प्रभाग सभापतिपद निवडणूक : सातपूर, पश्‍चिमसाठी मनसेचे, तर नाशिक रोडला राष्ट्रवादीचे दबावतंत्र!

nmc 123.jpg
nmc 123.jpg

नाशिक : कोरोनामुळे रखडलेल्या प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुका जवळ येत असताना शहरातील राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. सातपूर व पश्‍चिममध्ये किंगमेकर होण्यासाठी मनसेने कंबर कसली असून, थेट निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

सातपूर, पश्‍चिमसाठी मनसेचे, नाशिक रोडला राष्ट्रवादीचे दबावतंत्र 

सातपूरसाठी माजी सभापती सलीम शेख व योगेश शेवरे यांनी, पश्‍चिमसाठी ॲड. वैशाली भोसले यांनी अर्ज नेल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. नाशिक रोडमध्ये भाजप व शिवसेनेचे समसमान बलाबल असताना राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची असताना एकमेव नगरसेवक जगदीश पवार यांनी अर्ज नेल्याने शिवसेनेसाठी धक्का मानला जात आहे. अर्ज माघारीच्या दिवशी खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी, मनसेचे दबाव तंत्र कामी येईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

पंचवटीत भाजपमध्ये चुरस, पूर्व, सिडकोत एकतर्फी लढत 

लॉकडाउनंतर तब्बल सहा महिन्यांनी विभागीय आयुक्तांकडे प्राप्त प्रस्तावानुसार निवडणुका घेण्याचे आदेशित करण्यात आले. त्यानुसार १५ ऑक्टोबरला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रक्रिया होणार आहे. पाच नगरसेवक असलेल्या मनसेने महापौर निवडणुकीत भाजपला साथ दिली होती. त्यामुळे प्रभाग सभापती निवडणुकीतही हाच फॉर्म्युला कायम राहील, अशी अपेक्षा होती. परंतु सातपूर व पश्‍चिम विभागात मनसेच्या नगरसेवकांनी अर्ज भरण्याची तयारी सुरू केल्याने पुन्हा एकदा किंगमेकरच्या भूमिकेत येणार आहे. सातपूर प्रभाग समितीत वीस नगरसेवक आहेत. त्यात भाजपचे ९, शिवसेनेचे आठ, मनसेचे दोन तर रिपाइं (आठवले गट) चा एक नगरसेवक आहे. मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने मनसेने दबावाचा भाग म्हणून अर्ज नेले आहे. पश्‍चिममध्ये बारा नगरसेवकांपैकी भाजपचे सर्वाधिक पाच नगरसेवक असले तरी येथे २०१७ पासूनच महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अस्तित्वात आहे. भाजपपाठोपाठ कॉंग्रेसचे चार, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसेचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस एक झाल्यास व मनसेची साथ मिळाल्यास भाजपला सत्ता मिळविता येणार नाही. परंतु मनसेने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यास कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवता येणार आहे. त्यापूर्वी भाजपला मनसेची समजूत काढावी लागणार आहे. 

राष्ट्रवादीचेही दबावतंत्र 
नाशिक रोड विभागात २३ पैकी भाजप व सेनेचे प्रत्येकी अकरा सदस्य आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक सदस्य असून, महाविकास आघाडीचा फॉर्म्युला लक्षात घेता शिवसेनेला समितीवर भगवा फडकविण्याची संधी आहे. तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव उमेदवार जगदीश पवार यांनी अर्ज नेल्याने शिवसेनेला राष्ट्रवादीची समजूत काढावी लागेल. 

...यांनी घेतले अर्ज 
नाशिक रोड प्रभाग समिती सभापतिपदासाठी भाजपकडून डॉ. सीमा ताजणे, शिवसेनेकडून जयश्री खर्जुल, राष्ट्रवादीकडून जगदीश पवार यांनी अर्ज घेतले. सातपूरसाठी भाजपकडून रवींद्र धिवरे, मनसेकडून सलीम शेख व योगेश शेवरे यांनी अर्ज घेतले. पंचवटी विभागासाठी भाजपकडून सुनीता पिंगळे, पश्‍चिम विभागासाठी मनसेकडून ॲड. वैशाली भोसले, सिडकोत शिवसेनेकडून चंद्रकांत खाडे, पूर्व प्रभागमध्ये भाजपकडून ॲड. श्याम बडोदे यांनी अर्ज घेतले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com