नाशिक जिल्ह्यात ऊसतोडणी हंगामास सुरुवात; साडेआठ लाख टन ऊस गाळपासाठी सज्ज 

माणिक देसाई
Friday, 23 October 2020

यंदाच्या हंगामात कादवा, वसाका, रावळगाव आणि द्वारकाधीश हे जिल्ह्यातील चार साखर कारखाने गाळपासाठी सज्ज झाले आहेत. नगर जिल्ह्यातील संगमनेर, लोणी, कोळपेवाडी, प्रवरा येथील साखर कारखान्यांना त्यांचे गाळप पूर्ण होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील उसासाठी तयारी पूर्ण केली आहे.

नाशिक/निफाड : नाशिक जिल्ह्यातील ऊसतोड हंगामाला सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील तसेच बाहेरच्या साखर कारखान्यांचे ऊसतोड कामगारांचे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डेरे दाखल झाले आहेत. यंदा जिल्ह्यातील आठ लाख ५० हजार टन इतका ऊस गाळपासाठी कारखान्यांना मिळणार आहे. 

जिल्ह्यात ऊसक्षेत्र वाढले

यंदाच्या हंगामात कादवा, वसाका, रावळगाव आणि द्वारकाधीश हे जिल्ह्यातील चार साखर कारखाने गाळपासाठी सज्ज झाले आहेत. नगर जिल्ह्यातील संगमनेर, लोणी, कोळपेवाडी, प्रवरा येथील साखर कारखान्यांना त्यांचे गाळप पूर्ण होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील उसासाठी तयारी पूर्ण केली आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी ऊस लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, जिल्ह्यात ऊसक्षेत्र वाढले मात्र कारखाने थकले, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शाश्वत पीक म्हणून उसाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांची मदार संपूर्णपणे परजिल्ह्यातील कारखान्यांवर आहे. विशेष म्हणजे या वर्षी कोविड-१९ च्या संकटाचा ऊस उत्पादकांनाही फटका बसला असला तरी ऊसलागवडीचा उत्साह कमी झालेला नाही. निफाड तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर ऊसलागवड करण्यात आली असून, त्याखालोखाल दिंडोरी तालुका आहे. पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्येही दिवसेंदिवस उसाचे क्षेत्र वाढत आहे. 

यंदा जिल्ह्यातील चार साखर कारखाने सुरू झाल्याने जिल्ह्यातील ऊस उत्पादकांच्या उसाला तोड मिळणार आहे. यंद आडसाली, पूर्वहंगामी, खोडवा सुरूच्या माध्यमातून साडेआठ लाख टन सरासरी ऊस गाळपासाठी उपलब्ध असून, चार महिने हंगामाचा अगाजा असणार आहे. 

हेही वाचा >  मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

जिल्ह्यातील ऊसलागवड (हेक्टरमध्ये) 
आडसाली ः ४ हजार ९५७.८० 
पूर्वहंगामी ः ११२.५० 
खोडवा ः ३ हजार ४४३.६० 
एकूण ः ८ हजार ५१३.९० हेक्टर 

आमच्या शेतात ८००५ या जातीचा ऊसलागवड केला. आमच्या पिकाला जे खत लावले होते ते पूर्णपणे विरघळून पिकांच्या मुळ्यांना पोचल्याने उसाचे क्षेत्र जोमदार आले आहे. हा ऊस द्वारकाधीश कारखान्यात दिला असून, चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. 
-तुषार कापडणीस, ऊस उत्पादक (द्याने, ता. बागलाण) 

हेही वाचा >  क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane harvesting season starts in Nashik district marathi news