esakal | स्मार्ट प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा फुटला फुगा! दोन महिन्यांतच कंपनीचा क्रमांक खालावला
sakal

बोलून बातमी शोधा

smart city 1.jpg

देशभरातील स्मार्टसिटी कंपनीमार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत नाशिक स्मार्टसिटी कंपनीचा क्रमांक खालावल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी मोठी चपराक मानली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी नाशिकने प्रकल्पांच्या अंमलबजावणीत देशात पंधरावा, तर राज्यात पहिला क्रमांक मिळविला होता. परंतु दोन महिन्यांतच वरचा क्रमांक खालावला असून, राज्यात पुणे स्मार्टसिटी कंपनीने आघाडी घेतली.

स्मार्ट प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा फुटला फुगा! दोन महिन्यांतच कंपनीचा क्रमांक खालावला

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : देशभरातील स्मार्टसिटी कंपनीमार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत नाशिक स्मार्टसिटी कंपनीचा क्रमांक खालावल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी मोठी चपराक मानली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी नाशिकने प्रकल्पांच्या अंमलबजावणीत देशात पंधरावा, तर राज्यात पहिला क्रमांक मिळविला होता. परंतु दोन महिन्यांतच वरचा क्रमांक खालावला असून, राज्यात पुणे स्मार्टसिटी कंपनीने आघाडी घेतली. नाशिक दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. देशात नाशिक अठराव्या क्रमांकावर पोचले आहे. 

दोन महिन्यांतच कंपनीचा क्रमांक खालावल्याने अडचण 
केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्टसिटी कंपनीमार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांची गती लक्षात घेऊन केंद्राच्या नगरविकास मंत्रालयातर्फे स्मार्टसिटी कंपन्यांना मूल्यांकन दिले जाते. दर महिन्याला मूल्यांकन जाहीर केले जाते. त्यामध्ये प्रकल्पांच्या गतीनुसार मूल्यांकन जाहीर केले जाते. देशभरातील शंभर स्मार्टसिटी कंपन्यांचा यात समावेश असतो. त्यासाठी पोर्टल विकसित करण्यात आले आहे. स्मार्टसिटी कंपनीमार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची माहिती त्यात समाविष्ट असते. पूर्ण झालेले, निविदाप्रक्रियेत असलेले, प्रकल्पांवर खर्च झालेला निधी या बाबी तपासून त्या आधारे मूल्यांकन निश्‍चित केले जाते.

स्मार्ट प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा फुटला फुगा!

नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी कंपनीतर्फे ५२ प्रकल्प हाती घेण्यात आले, त्यापैकी २२ प्रकल्प पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांची गती संथ आहे. ऑगस्टमध्ये नगर विकास मंत्रालयाने देशभरातील शहरांची यादी जाहीर केली होती. त्यात देशात पंधरावा, तर राज्यात पहिला क्रमांक आला होता. ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात आलेल्या यादीत वरचा क्रमांक घसरला असून, यापूर्वी राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेले नाशिक दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहे. देशात अठरावा क्रमांक आला आहे. प्रकल्प अंमलबजावणीच्या मूल्यांकनात नाशिकचा क्रमांक घसरल्याने प्रकल्पांचे काम संथगतीने सुरू असल्याचा महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केलेल्या आरोपाला यानिमित्ताने पुष्टी मिळाली आहे. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

...यामुळे घसरला क्रमांक 
स्मार्टसिटी कंपनीमार्फत शहरात ५२ प्रकल्प सुरू आहेत. त्यातील गावठाण विकास, गोदावरी सौंदर्यीकरण, पार्किंग, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, जेटी तयार करणे, अहिल्यादेवी होळकर पुलाखाली स्वयंचलित दरवाजा बसविणे, शहर बससेवा ही महत्त्वाची कामे अद्यापही अपूर्णावस्थेत आहेत. या प्रकल्पांचा खर्च वाढणार असल्याने त्याचा आर्थिक बोजा महापालिकेवर पडणार आहे. क्रमांक घसरल्याने स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

प्रकल्प अंमलबजावणीची स्थिती 
पुणे- १३, नाशिक- १८, ठाणे- २२, नागपूर- ३१, पिंपरी-चिंचवड- ६१, सोलापूर- ५०, कल्याण-डोंबिवली- ६५, औरंगाबाद- ६८