कृषी शाखेतून शिक्षण घेण्याचा विचार करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी

अरुण मलाणी
Thursday, 10 September 2020

बुधवार (ता. ९)च्‍या अंकात कृषी शिक्षणाच्‍या पर्यायांविषयीची माहिती प्रसिद्ध केली होती. या अभ्यासक्रमांसोबत अन्‍य काही शिक्षणक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्‍ध आहेत. यांपैकी एमसीएईआर, पुणे यांच्‍यांतर्गत दहावीनंतर पदविका शिक्षणक्रमाचाही पर्याय आहे.

नाशिक : कृषी शाखेतून शिक्षण घेतल्‍यानंतर अगदी शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याला आपल्‍या शेतीवर विविध प्रयोग करताना परिवर्तन घडविता येऊ शकते. याशिवाय सरकारी, बँकिंग क्षेत्रासह खासगी क्षेत्रातही नोकरीच्‍या भरपूर संधी उपलब्‍ध आहेत. उद्योजक, अन्नप्रक्रिया उद्योगापासून निर्यातदार होण्याचे पर्याय या विद्यार्थ्यांसाठी खुले असतात. 

सरकारी, बँकिंग क्षेत्रात नोकरी

कुठल्‍याही शाखेतून कृषी शिक्षण घेतलेल्‍या विद्यार्थ्यांना साधारणतः एकसारखे करिअरचे पर्याय उपलब्‍ध होतात. राज्‍य शासनाच्‍या कृषी विभागात सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सीड ऑफिसर या पदांसह बँक ॲग्री ऑफिसर, स्‍पेशालिस्‍ट ऑफिसर, ॲग्री फील्‍ड ऑफिसर, ज्‍युनिअर ॲग्रिकल्‍चरल असोसिएट, प्रोबेशनरी ऑफिसर अशी काही पदे बँकिंग क्षेत्रात उपलब्‍ध आहेत. केंद्र शासनांतर्गत ॲग्रिकल्‍चर सबइन्स्‍पेक्‍टर, इफकोमध्ये एक्झिक्युटिव्ह, तसेच ॲग्रिकल्‍चर फील्‍ड ऑफिसर, ॲग्रिकल्‍चर डेव्‍हलपमेंट ऑफिसर, हॉर्टिकल्‍चर फील्‍ड ऑफिसर, ‘आत्‍मा’मध्ये प्रकल्‍प संचालक, प्रकल्‍प उपसंचालक, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांसह विमानतळ, सी-पोर्टवर प्‍लांट क्वारंटाइन ऑफिसर पदासाठी कृषी शिक्षण झालेल्‍या विद्यार्थ्यांना संधी मिळते. खासगी क्षेत्रात ॲग्रोवेट व अन्‍य नामांकित कंपन्‍या कार्यरत असून, या कंपन्‍यांमध्येही अधिकारीपदावर नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध आहेत. 

उद्योजकतेला वाव 

कृषी शिक्षण घेत अन्न व प्रक्रिया उद्योगात प्रकल्‍प उभारणी करता येते. फार्मर प्रोड्यूसिंग कंपनी उभारता येते. गटशेतीकरिता मायक्रो फायनान्‍स मिळवू शकतात. भारताच्‍या एकूण निर्यातीत कृषी क्षेत्राचा वाटा २००३ मध्ये ०.६७ टक्‍के होता. २०१० मध्ये १.३५ टक्‍के, तर २०१९ मध्ये २.६ टक्‍के इतका होता. यातून निर्यात क्षेत्रातही भरपूर संधी असल्‍याचे लक्षात येते. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

अन्‍य काही अभ्यासक्रम असे 

बुधवार (ता. ९)च्‍या अंकात कृषी शिक्षणाच्‍या पर्यायांविषयीची माहिती प्रसिद्ध केली होती. या अभ्यासक्रमांसोबत अन्‍य काही शिक्षणक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्‍ध आहेत. यांपैकी एमसीएईआर, पुणे यांच्‍यांतर्गत दहावीनंतर पदविका शिक्षणक्रमाचाही पर्याय आहे. दोन वर्षे कालावधीचा (मराठी माध्यम) पदविका, तीन वर्षे कालावधीचा (सेमी) पदविका, तीन वर्षे कालावधीचा (इंग्रजी-गुजरात पॅटर्न) पदविका अभ्यासक्रम शिकविला जातो आहे. पदविका शिक्षण घेतलेल्‍या पात्र विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्‍या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळू शकतो. यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठांतर्गत कृषिविज्ञान पदवी, उद्यानविद्या पदवी, फळबागा उत्‍पादन पदविका, भाजीपाला उत्‍पादन पदविका, फुलशेती व प्रांगण उद्यान पदविका, उद्यानविद्या पदविका, कृषिव्‍यवसाय व्‍यवस्‍थापन पदविका, कृषी पत्रकारिता पदविका, माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र, कृषी अधिष्ठान अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे.  

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Various career opportunities after studying agriculture nashik marathi news