esakal | राज्यातील महाविकास आघाडीची निफाडमध्ये मात्र बिघाडी!
sakal

बोलून बातमी शोधा

2Dilip_20Bankar_20_20Anil_20Kadam.jpg

गेली तीन - चार महिन्यांपासुन सुरू असलेल्या श्रेयवाद व जुगलबंदीतुन ते अधोरेखित झाले. त्यामुळे पंचायत समिती पदाधिकारी निवडीत शिवसेनेचे सुत राष्ट्रवादीशी जुळणे अशक्यच होते. निफाड राजकारणात महाविकास आघाडीची बिघाडी असली तरी शिवसेनेने पुरेसे संख्याबळ असतांना भाजपाशी सुर मिळविल्याने अनेकांची बोट तोंडात गेली आहे.

राज्यातील महाविकास आघाडीची निफाडमध्ये मात्र बिघाडी!

sakal_logo
By
दिपक आहिरे

नाशिक : (पिंपळगाव बसवंत) आश्‍चर्यकारकरित्या राज्यात आकाराला आलेल्या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचा फॉर्म्युला संवेदनशील निफाडच्या राजकारणात पाझरण्याची चिन्ह नव्हतीच...त्याला कारण म्हणजे आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांच्यातील राजकीय हाडवैर आहे. गेली तीन - चार महिन्यांपासुन सुरू असलेल्या श्रेयवाद व जुगलबंदीतुन ते अधोरेखित झाले. 

कलगीतुरा रंगणार हे निश्‍चीत होतेच...

निफाड राजकारणात महाविकास आघाडीची बिघाडी असली तरी शिवसेनेने पुरेसे संख्याबळ असतांना भाजपाशी सुर मिळविल्याने अनेकांची बोट तोंडात गेली आहे. निफाड मतदारसंघात गटा-तटा बरोबरच पक्षीय राजकारणाचा रंग आहे. वर्षभरापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल कदम यांचा दे धक्का पराभव. आमदार दिलीप बनकर यांना मिळालेले राजकीय गतवैभव यामुळे निफाडच्या राजकारणाचा नुरच पालटला. पण दोघांची खरी गोची झाली ती राज्यात आकाराला आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेस या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीने. बनकर व कदम हे दोघेही सत्ताधारी गटाचे असल्याने विकासकामाचे श्रेयवाद व त्यातुन कलगीतुरा रंगणार हे निश्‍चीत होते.

राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्रश्‍न उरला नाही...

विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा बनवत आमदार पदाला गवसणी घालणार्या दिलीप बनकर यांना रासाका, निसाकावरून अनिल कदम यांनी घेरले. आमदार बनकर यांनी लगबगीने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, शासनस्तरावरून हालचाली करून शब्दपुर्तीसाठी हालचाली केल्या. त्यापाठोपाठ पिंपळगांवच्या ग्रामीण रूग्णालयावरून श्रेयवाद रंगला. हे शाब्दीक युध्द व संधी मिळेल तेथे परस्परांचे खच्चीकरणाचे प्रयोग पाहता महाविकास आघाडीचे राजकारण निफाडमध्ये बाळसं धरूच शकणार नव्हती. त्यामुळे पंचायत समिती पदाधिकारी निवडीत माजी आमदार कदम हे आमदार बनकर यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्रश्‍न उरला नाही.

हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा

भाजपला सोबत घेतल यात मात्र आश्‍चर्य...

राज्यात शिवसेनेसह दोन्ही कॉग्रेसचा मुख्य राजकीय शत्रु भाजपा आहे. त्यात नुकतीच विरोधीपक्ष नेते देवेद्र फडणवीस व खासदार संजय राऊत यांच्यात झालेली बैठक राज्यात सत्तांतराचे वारे वाहु लागले. त्यात निफाड सारख्या राज्याचे लक्ष वेधणाऱ्या संवदेशील मतदारसंघातील राजकारणाच्या घटनाचे पडसाद उमटतातच. माजी आमदार कदम यांच्याकडे बहुमतासाठी पुरेसे 10 सदस्यांचे संख्याबळ असतांना त्यांनी भाजपाच्या संजय शेवाळे यांना पंचायत समितीच्या उपसभापतीची संधी देत अनेकांना धक्का दिला. राजकीय माहीर असलेल्या कदम यांनी ही चाल खेळण्यामागे काही हेतु दडले आहेत.

भरलेले इंजीन अन् रिकामे डबे अशी अवस्था

विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या काही नेत्यांनी अनिल कदम यांच्या पाठीत खंजीर खुपसला तर काहींनी प्रामाणिक साथ दिली. खंबीर पाठराखण करणाऱ्या नेत्यांची जाणीव असल्याचे संकेत कदम यांनी या निवडीतुन दिले. दीड वर्षावर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राज्यात काहीही घडो राष्ट्रवादीसोबत शिवसेनेची निफाड तालुक्यात युती नाही असा संदेश ही दिला. अर्थात निफाड मतदारसंघात भाजपाची अवस्था अगदीच तोळामासाची आहे. आता तर प्रत्येक तालुक्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये दुफळी झाल्याचे फुसक्या आंदोलनात दिसुन आले. भरलेले इंजीन अन् रिकामे डबे अशी अवस्था आहे. त्यामुळे भाजपला उपसभापती पद ही लॉट्रीच म्हणावी लागेल.

हेही वाचा > विवाह प्रमाणपत्र काढण्यास पतीचा वारंवार नकार; पत्नीला मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा

संपादन - किशोरी वाघ