नाशिकमध्ये स्मार्टसिटी उपक्रमाची वाताहत; ५४१ शेअरिंग सायकली गंजत 

विक्रांत मते
Tuesday, 13 October 2020

हिरो सायकल्स व यूऑन टेक्‍नॉलॉजीतर्फे स्मार्टसिटी कंपनीने २०१८ मध्ये पब्लिक बायसिकल शेअरिंग उपक्रमाचे उद्‍घाटन केले. सुरवातीला दहा डॉक स्टेशनवर शंभर सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या.

नाशिक : स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून कुठलेही ठोस काम झाले नाहीच; परंतु सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांचे भवितव्यसुद्धा अधांतरी आहेत. काही प्रकल्प वाजतगाजत सुरू करण्यात आले. शहरात त्या प्रकल्पांचा बोजवारा उडाला असून, यात सायकल शेअरिंग प्रकल्पाची दोन वर्षांतच वाताहत झाली आहे. या उपक्रमात मोफत प्राप्त झालेल्या ५४१ सायकली ओझर जकात नाक्यावर गंजत पडल्याची बाब समोर आल्याने स्मार्ट कंपनीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

सायकली  गंजलेल्या अवस्थेत पडून

हिरो सायकल्स व यूऑन टेक्‍नॉलॉजीतर्फे स्मार्टसिटी कंपनीने २०१८ मध्ये पब्लिक बायसिकल शेअरिंग उपक्रमाचे उद्‍घाटन केले. सुरवातीला दहा डॉक स्टेशनवर शंभर सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या. वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने हिरो सायकल कंपनीने शहरात शंभरहून अधिक डॉक स्टेशन उभारत तब्बल एक हजार सायकल उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे हरित, स्वच्छ नाशिकच्या संकल्पनेला चालना मिळाल्याचा आनंद नाशिककरांकडून व्यक्त केला गेला. जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम व ॲपच्या माध्यमातून सायकल वापरणाऱ्यांकडून कंपनीकडून शुल्क वसूल करण्यात आले. प्रकल्प सुरू झाल्यानंतर काही दिवस नागरिकांना सायकलींचे आकर्षण होते. नंतर हळूहळू सायकली गायब होऊ लागल्या. उपक्रम सुरू होण्यापूर्वी हिरो व यूऑन कंपनीकडून साडेतेरा लाख रुपये अनामत रक्‍कम घेण्यात आली होती. त्यानंतर कोटक महिंद्र बॅंकेकडून बॅंक गॅरंटी घेण्यात आली होती. या तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करत स्मार्टसिटी कंपनीने प्रकल्पाची वाताहत केली. सध्या शहराच्या विविध ठिकाणांहून जमा करण्यात आलेल्या सायकली ओझर जकात नाक्यावर गंजलेल्या अवस्थेत पडून आहेत. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

जाहिरातीची परवानगी नाकारली 

हिरो यूऑन कंपनीकडून सायकलींसाठी डॉक स्टेशन उभारताना त्यावर जाहिरात करण्याची परवानगी मागण्यात आली होती. परंतु स्मार्टसिटी कंपनीकडून जाहिरातींसाठी परवानगी नाकारण्यात आल्याची बाब लपवून ठेवत सायकल शेअरिंग उपक्रमाला प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देत प्रकल्प गुंडाळण्यात आल्याचे बोलले जात आहे.  

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart city project bicycles are rusting in Nashik marathi news