थंडीसोबत ‘रामसर’मध्ये वाढलाय किलबिलाट! सुट्यांमुळे वाढली पर्यटकांची संख्या

ramsar.jpg
ramsar.jpg

नाशिक : महाराष्ट्राचे भरतपूर तथा रामसर दर्जाच्या नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यात पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने थंडीची लाट पसरताच इथे किलबिलाट वाढला आहे. वन विभागातर्फे बुधवारी (ता. ३०) झालेल्या पक्षीगणनेत १३६ जातीच्या ३२ हजार पक्ष्यांची नोंद झाली. त्यात गवतात राहणाऱ्या चार हजार ८५८, तर २७ हजार ४४ पाणपक्ष्यांचा समावेश आहे.

सुट्यांमुळे पर्यटकांची संख्या वाढली 

नाताळच्या सुट्यांमुळे पर्यटकांची अभयारण्यात वर्दळ वाढली आहे. 
खानगाव थडी (ता. निफाड) येथे १९११ मध्ये नांदूरमध्यमेश्‍वर बंधारा बांधण्यात आला. याठिकाणी पक्षी अभयारण्य आहे. हिवाळ्यात या परिसरात देशी-परदेशी पक्ष्यांचे आगमन होते. अडीचशेहून अधिक जातीचे पक्षी इथे दर्शन देतात. तसेच २४ जातीचे मासे आणि चारशेहून अधिक वनस्पती अभयारण्यात आहेत. थंडीच्या कडाक्यात आज सकाळी सात ते दहा या वेळेत अभयारण्याच्या अकरा पक्षी निरीक्षण मचाणवरून पक्षीगणना करण्यात आली. त्यात कॉमन क्रेनची संख्या वाढल्याचे आढळले. तीन फुटांचा पक्षी अभयारण्याभर पाहायला मिळतो. चमचा, वारकरी, उघड्या चोचीचा करकोचा, राखी बगळा, गडवाल, युरेशिअन विजन, कॉमन टील, जांभळी पानकोंबडी, पोचार्ड, रंगीत करकोचा आदींसह गवतावर राहणारे गप्पीदास, वेडा राघू, मुनिया, डव, हुदहुद, पीपीट, बुलबुल, नीलकंठ, दयाळ, नाचण आदी पक्षी पाहायला मिळाले. शिवाय ओस्प्रे, मार्श हेरीअर, हनी बझड हे शिकारी पक्षी आढळले. 

चापडगावमध्ये होणार निसर्ग परिचय केंद्र

नवीन वर्षात नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्याचा कायापालट केला जाणार असून ‘इको टुरिझम'च्या निधीतून चापडगावमध्ये निसर्ग परिचय केंद्र उभारण्याचा मानस असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रथमेश हडपे यांनी सांगितले.


मांजरगावमध्ये पक्षी निरीक्षणासाठी कॅम्पस बनवला जाणार आहे. त्यामुळे गावात रोजगार उपलब्ध होणार आहे. रेस्क्यू सेंटर सुरू होणार आहे. वन विभागातर्फे पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे. आजच्या पक्षी गणनेत थंडीसोबत स्थलांतरित पक्ष्यांची संख्या वाढल्याचे आढळले. गाळपेऱ्यामध्ये मुबलक पाणी असल्याने अनेक पक्ष्यांनी त्या परिसरात स्थलांतरण केले आहे. गवतातील पक्षी वाढले असून, शिकारी पक्षी पाणथळ परिसरात दृष्टीस पडतात. - प्रथमेश हडपे, वनपरिक्षेत्र अधिकारी

वन विभागाच्या पक्षी गणनेत हडपे, वनपाल अशोक काळे, आशा वानखेडे, डी. डी. फाफाळे, गंगाधर अघाव, प्रमोद मोगल, संजय गायकवाड, एकनाथ साळवे, सुनील जाधव, पक्षीमित्र दत्ताकाका उगावकर, डॉ. उत्तम डेर्ले, किरण बेलेकर, राहुल वडघुले, नुरी मर्चंट, प्रतीक्षा कोठुळे, अनंत सरोदे, चंद्रिका खिराणी, गाईड अमोल दराडे, अमोल डोंगरे, पंकज चव्हाण, रोषण पोटे, विकास गारे, ओमकार चव्हाण आदी सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com