पोलिस अधिकार्‍याला भोवली महामार्गावरील अवैध वसूली! जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून वरिष्ठ अधिकार्‍याची उचलबांगडी

police.jpg
police.jpg

सटाणा (नाशिक) : गुजरातमधून महाराष्ट्रात येण्यासाठी सर्वात जवळचा असलेल्या या महामार्गावरून दररोज 24 तास हजारो वाहनांची ये-जा असते. मग इतर राज्यातील वाहन दिसले की त्यांना अडवून तपासणीच्या नावाखाली चिरीमिरी घेत सोडून द्यायचे. यामध्ये काही वाहनधारकांची मोठी आर्थिक पिळवणूक होते. तर यामुळे काही वाहनधारक स्वतःहून पैसे देऊन अवैधरीत्या दोन नंबरचा माल नेत असावेत यात शंका नाही. जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे आणि महामार्गावरील वसुलीसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कोठावदे यांनी नुकतीच जिल्हाधिकारी सुरज मांढरे व जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील यांच्याकडे तक्रार करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती. 

जायखेडा पोलिस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याची उचलबांगडी

पिंपळनेर - ताहाराबाद दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर बागलाण तालुका हद्दीत वाहन तपासणीच्या नावाखाली स्थानिक पोलिसांकडून रात्री-अपरात्री अवैधपणे वसुली केली जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. वाहनधारकांची लूट करणारे पोलिस अधिकारी म्हणजे वरिष्ठांच्या अलिखीत परवानगीने चालणारे 'चालते बोलते' टोलनाके असल्याची चर्चा सध्या सुरू असतानाच जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी जायखेडा पोलिस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याची उचलबांगडी केली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे आणि महामार्गावरील वसुली संदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कोठावदे यांच्यासह अनेकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत ही कारवाई झाल्याची चर्चा सध्या तालुक्यात होत आहे. 

पोलिसांकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी
साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळनेर ते ताहाराबाद दरम्यान कातरवेल (ता.बागलाण) येथे वाहन तपासणी नाक्यावर कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली गुजरात व इतर ठिकाणांहून येणा-या वाहनधारकांची स्थानिक जायखेडा पोलिसांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खासगी वाहनधारकांसह अवजड वाहतुक करणार्‍या वाहनांना विनाकारण थांबवायचे, कागदपत्रांच्या नावाखाली चालकाची अडवणूक करायची आणि चिरीमिरी घेत वाहन सोडून द्यायचे, असे प्रकार सर्रास सुरू होते. मध्यरात्री पेट्रोलिंग करण्याऐवजी पोलिस नाकाबंदीच्या ठिकाणी थांबून वाहनधारकांची अडवणूक करतात. याबाबत त्यांना विचारल्यास पोलिसांकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी केली जाते. 

 अनेक नागरिकांच्या तक्रारी 
नुकतीच नियुक्ती झालेल्या जिल्हा पोलिस प्रमुख सचिन पाटील यांनी अल्पावधीतच जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांचा कर्दनकाळ म्हणून ओळख निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वी पाटील यांनी नागरिकांच्या तक्रारीवरून येवला पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन तर इतर कर्मचाऱ्यांवर बदलीची कारवाई केली होती. त्याच पद्धतीने जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे, महामार्गावरील अवैध वसुली यासंदर्भात जायखेडा पोलीस ठाण्याच्या 'त्या' पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात जिल्हा पोलीस प्रमुख पाटील यांच्यापर्यंत अनेक नागरिकांच्या तक्रारी गेल्याने ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.

पक्के बिल असतांनाही पैशांची मागणी
कातरवेल (ता.बागलाण) चेक पोस्ट येथे (ता.23) ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोन वाजता मी दुकानाचा माल घेऊन सटाण्याकडे येत असतांना जायखेडा पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचार्‍यांनी माझी गाडी अडवली. सर्व कागदपत्रे आणि वाहनातील मालाचे पक्के बिल असतांनाही पोलिसांनी पैशांची मागणी केली. याबाबत खाकी वर्दीवर नसलेल्या त्यांच्या नावाची पट्टी व वसुलीबद्दल विचारले असता पोलिसांनी दमदाटी करून कारवाईची धमकी दिली. या प्रकाराबाबत मी जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे तक्रार केली होती.- प्रशांत कोठावदे, सामाजिक कार्यकर्ता  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com