गोदाकाठी ऊसाचा फड गजबजला; यंदा ९ हजार ३०० हेक्टरवर ऊसाची लागवड 

sugar cane harvest
sugar cane harvest

नाशिक/पिंपळगाव बसवंत : धुव्वाधार पाऊस व रोगांचे आक्रमण अशा प्रतिकुल स्थितीत निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी वाचविलेल्या ऊसाचा फड तोडणीच्या लगबगीने गजबजला आहे. 

निसाका व रासाकाची चुल यंदाही बंद राहिल्याने शेतकऱ्यांना शेजारच्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस देण्याशिवाय पर्याय नाही. मिळेल तो भाव पदरात पाडुन घेण्याची मानसीकता शेतकऱ्यांची झाली आहे. निफाड तालुक्यातील विशेषत: गोदाकाठ परिसरात यंदा ९ हजार ३०० हेक्टरवर ऊसाची लागवड झाली. सहा महिन्यांनंतर ऊस काढणीला आला आहे. लगतच्या साखर कारखान्यांच्या ऊसतोड कामगाराचे तांडे निफाडमध्ये दाखल झाले आहेत. त्यात संगमेनर, नगर जिल्ह्यातील ई-टेक, अगस्ती, संजीवनी, व्दारकाधीश, दिंडोरीचा कादवा कारखान्याचा समावेश आहे. भल्या पहाटे चांदोरी, सायखेडा, करंजगाव, म्हाळसाकोरे यासह गोदाकाठ परिसरातील ऊसाच्या फडात तोडणीसाठी कोयत्याचे आवाज घणघणत आहेत. 

दहा लाख टन ऊसाचे उत्पादन मिळणार

पावसाचा मुक्काम वाढल्याने ऊसतोडीला विलंब होऊन ऊसाच्या फडात तुरे दिसु लागले आहेत. एकरी सरासरी ५० ते ६० टन ऊसाचे उत्पादन अपेक्षित असले तरी प्रतिकुल स्थितीमुळे एकरी २० टन उत्पादन घटण्याची भीती आहे. ९ हजार हेक्टरवर सुमारे दहा लाख टन ऊसाचे उत्पादन मिळणार आहे. पावसाने हाहाकार उडालेला असल्याने ओल्या दुष्काळाच्या भितीमुळे ऊसतोडणीला जाऊन शेतजमीन मोकळी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. पहिला हप्ता अडीच हजार रूपये टनाप्रमाणे येईल, असा सांगावा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचविला आहे. 

ड्रायपोर्टचा प्रकल्पही मृगजळ 

विधानसभा निवडणूक निसाका व रासाका सुरू करण्याच्या मुद्दयावर गाजली. आमदार दिलीप बनकर यांना त्यामुळे कौल मिळाला. रासाकाची भाडेतत्वावरील निविदा प्रक्रिया लवकरच होईल, असे अपेक्षीत आहे. निफाड तालुक्याचे भुषण ठरलेल्या निसाका कर्जाच्या ओझ्यात दबल्याने यंदाही चुल पेटण्याची कोणतीच स्थिती नाही. यापुर्वीच्या निविदा प्रक्रियेचे घोंगडे भिजत पडले आहे. त्यामुळे ऊस तोडणी पासुन ते बाजारभावापर्यत सर्व काही अनिश्‍चीत आहे. सरकारी धोरण, राजकीय साठमारीत निसाका-रासाका ऊर्जितावस्थेत येतील का, हे सांगणे कठीण आहे. ड्रायपोर्टचा प्रकल्पही निसाकासाठी मृगजळ ठरतो आहे. 

ऊसाचे पिक यंदा शेतकऱ्यांना ओझे झाले आहे. एकरी ५० हजार रूपये खर्च करूनही तो पदरात काही पडेल की नाही याची खात्री नाही. लगतच्या कारखान्यांकडून शेतकऱ्यांची ससेहोलपट होते. निसाका-रासाका सुरू असते तर ऊस उत्पादनाकांना दोन पैसे अधिक मिळाले असते. 
विजय बागस्कर (ऊस उत्पादक, चांदोरी). 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com