esakal | मूळ विचार-उच्चारासह अहिराणी टिकविण्याची गरज ! 
sakal

बोलून बातमी शोधा

मूळ विचार-उच्चारासह अहिराणी टिकविण्याची गरज ! 

खानदेशातील मधुर व समृद्ध, खानदेशचे वैभव असलेली अहिराणी भाषा संवर्धनाचे अनेक ठिकाणी प्रयत्न होत असले, तरी ही भाषा आता बदलाच्या वळणावर येऊन ठेपली आहे.

मूळ विचार-उच्चारासह अहिराणी टिकविण्याची गरज ! 

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर : विश्‍व अहिराणी ऑनलाइन संमेलन आजपासून  सुरू होत आहे. अहिराणीचा गोडवा टिकून राहावा हा मुख्य उद्देश आहे; परंतु अहिराणी भाषेवर अन्य भाषेच्या आक्रमणामुळे तिचे मूळ स्वरूप नष्ट होत असून, इंग्रजी, हिंदी, मराठी शब्दांच्या प्रवेशाने मूळ अहिराणी शब्द हरवले आहेत. अहिराणी तिच्या मूळ विचार-उच्चारासह टिकविणे गरजेचे असून, संमेलनात यावर जोर देणे गरजेचे आहे.

आवश्य वाचा- रस्त्यावर उतरा, शेतशिवारात जा !- खासदार डॉ. भामरे

खानदेशातील मधुर व समृद्ध, खानदेशचे वैभव असलेली अहिराणी भाषा संवर्धनाचे अनेक ठिकाणी प्रयत्न होत असले, तरी ही भाषा आता बदलाच्या वळणावर येऊन ठेपली आहे. या भाषेतील स्वर, लय कायम असून, शब्द मात्र बदलू लागले आहेत. आधुनिकतेच्या नावाखाली अहिराणीचा अस्सलपणा लोप पावत आहे. मूळ भाषेतील शेकडो शब्द नष्ट झाले. त्या जागी नवे व अन्य भाषांतील शब्द आले. हा बदल स्वीकारावा की जुन्या शब्दांना चिकटून राहावे, याच संभ्रमात या भाषेचे अभ्यासक आहेत. 

अहिराणी भाषा समृद्ध

दर बारा मैलांवर भाषा बदलते, असे म्हणतात. तसेच दर पिढीमध्ये भाषेत बदल होतो. त्यानुसार अहिराणी भाषेतील होणारा बदल ठळकपणे जाणवतो. भाषेतील जुनी नावे, वस्तूंची नावे, काही शब्द, काही क्रियापदे, अनुस्वार व उच्चारातही बदल घडले. काही नवीन शब्दही उदयास आले. अहिराणी भाषा समृद्ध व विविधांगी असून, धुळे, जळगाव, नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव या तालुक्‍यांत ती बोलली जाते. खानदेशी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला, तरी कुटुंबात अहिराणीच बोलतो. 

आवश्य वाचा- बालवयात इतके क्रौर्य आले कुठून? 

आधुनिकतेमुळे नावांमध्ये बदल

अहिराणी भाषेतील स्त्री-पुरुषांची खास नावे होती. त्यात पुरुषांची तानकू, शेणपडू, सुपडू, बुधा, उखर्डू, दामू, झगू, नागो, झुलाल, जंगलू, ढोलू, गबा, फकिरा, कौतिक, भुता, न्हानू, झावरू, झामरू आदी, तर महिलांची शेनपडी, बायटी, झिपरी, झामरी, झामी, ढेमा, खटी, ठगी, धुडकी, झिंगी, गोजर, सुंदर, नबी, काशी, सुपडी, चिंधी अशा नावांचा समावेश होतो. आधुनिकतेमुळे ही नावे हद्दपार झाली असून, नट-नट्यांच्या नावांचा प्रभाव वाढला. पूर्वी शर्टाला कुडची किंवा बुशकोट, शेतात वापरल्या जाणारा फडक्‍याला धुडा, कुलपाला कुष्टाय, किल्ला किंवा टेकडीला बल्ला, विहिरीला हेर, गवारला वांझ्या, धुराला धुक्‍कय, ठेच्याला खुडा, तांब्याला गट्टू, शिंपी, टेलरला शिपा म्हटले जायचे. हे शब्द आता केवळ वृद्धांच्याच तोंडून ऐकू येतात. आधुनिक वस्तू आल्याने पूर्वीची आधली, बुधलं, भटूर (सर्व भांडी), दमडी, खडकू, शी-वराटा (पाटा-वरवंटा), भोयर, साटलं, दुशेर ही नावेही लोप पावली. 

काही गावांची नावेही अपभ्रंशामुळे अहिराणी झाली होती. धुळ्याला पूर्ण खानदेश ‘धुय्यं’ म्हणायचे. आता धुळं तर काही धुळे व्यवस्थित उच्चारतात. मोटारसायकलला तिच्या विशिष्ट आवाजावरून फटफटी म्हटले जाई. फळातल्या गराला दय, खराब झालेल्या खाद्यपदार्थाच्या चवीला व वासाला बाकस, दुष्काळाला दुष्काय, वेडाला बांगीफॅट (शिवराळ प्रयोग), पुतण्या-पुतणीला डिकरा-डिकरी, पतीला दाद्या (शिवराळ), सुनेला हू किंवा वहू, भावाच्या सुनेला डिक्कर हू, आजीच्या आईला किंवा सासूला बोय, आजोबांच्या वडिलांना बाप्पा, आईला माय, आईच्या जेठाणीला मोठमाय, असे म्हटले जाई. आजच्या तरुण पिढीला अनेक अहिराणी नातीही कळत नाहीत. 

महत्वाची बातमी- सरपंच व्हायचेय मग ही परीक्षा पास असणे बंधनकारक

सांस्कृतिक ठेवाही लोपला 
अहिराणीतील जात्यावरील, आखाजीची, लग्नाची गाणी खानदेशचा सांस्कृतिक ठेवा होता. प्रत्येक गावात अशी गाणी म्हणणाऱ्या दोन-तीन आजीबाई हमखास असत. आता कालपरत्वे हा सांस्कृतिक ठेवाही गायब झाला असून, एखाद-दुसऱ्या गावातील आजीबाईच्या तोंडून ही गाणी ऐकू येतात. 

गोडवा जपण्याची गरज 
शब्दांत, नावात व उच्चारात आधुनिकतेमुळे आणि वेगवेगळ्या भाषांच्या आक्रमणामुळे अहिराणीचे अस्सलपण लुप्त झाले. बहुतांश सुशिक्षित कुटुंबे आपल्या पाल्यांना अहिराणीपासून दूर ठेवतात. अहिराणीत अन्य भाषांपेक्षा वेगळाच गोडवा असल्याने आणि हीच आपली खरी सांस्कृतिक ओळख असल्याने अहिराणी टिकावी, असा ज्येष्ठांचा आग्रह आहे. अर्थात कालपरत्वे अहिराणीचे बदलते स्वरूप स्वीकारावे लागेल. मात्र, भाषा टिकविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेच लागतील.

 संपादन- भूषण श्रीखंडे