Latest Marathi News | सुटीच्या दिवशी लाच घेणारा भूमिअभिलेख लिपिक जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe News

Dhule News : सुटीच्या दिवशी लाच घेणारा भूमिअभिलेख लिपिक जाळ्यात

धुळे : शिंदखेडा येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील छाननी लिपिकाला २० हजारांची लाच घेताना रविवारी (ता.८) दुपारी जळगावच्या ‘एसीबी’च्या पथकाने धुळ्यातील भूमिअभिलेख कार्यालयात पकडले.

लाचखोर लिपिकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सुशांत श्‍यामप्रसाद अहिरे असे या लाचखोर लिपिकाचे नाव असून, लाच देण्यासाठी त्याने सुटीच्या दिवशी संबंधिताला थेट कार्यालयात बोलविले होते हे विशेष.

जळगाव येथील म्हाबळ रोडवरील संभाजीनगर येथील ३९ वर्षीय तक्रारदाराने शिंदखेडा येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात करार करून काम घेतलेल्या बेटावद गावातील चार शेतजमीन गटाचे हद्द कायम पोटहिस्सा मोजणीसाठी अतितातडीचे चलन भरून मोजणी अर्ज सादर केला होता. (Bribe taker on holiday In land records clerk Dhule News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Nashik News: बसगाड्या धावतात फलकाविना! बस कोठून कोठे जाणार हे कळून येत नसल्याने प्रवाशांची अडचण

हे काम करून देण्यासाठी छाननी लिपिक सुशांत अहिरे (३९) याने तक्रारदाराकडे ११ नोव्हेंबर २०२२ ला ४० हजार रुपयांची मागणी केली. त्याच दिवशी २० हजार रुपये रोख स्वीकारून उर्वरित २० हजार रुपये काम झाल्यावर देण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने जळगाव ‘एसीबी’कडे तक्रार केली.

त्यानुसार १४ नोव्हेंबर २०२२ ला व ६ जानेवारी २०२३ ला ‘एसीबी’च्या पथकाने केलेल्या पडताळणीदरम्यान अहिरे याने २० हजार रुपये घेण्याची संमती दर्शविली. रविवारी (ता. ८) धुळे येथील उपअधीक्षक, भूमिअभिलेख कार्यालयात अहिरे याने तक्रारदाराला बोलवून घेतले, त्याच्याकडून २० हजारांची लाच स्वीकारताना ‘एसीबी’च्या पथकाने पकडले.

अहिरे याच्यावर धुळे शहर पोलिस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, ईश्वर धनगर, बाळू मराठे, श्री. महाजन, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा: Nashik News : निसर्गनगरीला कचऱ्याची बाधा! दुर्गंधी वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात