
अबब...घोड्याची किंमत 5 कोटी! ठरतोय सारंगखेडा यात्रेचे आकर्षण
सारंगखेडा (जि. नंदुरबार) : नाशिक येथील सरदार स्टंड फार्मचे मालक असद सय्यद यांचा रावण हा घोडा सारंगखेडा यात्रेचे खास आकर्षण ठरू पाहत आहे. याला पाहण्यासाठी अश्व प्रेमींनी गर्दी केली आहे. 68 इंचीचा हा अश्व असून याची किंमत तब्बल पाच कोटी रुपये लावण्यात आली आहे.
रावणचा रूबाब राजासारखा
दिवसाला 5 लिटर दूध, 5 गावरान अंडे, एक किलो चणा डाळ, एक किलो गावरान तूप, चोकर, त्याचबरोबर एक किलो बाजरा सुका मेवा असे त्याचे खाद्य आहे. एखाद्या राजा-महाराजा सारखा रुबाब या रावणचा आहे, कारण त्याच्या देखभाल व स्वच्छतेसाठी साठी तब्बल पाच माणसे कामाला असतात. अशा या अश्वाला पाहण्यासाठी अश्व प्रेमी सारंगखेडा घोडेबाजाराकडे आकर्षित होत आहेत. संपूर्ण काळा व डोक्यावर पांढराशुभ्र टिळा यामुळे याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. मारवाड जातीचा हा घोडा असून त्याला देव मन, कंठ, कुकड नाळ, नगाडा पट्ठा, बाल भंवरी साफ अशी एकाहून एक अधिक शुभ लक्षण आहेत.
''किंमती प्रमाणचे आणि एखाद्या महाराजाला लाजवेल असा रावणचा रूबाब आहे. त्याला प्रति दिवसाला तीनशे रुपयांचे दूध द्यावे लागते, तर प्रति दिवसाला रावणला बाराशे ते पंधराशे रुपये खर्च असून त्याच्या देखभालसाठी पाच माणसे आहेत.'' - असद सय्यद, सरदार स्टंड फार्म मालक, नाशिक