मुलतानपुरा दवाखाना सुरू होण्याची प्रतीक्षाच! सूचनांना केराची टोपली; रुग्णांची फरपट

युनूस शेख
Wednesday, 14 October 2020

कोविड काळात शहरात दवाखाने, रुग्णालयांची गरज आहे. आहे ती यंत्रणा सुरळीत चालविण्याची जबाबदारी सरकारी यंत्रणांची असताना मुलतानपुरा येथील दवाखान्याची इमारत होऊन चार वर्ष उलटली तरी अद्याप दवाखाना सुरू झालेला नाही. विशेषतः प्रसूतीसाठी रुग्णालयच नसल्याने महिलांची चांगलीच फरपट होत आहे. 

नाशिक : कोविड काळात शहरात दवाखाने, रुग्णालयांची गरज आहे. आहे ती यंत्रणा सुरळीत चालविण्याची जबाबदारी सरकारी यंत्रणांची असताना मुलतानपुरा येथील दवाखान्याची इमारत होऊन चार वर्ष उलटली तरी अद्याप दवाखाना सुरू झालेला नाही. विशेषतः प्रसूतीसाठी रुग्णालयच नसल्याने महिलांची चांगलीच फरपट होत आहे. 

महापौर, स्थायी सभापतींच्या सूचनांना केराची टोपली; रुग्णांची फरपट ​
जुने नाशिक, इंदिरानगर, वडाळागाव, भारतनगर, उपनगरसह विविध भागातील नागरिक उपचारासाठी, तसेच महिला प्रसूतीसाठी डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात येतात. सध्या त्याठिकाणी कोविड सेंटर झाले आहे. बाह्यरुग्ण (ओपीडी) आणि महिला प्रसूती कक्ष बंद ठेवला आहे. या भागातील बहुतांश नागरिक गरीब आणि मध्यमवर्गीय आहे. अशा वेळेस त्यांना खासगी रुग्णालयात जाणे शक्य होत नाही. सामान्य आजार असल्यास काही नागरिक छोट्या-मोठ्या क्लिनिकमध्ये जातात. परंतु महिलांना पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयाची वाट धरावी लागते.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

इमारत आजही ‘जैसे थे’

दुसरीकडे मुलतानपुरा भागात महापालिकेच्या दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम होऊन चार वर्षे उलटले. दवाखाना सुरू झाल्यास सर्वांना सोयीचे होईल. ओपीडी आणि प्रसूती विभाग सुरू केल्यास सर्वांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होईल. नगरसेविका समिना मेमन यांनी महासभा आणि स्थायी समिती सभेत प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर चर्चा होऊन महापौर आणि स्थायी समिती सभापतींनी दवाखाना सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षकांनी दवाखाना इमारतीची पाहणी केली. तीन ते चार दिवसांत दवाखाना सुरू करण्याचे आश्‍वासन दिले. इमारत आजही ‘जैसे थे’ आहे. दवाखाना लवकर सुरू करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. 

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

केवळ आश्वासन 
महापौर सतीश कुलकर्णी आणि स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी सध्याच्या परिस्थितीचा विचार करता मुलतानपुरा दवाखाना सुरू करण्याच्या सूचना वैद्यकीय अधीक्षकांना दिल्या होत्या. त्यांनी दवाखाना इमारतीची पाहणी करत केवळ आश्‍वासन दिले. असे करून त्यांनी महापौर आणि सभापतींच्या सूचनांना केराची टोपली दाखविली, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. 

 
दवाखाना सुरू करण्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. महापालिकेकडून अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. लवकरच दवाखाना सुरू करावा अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्कारावा लागेल. -समिना मेमन, नगरसेविका 

 

महापौर आणि सभापतींनी मुलतानपुरा दवाखाना सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहे. तरीही महापालिका वैद्यकीय विभाग त्यांच्या सूचनांना केराची टोपली दाखवित आहे. -नासीर पठाण, नागरिक  

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waiting for Multanpura Hospital to start nashik marathi news