Sunday Special : शेतकऱ्यांच्या कोट्यवधींच्या फसवणुकीत जेमतेम दहा कोटींचेच गुन्हे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

कमी क्षेत्रात चांगले निर्यातक्षम उत्पादन घेण्यात द्राक्ष उत्पादकांची पुढची शिकलेली पिढी पारंगत होत गेली. निर्यातीच्या कक्षा रुंदावल्या गेल्या; पण त्याचवेळी अडथळेही वाढले. 'पिकविता येते पण विकता येत नाही', या म्हणीचा प्रत्यय द्राक्ष बागायतदार घेत आहेत. मोठ्या कष्टानं पिकवलेला माल खरेदीस परराज्यांतून येणारा व्यापारी येथील‌ स्थानिक भौगोलिक, व्यावहारिक परिस्थितीबद्दल अनभिज्ञ असतो.

नाशिक : फसवणुकीनंतर शेतकऱ्यांकडून गुन्हे दाखल होतात; पण हातात पैसे मिळत नसल्याने द्राक्षशेती अवघड वळणावर आली आहे. त्यामुळे द्राक्षांच्या व्यवहाराला कायद्याच्या कचाट्यात आणता येत नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक नित्याची बाब झाली आहे. प्रथमच पोलिसांनी पुढाकार घेतल्याने जिल्ह्यातील बळीराजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून फसवणुकीची ही साखळी तुटेल का, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीत आहे. 

निफाडकरांना २० वर्षांत २०० कोटींचा गंडा 

द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाडकरांना गेल्या २० वर्षांत विविध भागातील व्यावसायिकांनी २०० कोटींना गंडा घातला आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे द्राक्ष उत्पादन झपाट्याने बदलले आहे. कमी क्षेत्रात चांगले निर्यातक्षम उत्पादन घेण्यात द्राक्ष उत्पादकांची पुढची शिकलेली पिढी पारंगत होत गेली. निर्यातीच्या कक्षा रुंदावल्या गेल्या; पण त्याचवेळी अडथळेही वाढले. 'पिकविता येते पण विकता येत नाही', या म्हणीचा प्रत्यय द्राक्ष बागायतदार घेत आहेत. मोठ्या कष्टानं पिकवलेला माल खरेदीस परराज्यांतून येणारा व्यापारी येथील‌ स्थानिक भौगोलिक, व्यावहारिक परिस्थितीबद्दल अनभिज्ञ असतो. त्या व्यापाऱ्यास द्राक्षमाल दाखविण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाणे, बँकांची माहिती, खोकी‌-क्रेट्सची उपलब्धता, मजुरांचे नियोजन, वाहतुकीच्या साधनांची जुळवाजुळव करताना मेटाकुटीला येणारा शेतकरी विक्रीसाठी अपुरा पडतो. मग त्यातून पायलट नावाची व्यवस्था उभी राहिली आहे. 

सटाण्यात २०१७ पासून फसवणुकीत वाढ 

सटाणा : बागलाण तालुका व्यापाऱ्यांकडून फसलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. कोकणगाव फाटा (ता. निफाड) येथील प्रवीण शिंदे या व्यापाऱ्याने २०१८ मध्ये संजय वाघ कऱ्हे (ता. बागलाण), श्रीपूरवडे येथील रामचंद्र कापडे, दिलीप गांगुर्डे, कऱ्हे येथील योगेंद्र निकुंभ, अमरावती पाडे येथील गोपा गवळी, घमा गवळी या शेतकऱ्यांच्या मिळून एक कोटी ४२ लाख चार हजार रुपयांची फसवणुकीची तक्रार आहे. मार्च २०१७ पासून प्रकार वाढले. अनिलभाई वल्लभभाई वसोया (गांधीनगर, गुजरात) व अभिमान निंबा पगार (मूळगाव उत्राणे, हल्ली मुक्काम पुणे) यांच्या विरोधात तक्रारी झाल्या. 

फसवणुकीच्या प्रकाराने द्राक्ष बागावर रोटर 

चांदवड : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना लबाड व्यापाऱ्यांनी चुना लावला आहे. भोयेगाव, वडनेरभैरव, राहुड, दुगाव, पिंपळणारे, निमोण, आहेरखेडे येथील शेतकऱ्यांचे द्राक्षे, कांदा व मक्याचे लाखो रुपये गेल्या आठ-दहा वर्षांत व्यापाऱ्यांनी बुडवले आहेत. या फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी अनेक उंबरठे झिजविले. यातील काहींनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. मात्र अजूनही न्याय मिळाला नाही. दुगावच्या दिगंबर सोनवणे यांनी तर व्यापारीवर्गाच्या या त्रासाला कंटाळून द्राक्षाची बागच काढून टाकल्याचे सांगितले. फसवणारे बहुतांश जिल्ह्याबाहेरील तर काही राज्याबाहेरील असतात. स्थानिक दलालांच्या माध्यमातून आपलं जाळं पसरवतात. पहिल्यांदा याच दलालांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विश्र्वास संपादन करतात. खरेदी केलेल्या शेतमालाची काही आगाऊ रक्कम देतात अन् मालाची खरेदी केल्यानंतर मात्र पसार होतात. असेच अनेक शेतकरी नाडले गेलेत. काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तर चक्क उमराणा, मनमाड बाजार समितीच्या आवारात विक्री केलेल्या कांद्याची व मक्याची रक्कम गेल्या दोन वर्षांपासून मिळालेली नाही. याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वास्तविकपणे या शेतकऱ्यांची रक्कम या बाजार समितीने देणे अपेक्षित होते. 

मालेगावला आठ कोटींची फसवणूक 

मालेगाव : पाच वर्षांत तालुक्यातील द्राक्षबागा कमी झाल्याने फसवणुकीच्या प्रकारांनाही आळा बसला आहे. येसगाव, मथूरपाडे पट्ट्यात काही प्रमाणात अर्ली द्राक्ष घेतली जातात. गारपीट काळात किंवा पाणी लागलेली द्राक्षाचे आणि खोक्याचेही पैसे दिल्लीतील व्यापारी देत नाही, असे द्राक्ष उत्पादक राजेंद्र भवर यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी दाभाडी येथील धनराज निकम, आघार व सातमाने येथील दोन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. रोहित नावाच्या व्यापाऱ्याने आरजेसी दिल्ली या फर्ममार्फत द्राक्ष खरेदी केली, मात्र मालेगाव, बागलाण परिसरातील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची ही रक्कम सुमारे आठ कोटी होती. श्री. निकम यांची चार लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाली होती. तडजोडीनंतर एक लाख २० हजार रुपये मिळाले. अनेक द्राक्ष उत्पादकांना २५ ते ५० टक्के रक्कम मिळाल्याचे श्री. निकम यांनी सांगितले. हा विवाद तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्लीदरबारीही पोचला होता. तालुका पोलिस ठाण्यात अडीच वर्षांपूर्वी कांदा विक्रेत्यांच्या फसवणुकीचा एकमेव गुन्हा दाखल आहे. मुंगसे येथील व्यापाऱ्याने सुमारे पावणेतीन कोटींची फसवणूक केल्यानंतर त्याची जमीन, मालमत्ता जप्त करून लिलाव झाला. या रक्कमेतून शेतकऱ्यांना बाजार समितीने नुकसानीच्या तुलनेत पैसे अदा केले. 

शिबडीवाला ते पायलट नावाची व्यवस्था

बाजारातील थोडीफार माहिती असलेला व्यापारी जवळ बाळगणे याला प्रचलित भाषेत पायलट म्हटलं जाते. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून ‘पायलट’ असा शब्दप्रयोग द्राक्षनगरीत प्रचलित झाला आहे. उत्पादकाला अशा पायलट लोकांची खातरजमा ठेवावी लागते. व्यापाऱ्यासाठी प्रवासाला गाडीची पूर्तता करण्यासाठी स्थानिक माहीतगारांना व्यापारी कामास ठेवतो. अशा पायलटला दिल्या जाणाऱ्या सेवासुविधा अन् शेतकऱ्यांशी व्यवहार करण्याचे या पायलटला स्वातंत्र्य असते. हे पायलट द्राक्ष उत्पादकासोबत व्यवहार करताना पैशांची हमी घेतात अन् व्यापारी पळून गेल्यानंतर ही कथित पायलट मंडळी स्वतःही अडचणीत येतात. व्यापाऱ्याकडे द्राक्षमाल वजन करण्यासाठी जे लोक असतात त्याला शिबडीवाला म्हटले जाते. हेच शिबडीवाले किंवा पायलट दोन-पाच वर्षांत स्वत: व्यापारी बनतात अन् पुन्हा शेतकऱ्यांच्या द्राक्षमालाचे पैसे बुडविण्याचे चक्र सुरू होते. निफाड द्राक्षनगरीत अनेक पायलट- व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्याचे द्राक्षमालाचे कोट्यवधींचे घेणे आहे. 

पैसे न देताच व्यापारी गायब

कारसूळ येथील देवेंद्र काजळे यांनी केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांतून माहिती घेतली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे द्राक्ष घेऊन पैसे न देता पळून गेलेल्या व्यापाऱ्यांची व शेतकऱ्यांची नावे व गुन्ह्याची काय कारवाई झाली. २००९ ते २०१९ पावतो माहिती मिळणेकामी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय नाशिक येथे अर्ज केला होता. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

बागलाण तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांसमोर आता छाटणी, डिपिंग, थिनिंग करणाऱ्या कुशल मजुरांचा मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. अशी कामे करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. दहा ते पंधरा जोडप्यांचा एक ठेकेदार असतो. ठेकेदार शेतकऱ्यांकडून द्राक्षबागांमध्ये लाखो रुपयांना छाटणी, डिपिंग व थिनिंगची कामे घेतात व रातोरात हे मजूर गायब होतात. एकूणच या प्रकाराला द्राक्ष बागायतदार वैतागले असून, कुशल मजुरांअभावी मोठी पंचायत झाली आहे. लाखो रुपये घेऊन पलायन करणाऱ्या या मजुरांवरही उपाययोजना करावी. - जिभाऊ कापडणीस, द्राक्ष उत्पादक, खालचे टेंभे 

द्राक्षे विक्रीची विश्वासार्ह व्यवस्था नाही. त्यामुळे दर वर्षीच आर्थिक फसवणूक होते. व्यवहारात धनादेश, बिल वगैरे काही नसते. त्यामुळे खटले न्यायालयात टिकत नाहीत. व्यापाऱ्यांकडून शिवार खरेदी करताना कृषी उत्पन्न बाजार समित्या किंवा पोलिस ठाण्याकडे त्यांची नोंद व अनामत रक्कम सक्तीची केल्यास फसवणूक टळेल. - कल्पना आवारे, शिरवाडे 

तीस वर्षांपासून फसवणूक झालेले शेतकरी सरकारचे प्रतिनिधी म्हणून खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवत आहेत. शिवार खरेदीला कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी लोकसभा किंवा विधानसभेत प्रयत्न झाले नाहीत. - योगेश रायते, खडक माळेगाव 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फसवणुकीविरोधात शेतकरी संघटनांकडून आवाज उठवला जातो. या पलीकडे काही होत नाही. शासनाने कठोर भूमिका घ्यावी अन्यथा फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकविला जाईल. - हंसराज वडघुले, शेतकरी नेते 

अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे कधी अवकळीने नुकसान होते, तर कधी परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून. यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने अवकळीबाबत कायद्यात बदल करावा तर व्यापाऱ्यांसाठी कायदा लागू करावा. - देवेंद्र काजळे, सामाजिक कार्यकर्ते 

हेही वाचा > धक्कादायक! कोरोना प्रतिबंधक फलक काढून क्वारंटाईन कुटुंब फिरतयं गावभर; नागरिकांना भरली धडकी

विक्रीतील अडचणी 

धनादेश दाखवून कोट्यवधींचे द्राक्ष व्यवहार कसे 
पायलट, शिबडीवाले यांच्यामार्फत व्यवहार 
सॉल्व्हन्सी नावाचा प्रकार अनुभवास नाही 
शिवार सौद्यांना कायद्याचे पाठबळ नाही 
उत्पादकाला पैशाची हमी देण्याची सोय नाही 
खोटा धनादेश देऊन फसविण्यावर नियंत्रण असावे 

'सकाळ'मधील बातमी दाखवून पैसे 

फसवणुकीचे प्रकार गंभीर आहे. त्यासाठीच शेतकरी फसवणूक टाळण्यासाठी पुढाकार घेतला. अपेक्षेप्रमाणे त्याला प्रतिसाद मिळतो आहे. तक्रारींचे संकलन सुरू आहे. अनेकांना पैसे परत मिळत आहेत. 'सकाळ'मधील बातमी दाखवून काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले. अनेक जण पेपरचे कात्रण घेऊन पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी पुढे येत आहेत. पोलिस ठाण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखलही घेतली जाऊ लागली आहे. आठवडाभरात त्याचे स्वरूप स्पष्ट होईल. - डॉ. प्रताप दिघावकर, विशेष पोलिस महानिरीक्षक  

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

संपादन - किशोरी वाघ

(माहिती संकलन : प्रमोद सावंत, माणिक देसाई, भाऊसाहेब गोसावी, अंबादास देवरे) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year, crores of farmers have been cheated nashik marathi news