नाशिककरांना दिलासा! कोरोना रुग्णसंख्येत घट; रुग्णालयातील 60 टक्के बेड रिक्त

corona patients decreasing in nashik
corona patients decreasing in nashik

नाशिक :  गेल्या तीन महिन्यांपासून शहरात कोरोनाचा वाढलेला जोर ऑक्टोंबर महिन्याच्या दुसया आठवड्यात ओसरताना दिसत असून हि बाब नाशिककरांसाठी दिलासादायक ठरतं आहे. रुग्णांची संख्या घटत असल्याने खासगी रुग्णालयातील साठ टक्के बेड रिक्त झाले आहेत. शहरात एकुण ५८,८१४ कोरोना बाधितांपैकी ५४ हजार ८२८ रुग्ण घरी सोडून देण्यात आले असून ३,१५३ रुग्णांवर उपचार सुरु असून १७९४ रुग्ण घरीच उपचार घेत असल्याने कोरोना संकटातून नाशिक बाहेर पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

सप्टेंबर महिन्यात २६ हजार २१ रुग्णांची भर

शहरात एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला त्यानंतर टप्प्याटप्याने वाढ होत गेली. मे महिन्याच्या अखेर पर्यंत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती त्यानंतर मात्र जून महिन्यापासून कोरोनाचा उद्रेक वाढण्यास सुरुवात झाली. वडाळा गाव, पंचवटी विभागातील फुले नगर, सातपूर मधील संजीव नगर व सातपूर कॉलनी, सिडको असे एक-एक करतं कोरोनाने संपुर्ण शहराला कवेत घेतले. जुलै ते ऑगष्ट महिन्यात दररोज पाचशे रुग्ण शहरात आढळून येत होते त्यानंतरच्या सप्टेंबर महिन्यात मात्र दररोज हजार रुग्णांचा आकडा बाहेर पडू लागल्याने भिती निर्माण झाली होती. सप्टेंबर महिन्यात शहरात जवळपास २६ हजार २१ रुग्णांची भर पडली तर २४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला.

राखिव बेडची संख्या साठ टक्क्यांपर्यंत

ऑक्टोंबर महिन्यात मात्र दिलासादायक चित्र बाहेर पडले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने केलेली जनजागृती, वाढविण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट, कोमॉर्बिड रुग्णांची तपासणी यामुळे कोरोना नियंत्रणात असल्याचे चित्र समोर आले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने खासगी रुग्णालयांमधील बेड रिक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. सप्टेंबर महिन्यात शहरात अॅक्टीव्ह रुग्ण संख्या सहा हजारापर्यंत पोचली होती. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ॲक्टीव रुग्णसंख्या दोन हजारांने कमी होवून चार हजारांपर्यंत स्थिरावली तर दुसया आठवड्यात ॲक्टीव्ह रुग्णसंख्या पाचशे ने कमी होवून साडे तीन हजारापर्यंत स्थिरावली आहे. कोरोना रुग्णांसठी महापालिका व खासगी रुग्णालयांकडे ४,४३९ राखिव बेड होते. आता १,७४५ बेड वर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. महापालिकेच्या नवीन बिटको, डॉ. जाकीर हुसेन रुग्णालय, समाजकल्याण, ठक्कर डोम, मेरी या चार मोठ्या कोविड सेंटर मध्ये २,२९५ बेड राखिव ठेवण्यात आले होते. परंतू सध्या १३५० रिक्त बेड असल्याने शहरात कोरोना रुग्णांसाठी राखिव असलेल्या बेडची संख्या साठ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. पंधरा बेड पेक्षा अधिक क्षमता असलेले ६९ रुग्णालये कोव्हीड साठी आरक्षित ठेवण्यात आली होती. त्या रुग्णालयांमध्ये २०३९ बेड होते. त्यापैकी १,२२५ बेड रिक्त आहेत. सध्या १,७९४ रुग्ण घरीच उपचार घेत आहे तर १,७४५ रुग्ण खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. 

जनजागृती, तपासणी व हर्ड ह्युमॅनिटी विकसित झाल्याचा हा परिणाम दिसून येत असून अधिकाधिक रुग्ण घरीचं उपचार घेत आहेत. त्यामुळे रुग्णालयातील बेड रिक्त दिसतं आहेत.- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिक्षक, महापालिका. 

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com