विक्रीसाठी प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना तेव्हा बसला धक्काच.. उसळली संतापाची लाट.. नेमके काय घडले?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली असल्याने तुम्हाला खरेदी करावीच लागेल, असा आग्रह लासलगाव उत्पादकांनी धरत आपला राग व्यक्त केला. पूर्वसूचना न दिल्याने अचानक खरेदी बंद केल्याने उत्पादक शेतकऱ्यांचा संताप अनावर झाल्यानंतर निफाड पंचायत समितीचे उपसभापती शिवा सुरासे यांनी या संदर्भात खासदार डॉ. भारती पवार आणि राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना सर्व माहिती देत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण मका खरेदीचे साकडे घातले.​

नाशिक / येवला : यावर्षी लॉकडाउनमुळे खासगी बाजारात मक्‍याचे दर प्रचंड घटले आहेत. त्या तुलनेत शासकीय आधारभूत किंमत योजनेत एक हजार 760 रुपये प्रतिक्विंटल दराने मका खरेदी करण्याचा निर्णय झाला. शासकीय आधारभूत किंमत धान्य खरेदी हंगामांतर्गत रब्बी मका खरेदी महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन यांनी दिलेल्या पत्रानुसार 27 मे पासून ऑनलाइन पद्धतीने खरेदी सुरू केली होती.

अनेक शेतकऱ्यांची मका विक्री

नाशिक जिल्ह्यातील नऊ सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी रब्बीची मका खरेदीची नावनोंदणी सुरू होताच उत्पादकांच्या रांगा लागल्या. यात अनेक शेतकऱ्यांची मका विक्री झाली. मात्र मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रतीक्षेत असताना आज (ता.22) हा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नावनोंदणी केलेली असतानाही खरेदी होणार नसल्याने आता शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार आहे. 

शेतकऱ्यांनी टार्गेट वाढविण्याची मागणी
ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची रब्बी मका शासकीय आधारभूत किमतीने 30 जूनपर्यंत खरेदी करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र सोमवारी सकाळी टार्गेट पूर्ण झाल्याचे कारण देत शासनाने ऑनलाइन पोर्टल बंद केल्याने विक्रीला आलेल्या व प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना धक्काच बसला आणि विक्रीस आणलेली मका पुन्हा घरी घेवून जावी लागली. यातच शेतकऱ्यांनी टार्गेट वाढविण्याची मागणी केली. 

येवल्यात 753 शेतकरी वंचित 
मका खरेदी अचानक बंद केल्याने संघाकडे 753 शेतकऱ्यांकडील सुमारे 20 हजार क्विंटल मका खरेदीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 20 जूनपर्यंत तालुक्‍यातील नोंदणी करण्यात आलेल्या 974 शेतकऱ्यांपैकी 221 शेतकऱ्यांची सहा हजार 409 क्विंटल मक्‍याची खरेदी झाली. 22 जून ते 27 जूनपर्यंत 300 शेतकऱ्यांना संघामार्फत मका खरेदीसाठी एसएमएस पाठविण्यात आले. केंद्र शासनाने सोमवारी सकाळी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे खरेदीचे ऑनलाइन पोर्टल बंद केले असल्याचे कळविल्याने तालुक्‍यातील 753 शेतकऱ्यांना याचा फटका बसला, तर सोमवारी संघात 50 ते 60 ट्रॅक्‍टरमधून मका घेऊन शेतकऱ्यांना माघारी जावे लागले. 

लासलगावला शेतकरी संतप्त 
शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली असल्याने तुम्हाला मका खरेदी करावीच लागेल, असा आग्रह लासलगाव मका उत्पादकांनी धरत आपला राग व्यक्त केला. पूर्वसूचना न दिल्याने मका खरेदी बंद केल्याने उत्पादक शेतकऱ्यांचा संताप अनावर झाल्यानंतर निफाड पंचायत समितीचे उपसभापती शिवा सुरासे यांनी या संदर्भात खासदार डॉ. भारती पवार आणि राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना सर्व माहिती देत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण मका खरेदीचे साकडे घातले. खासदार डॉ. पवार यांनी याबाबत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याशी संपर्क केल्यानंतर राज्यात पाठपुरावा केल्यास उद्दिष्टात वाढ करण्यास मान्यता देण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती दिली. 

हेही वाचा > भरदुपारी सुरु झाल्या प्रसूती कळा...अनुभव नसतांनाही 'तिने' घेतली रिस्क...अन् मग

उद्दिष्ट पूर्ण झाल्याने आम्हाला थांबविण्याच्या सूचना

राज्यात अडीच लाख क्विंटल मका व दीड लाख क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार हे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने आम्हाला खरेदी थांबविण्याच्या सूचना आल्याने येवला, सटाणा, चांदवड, लासलगाव, सिन्नर, मालेगाव व देवळा येथील खरेदी थांबली आहे. - संध्या पांडव, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, नाशिक 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suddenly the central government stopped buying this grain and the farmers got angry nashik marathi news