सोयाबीनमुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी गोड; पालखेडमध्ये प्रतिक्विंटल ४ हजार २०० भाव

soybean price
soybean price

नाशिक/पिंपळगाव बसवंत : अतिवृष्टीने अनेक पिके शेतात कुजली; पण या संकटामुळे त्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनने मात्र दिलासा दिला. कधी नव्हे ते सोयाबीनला पालखेडमध्ये चार हजार २०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळू लागला आहे. पालखेड उपबाजारात दीड महिन्यात २२ हजार क्विंटल सोयाबीनच्या विक्रीतून शेतकऱ्यांना नऊ कोटी रुपये मिळाले. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. 

सोयाबीनने शेतकऱ्यांना आर्थिक आधार

प्रत्येक वर्षी सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळतो. व्यापारी सोयाबीनची आर्द्रता तपासून त्यानुसार दर देतात. यंदा सोयाबीन काढणीच्या तोंडावर झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी सोयाबीनचे नुकसान झाले. पण पावसाळ्यापूर्वी काढणी झालेल्या सोयाबीनला सध्या चांगला दर मिळू लागला आहे, तर ज्यांची उशिरा काढणी झाली, त्यांचे सोयाबीन चांगल्या प्रतीचे आहे. त्यामुळे सोयाबीनने शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला आहे. सोयाबीनला शासनाने तीन हजार ८८० रुपये हमीभाव दिला आहे. पण सुरवातीला हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. कोरोनामुळे यंदा निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक पुरता पिचला. टोमॅटोसह भाजीपाला पिकाने शेतकऱ्यांना आधार दिला. सध्या पालखेड, लासलगाव, मनमाड, विंचूर बाजारपेठेत चार हजार १०० ते चार हजार २०० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे दरवाढीच्या अपेक्षेने साठवून ठेवलेला सोयाबीन आता विक्रीसाठी शेतकऱ्याने बाजारात आणला आहे. 

यंदाच्या हंगामाची सुरवात तीन हजार ५०० दराने

तीस वर्षांपूर्वी झणझणीत मिरचीची बाजारपेठ, अशी उत्तर महाराष्ट्रात ख्याती असलेल्या पालखेडची बाजारपेठ आता सोयाबीन, मका यासाठी प्रसिद्ध आहे. दहा वर्षांपासून पालखेड उपबाजारात जिल्हाभरात सोयाबीन विक्रीसाठी येतो. यंदा तर उत्पादन कमी असूनही तुलनेत आवक मात्र प्रचंड वाढली आहे. गतवर्षी संपूर्ण हंगामात १३ हजार क्विंटल आवक झाली. यंदा मात्र एकट्या ऑक्टोबरमध्ये तेवढी आवक झाली. गतवर्षी दरात मोठे चढ-उतार झाले; पण सरासरी दर तीन हजार ३०० रुपये क्विंटलच्या पुढे सरकले नाहीत. यंदाच्या हंगामाची सुरवात तीन हजार ५०० रुपये दराने झाली. पण नंतर मागणी वाढल्याने दर चार हजार २०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत झेपावले. निफाड तालुक्यात यंदा सोयाबीन पेरणीक्षेत्रात वाढी झाली होती. तब्बल १९ हजार हेक्टरवर सोयाबीन घेतले गेले. एकरी सरासरी सात ते आठ क्विंटलचे उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे यंदा एकट्या निफाडमध्ये दोन लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन अपेक्षित आहे. सोयाबीनचा वापर खाद्यतेल, जनावरांचे खाद्य आदींसाठी होतो. 

पाच एकरवर सोयाबीनची पेरणी केली होती. अतिवृष्टीत झालेले काहीसे नुकसान वगळता सोयाबीनचे दर्जेदार पीक आले. चार हजार २०० रुपये प्रतिक्विंटल असा आकर्षक दर मिळाल्याने आम्हाला संकटात आधार मिळाला आहे. 
- संदीप शिंदे (शेतकरी, पालखेड) 

नाशिक जिल्ह्यात आवक वाढलेली असली तरी मध्य प्रदेश, अमेरिका येथे पावसामुळे सोयाबीन पीक जमीनदोस्त झाले. गुजरात, मुंबई, पुणे, धुळे यांसह एक्स्पोर्टला मागणी वाढल्याने दरात उसळी आली आहे. ही तेजी कायम राहू शकते. 
- मंगेश छाजेड (व्यापारी, पालखेड) 

वीस वर्षांपूर्वी अडगळीत पडलेल्या पालखेड उपबाजारात भुसार मालाचे लिलाव सुरू केले. रोख पेमेंट, चोख वजन यांसह शेतकरी व व्यापाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे भुसार माल विक्रीसाठी शेतकरी पालखेडला पसंती देत आहेत. 
- आमदार दिलीप बनकर (सभापती, बाजार समिती, पिंपळगाव बसवंत) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com