कोरोनाच्या तपासणीसाठी १ लाख ॲन्टिजेन किटची खरेदी; तर कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा

Rapid test1
Rapid test1

नाशिक : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेतर्फे शहरात मोठ्या प्रमाणात रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट सुरू आहेत. किटची कमतरता भासत असल्याने एक लाख किट खरेदीस स्थायी समितीने मान्यता दिली. त्याचबरोबर महापालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा उतरविला जाणार असून, यात उपचारासाठी पाच लाख, तर मृत्यू झाल्यास ५० लाख रुपये नातेवाइकांना मिळणार आहेत.

स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची ऑनलाइन सभा झाली. सर्वप्रथम प्रभाग २५ चे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी रॅपिड ॲन्टिजेन किटच्या तपासणीतून कोरोनाबाधित रुग्ण समोर येत असून, त्यामुळे तत्काळ उपचार करण्यास मदत होत असल्याचे सांगितले. आरोग्य शिबिरात तपासणी किट मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. नगरसेविका वर्षा भालेराव यांनी किटमुळे कोरोनाचे निदान लवकर होत असल्याचे समर्थन केल्याने सभापती गिते यांनी एक लाख रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट खरेदीला मान्यता दिली. चार कोटी ७२ लाख ५० हजार रुपये त्यासाठी खर्च केले जाणार आहेत. जवळपास चार कोटी ७२ लाख ५० हजार मंजूर रकमेपैकी यापूर्वी दोन कोटी २६ लाखांची किट खरेदी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्यांच्या अधिकारात केली आहे. एक तपासणी किट ५०४ रुपयांत खरेदी केले जाणार आहे. गांधीनगर वसाहतीत महापालिकेच्या शाळा भरतात, त्या शाळाखोल्यांचे भाडे देण्याच्या प्रस्ताव रोखण्यात आला.

शाळा नसताना कोट्यवधींचा खर्च
कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शासनाने मान्यता दिली तरी साधारण डिसेंबरमध्ये शाळा सुरू होतील. त्यानंतरही शाळांमध्ये किती विद्यार्थी येतील, याबाबत अंदाज नसताना स्थायी समितीने विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव देण्याच्या नावाखाली क्रीडा स्पर्धा, पारितोषिक, इव्हेंट मॅनेजमेंट, गणवेश खरेदीसाठी ३६ लाखांच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन भविष्यातील खर्चाची केलेली तरतूद चर्चेचा विषय ठरली. राष्ट्रवादीच्या सदस्या समिना मेमन यांनी विषयांना केलेला विरोध मोडीत काढत सभापती गिते यांनी मान्यता दिली.

मृत्यू प्रकरणाचा अहवाल स्थायीवर
सिडकोतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाच्या मृत्यूनंतर वाद होऊन डॉक्टरांना मारहाण केली होती. याविरोधात अंबड पोलिसांत तक्रार दाखल झाली असताना स्थायीमध्ये या प्रकारणात गुन्हा दाखल असलेले हेमंत शेट्टी यांनी चुकीच्या पद्धतीने उपचार झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याने चौकशीचा अहवाल स्थायी समितीवर ठेवण्याची मागणी केली. त्यानुसार पुढील आठवड्यात अहवाल ठेवला जाणार आहे.

संपादन : रमेश चौधरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com