चुप्पी? 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

रमजानच्या कालावधीत मालेगावात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख सर्वांच्याच पाया खालची वाळू घसरविणारा होता. त्या वेळी मालेगावमधून नाशिकमध्ये येणाऱ्या कोरोनाबाधितांवर बंदी घाला, अशी मागणी करणाऱ्या नाशिकच्या महौपारांसह भारतीय जनता पक्षाच्या तिन्ही आमदारांनी आता नाशिकमध्ये मालेगावपेक्षा तिपटीने वेग वाढत असताना चुप्पी का साधली? असा सवाल उपस्थित होत आहे. 

नाशिक : रमजानच्या कालावधीत मालेगावात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख सर्वांच्याच पाया खालची वाळू घसरविणारा होता. त्या वेळी मालेगावमधून नाशिकमध्ये येणाऱ्या कोरोनाबाधितांवर बंदी घाला, अशी मागणी करणाऱ्या नाशिकच्या महौपारांसह भारतीय जनता पक्षाच्या तिन्ही आमदारांनी आता नाशिकमध्ये मालेगावपेक्षा तिपटीने वेग वाढत असताना चुप्पी का साधली? असा सवाल उपस्थित होत आहे. 

आता गेले आमदार कुणीकडे? 
मार्चमध्ये पहिला लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती फारशी गंभीर नव्हती. परंतु एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून नाशिक शहरासह मालेगावात रुग्णांची संख्या वाढत गेली. नाशिकमध्ये ज्यावेळी एक, दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते, त्या वेळी मालेगावची आकडेवारी बारा ते पंधरापर्यंत होती. नाशिकपेक्षा पाच ते सहापटीने मालेगावचे रुग्ण आढळून येत होते. मालेगावच्या रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयामधील लॅबमध्ये येत होते. तर बहुतांश नातेवाईक नाशिकमध्ये वास्तव्याला असल्याने सुरक्षितता म्हणून मालेगावचे नागरिक नाशिकमध्ये येत होते. मालेगावचा कोरोना पॉझिटिव्ह आकडा वाढत असताना पंचवटी विभागातील आमदार ऍड. राहुल ढिकले यांनी सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मालेगावच्या नागरिकांना आवरा, अशी मागणी केली होती.

मालेगावपेक्षा तिपटीने कोरोनाबाधित वाढत असताना चुप्पी 
त्यापाठोपाठ महापौर सतीश कुलकर्णी यांनी, तर "सीआरपीएफ'ची तुकडी तैनात करण्याची मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली होती. आमदार प्रा. देवयानी फरांदे व सीमा हिरे यांनीदेखील मालेगावकरांना रोखण्याची मागणी केली होती. आमदार हिरे मालेगाव तालुक्‍यातील सूनबाई असल्याचा उल्लेख करत मालेगावमधून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरून टीका झाली होती. त्यात पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील विरोधकांचादेखील समावेश होता. धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनीदेखील मालेगावकरांना धुळ्यात येण्यास मज्जाव करण्याची मागणी केली होती. मालेगावकरांना नाकारणे म्हणजे माणुसकीचा खून असल्याची भावना व्यक्त करत कृषिमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या कार्यालयासमोरील मारुती मंदिरात एक दिवसाचा आत्मक्‍लेश केला होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मालेगावकरांना रोखण्याची मागणी केली होती. कोरोनावरून मालेगावकरांना विरोध व समर्थनार्थ असा राजकीय सामना काही काळ रंगला. त्यानंतर महामार्गावर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करून राजकीय नेत्यांची मागणी पूर्ण करण्यात आली. 

हेही वाचा > भीतीदायक! दोघींना पकडून अंधारात खेचत नेले...भय इथले कधी संपणार?..

आता नाशिककरांचे काय? 
मेअखेरपर्यंत सुरक्षित असलेल्या नाशिकमध्ये मात्र आता कोरोनाचा विस्फोट झाला आहे. 7 जूनला शहरात सर्वाधिक 61 रुग्ण आढळल्यानंतर सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 427 पर्यंत पोचला. जूनमधील आकडेवारीचा विचार करता मालेगावपेक्षा तिप्पट वेगाने रुग्ण आढळत असल्याने आतापर्यंत मालेगावकडे बोट दाखवून तेथील नागरिकांना मज्जाव करणाऱ्या नाशिककरांच्या पाया खालची वाळू घसरली आहे. आतापर्यंत शहरात तब्बल 72 कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले. त्यापैकी 32 झोन बंद करण्यात आले असले तरी 25 टक्के शहर कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा > वाहनांची वर्दळ कमी..तरीही जाताएत इतके जीव? दुष्टचक्र कधी संपणार?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: silence of MLAs while the corona is growing more than Malegaon nashik marathi news