मालेगावमध्ये बिघडले ताळतंत्र...सारा आकड्यांचा खेळ सुरू..कुणाचा कुणाशी मेळच बसेना! 

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 1 July 2020

मालेगावमध्ये कोरोनाबळींच्या संख्येबाबत मात्र कुणाचा कुणाशी मेळच बसेना व त्यातून सारा आकड्यांचा खेळ सुरू असल्याची स्थिती आहे. मालेगावमध्ये आकड्यांचे ताळतंत्र बिघडले असल्याचेही जाणवत आहे.

नाशिक / मालेगाव : महापालिकेच्या फरहान हॉस्पिटलमधील कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारी (ता. 30) दोन कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू झाला. यात हिंगलाजनगर भागातील 46 वर्षीय व नांदगाव येथील 59 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे संशयितांच्या मृत्यूंची संख्या 44 झाली आहे. येथील कोरोनाबळींच्या संख्येबाबत मात्र कुणाचा कुणाशी मेळच बसेना व त्यातून सारा आकड्यांचा खेळ सुरू असल्याची स्थिती आहे. 

पॉझिटिव्ह रुग्णसंख्येबाबतही घोळ कायम

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मंगळवारी आलेल्या अहवालानुसार मालेगाव महापालिका क्षेत्रात कोरोनाबळींची संख्या 75 दर्शविण्यात आली आहे, तर महापालिकेच्या आरोग्य विभागाने हीच संख्या 72 दाखविली आहे. त्यामुळे कोरोनाबळींची नेमकी संख्या किती, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. आजवरची आकडेवारी पाहता शहरातील कोरोनाबळींची संख्या 73 आहे. मात्र, धुळे येथील एक व एक अनोळखी असे दोन मृत्यू येथील आकडेवारीच्या माथी मारले जात असल्याचे समजते. जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या सोमवार (ता. 29)च्या अहवालातही येथील कोरोनाबळींची संख्या 74 होती. आरोग्य विभागाने याबाबत संबंधित यंत्रणेला कळविले आहे. दुसरीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येबाबतही घोळ कायम आहे. महापालिकेच्या अहवालात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 990, तर जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या अहवालात एक हजार 131 रुग्ण दर्शविण्यात आले आहेत. 

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

चार रुग्णांना अन्यत्र हलविण्यात आले

दरम्यान, मंगळवारी मृत्यू झालेला हिंगलाजनगर भागातील पुरुष गेल्या 27 जूनला फरहान हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता, तर नांदगाव येथील 28 जूनला येथे दाखल झाला होता. दोघांचेही अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. नांदगावच्या पुरुषाचे वय 46 वर्षे असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी नव्याने 102 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यामुळे 464 अहवाल प्रलंबित आहेत, तर नव्याने 12 संशयित दाखल झाले असून, नऊ रुग्णांना घरी सोडण्यात आले. हज हॉलमधून दोन व फरहान हॉस्पिटलमधील दोन अशा चार रुग्णांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. एकूण 99 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. शहरातील 990 बाधितांपैकी 800 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: system disturb about corona deaths in Malegaon nashik marathi news