पार्थ कदमची गरुड झेप! ‘नीट’ परिक्षेत उत्तर महाराष्ट्रातून पटकविला पहिला क्रमांक

अरुण मलाणी
Sunday, 18 October 2020

वैष्णवी दहावीलाही पहिल्या पाच क्रमांकांत उत्तीर्ण झाली होती. बारावीलाही तिने विशेष गुण मिळविले. तेव्हा तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबात असल्याने आपल्या कुटुंबाला एमबीबीएस डॉक्टर होऊन आधार देण्याचा मानस वैष्णवीने बोलून दाखविला.

नाशिक : नॅशनल इलिजिब्‍लिटी कम एंट्रान्‍स टेस्‍ट (नीट) २०२० या परीक्षेत नाशिकच्‍या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. या राष्ट्रीय क्रमवारीत क्रमांक पटकावताना नामांकित इन्‍स्‍टिट्यूटमध्ये प्रवेशाचे स्‍वप्‍न विद्यार्थ्यांनी पूर्ण केले आहे. 

विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश

नीट परीक्षेत पार्थ कदम याने ७०५ गुण मिळवताना राष्ट्रीय क्रमवारीत ४५ वा क्रमांक पटकावला. त्‍याने महाराष्ट्रातून तृतीय, तर उत्तर महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला. राज सुराणा याने ६९१ गुणांसह चांगली कामगिरी केली. सोहम करंदीकर ९९.८१९ पर्सेंटाईल गुणांसह राष्ट्रीय क्रमवारीत दोन हजार ४४७ वा आला. वैष्णवी जाधव (६०६), आदिती जगताप (५९९), पुरुषोत्तम बच्छाव, नवीन लेर (५९२), संकेत कमळस्कर (५९०), रोशन गांगुर्डे (५६८), हरीश्री महाजन (५१२), श्रुती उगले (५१२), खुशवंत बोरसे (४३९), गार्गी माळोदे (४२७) यांनी ‘नीट’ परीक्षेत यश मिळविले. 

रेसोनन्स चमकला पुन्हा 

रेसोनन्‍सच्‍या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत यश मिळविले असून, १३८ पैकी ११७ विद्यार्थी पात्र ठरले. प्रज्वल खोकळे (६४५), आस्था सिंग (६३७), स्‍मृती चावरे (६१६) यांनी यश मिळविले, अशी माहिती रेसोनन्स प्रमुख डॉ. नितीन पाठक यांनी दिली. 

स्‍पेक्‍ट्रमच्‍या आदितीचे यश 

स्‍पेक्‍ट्रमच्‍या विद्यार्थ्यांनीही ‘नीट’ परीक्षेत यश मिळविले असून, आदिती जगताप (५९९), नवीन अय्यर (५९२), आदित्‍य वाघ (५९०) यांनी यश मिळविले. संचालक रूपक जैन यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

स्‍मार्ट एज्‍युकेशनच्‍या साक्षी, आदितीचे यश 

स्‍मार्ट एज्‍युकेशनच्‍या विद्यार्थ्यांनीही यशाला गवसणी घातली. साक्षी पगार (५१०), आदिती पाटील (५०४) यांनीही यश मिळविले असल्‍याची माहिती संचालक प्रमोद पाटील यांनी दिली. 

आई-वडिलांनंतर पार्थही वैद्यकीय सेवेच्‍या वाटेवर 

पार्थ कदमच्‍या कामगिरीमुळे त्‍याचे ऑल इंडिया इन्‍स्‍टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्‍स, दिल्‍ली (एम्‍स, दिल्‍ली) येथे प्रवेशाचे स्‍वप्‍न पूर्ण झाले आहे. विशेष म्‍हणजे पार्थ प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय कदम व डॉ. चैताली कदम यांचा मुलगा आहे. त्याने ए. पी. पटेल महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. आता आई-वडिलांपाठोपाठ पार्थही वैद्यकीय सेवेच्‍या वाटेवर निघाला आहे. 

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

कसबे सुकणेच्या वैष्णवीची स्वप्नपूर्ती 

कसबे सुकेणे : येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील वैष्णवी शशिकांत जाधव हिने ‘नीट’ परीक्षेत ७२० पैकी ६०६ गुण मिळून यश मिळवले आहे. त्यामुळे कुठल्‍याही डोनेशनशिवाय एमबीबीएस डॉक्‍टर होण्याचे तिचे स्‍वप्‍न पूर्ण होणार आहे. वैष्णवी दहावीलाही पहिल्या पाच क्रमांकांत उत्तीर्ण झाली होती. बारावीलाही तिने विशेष गुण मिळविले. तेव्हा तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबात असल्याने आपल्या कुटुंबाला एमबीबीएस डॉक्टर होऊन आधार देण्याचा मानस वैष्णवीने बोलून दाखविला. आपण ‘नीट’ परीक्षेत सहाशेहून अधिक गुण मिळवू, असा तिला विश्र्वास होता. आपल्या यशाचे श्रेय तिने आपले गुरुजन वर्ग व कुटुंबाला देत नियमित अभ्यास हेच यशाचे गमक असल्याचेही सांगितले.  

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success of students in neet North Maharashtra nashik marathi news