
साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारास ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचे नाव द्यावे. साहित्य संमेलनात सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन तसेच व्यासपीठावर प्रतिमा असावी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असा ठराव संमेलनात सर्वानुमते मांडावा.
नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मांडावा, अशी मागणी संस्कार भारती संस्थेने केली आहे. यासंदर्भात संस्थेच्या नाशिक महानगर कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी संमेलनाच्या कार्यालयाच्या ठिकाणी लोकहितवादी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत याबाबत निवेदन दिले. निवेदनात विविध मागण्या केल्या आहेत.
नाशिक आणि विनायक दामोदर सावरकर हे अजोड नाते
संस्कार भारतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही साहित्य मेजवानी रसिकांना सृजनशील आनंद मिळणार आहे. कुसुमाग्रज, वसंत कानेटकर आणि त्याचबरोबर सावरकारांच्या सर्वांग सुंदर साहित्याने समृद्ध नाशिककरांचे मन नव्या साहित्याचे स्वागत करायला सज्ज आहे. नाशिक आणि विनायक दामोदर सावरकर हे अजोड नाते आहे. तसेच सावरकर आणि साहित्य हेही तसेच समीकरण आहे. त्यांच्या कथा, कविता, नाटक तरुण पिढीला सदैव मार्गदर्शक ठरतील. त्यांच्या साहित्याने भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात मोलाची कामगिरी बजावली आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात घेता, कलेच्या माध्यमातून संस्कार साधणाऱ्या संस्कार भारतीतर्फे सूचना व प्रस्ताव ठेवत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या
सूचना, प्रस्ताव असे
साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारास ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचे नाव द्यावे. साहित्य संमेलनात सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन तसेच व्यासपीठावर प्रतिमा असावी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असा ठराव संमेलनात सर्वानुमते मांडावा. सावरकरांचे साहित्य जनमाणसात पोचेल, यासाठी विशेष स्टॉलची उभारणी आयोजकांनी करावी. उत्तर महाराष्ट्रातील लेखक, कवी, कवयित्री, साहित्यिकांचे परिसंवादपर सत्र घ्यावे, अशा विविध सूचना, प्रस्ताव मांडले आहेत.
हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच
पत्रकार परिषदेनंतर शिष्टमंडळाची भेट
स्वागताध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यासाठी सोमवारी (ता.२५) झालेल्या पत्रकार परिषदेनंतर शिष्टमंडळाने भेट घेत माजी आमदार हेमंत टकले व जयप्रकाश जातेगावकर यांना निवेदन दिले. संस्थेचे अखिल भारतीय सहकोशप्रमुख रवींद्र बेडेकर, महानगराध्यक्षा स्वाती राजवाडे, महानगर सचिव मेघना बेडेकर, साहित्य विधीप्रमुख नीता देशकर, सहप्रमुख सोनाली तेलंग उपस्थित होत्या.