डेंगी, मलेरिया फैलावावर नगरसेवकांचे मौन 

cidco nagarsevak.jpg
cidco nagarsevak.jpg

नाशिक : विधानसभा आचारसंहितेनंतर सिडको प्रभाग समितीची सभा "तीच काडी अन्‌ तोच गुल' या उक्तीप्रमाणे झाल्याची बघायला मिळाली. त्याच त्या समस्यांवर अधिकाऱ्यांनी गपगुमान माना डोलवत ऐकून घेणे, सभेच्या शेवटी सभापतींनी सर्व नगरसेवकांचा सारांश ऐकून दाखविणे, त्यातील एखाद्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर रागविल्यासारखे दाखवून आपण सभापती असल्याची जाणीव सभागृहाला करून देणे, हेच शनिवारी (ता. 30) झालेल्या सभेत बघायला मिळाले. सिडकोतील नागरिकांच्या समस्या वाढत असून, डेंगी, मलेरियाने नागरिक बेहाल झाले आहेत. त्यावर एकाही नगरसेवकाने बोलू नये याबाबत कमालीचे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

प्रश्‍नांसंदर्भात अधिकाऱ्यांना धरले धारेवर

प्रभाग समितीची बैठक सभापती दीपक दातीर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपस्थित नगरसेवकांनी प्रभागातील प्रश्‍नांसंदर्भात अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नगरसेवक श्‍याम साबळे, सुदाम डेमसे, मुकेश शहाणे, प्रवीण तदमे, कल्पना पांडे, संगीता जाधव, पुष्पा आव्हाड, भाग्यश्री ढोमसे, नीलेश ठाकरे, किरण गामणे, छाया देवांग, सुवर्णा मटाले, मनीषा संधान, डी. जी. सूर्यवंशी, भगवान दोंदे, प्रतिभा पवार आदी उपस्थित होते. 

सिडको प्रभाग सभेत त्याच त्या समस्यांवर चर्चा 

नगरसेविका कल्पना पांडे यांनी प्रभाग 24 येथील गोविंदनगरमधील जिजाऊ हॉल दहा वर्षांपासून कुठल्याही प्रकारचे शुल्क न भरता संबंधितांनी वापरला. काही महिन्यांपूर्वी महापालिकेने सर्वच मिळकतींना सील लावले होते. मात्र, ही मिळकत क्‍लार्कने परस्पर अनामत रक्कम स्वीकारून हॉलची चावी दिल्याने या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत असल्याचा आरोप पांडे यांनी केला. सुवर्णा मटाले यांनी प्रभाग 28 येथील ड्रेनेजचे पाणी नाल्यात सोडल्याचे निदर्शनास आणून दिले. नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी घंटागाडी ठेकेदार हा महापालिकेचा जावई आहे का, असा संतप्त सवाल करत घंटागाडीचा प्रश्न मांडला.

घड्यावरील मांस विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश

वर्कऑर्डर असतानादेखील खड्डे बुजविण्याचे पॅचवर्क काम झाल्याने महापालिकेचे पैसे वाया गेल्याचा आरोप केला. नगरसेवक मुकेश शहाणे यांनी प्रभागातील मोकाट जनावरांचा प्रश्‍न समोर आणला. घराबाहेर झोपलेल्या एका महिलेच्या अंगावर मोकाट जनावर गेल्याचे निदर्शनास आणत प्रशासनाने पुन्हा एकदा मोकाट जनावरे पकडण्याचे आवाहन केले. नगरसेविका किरण गामणे यांनी मोरवाडी परिसरात पाणीपुरवठा विस्कळित झाल्याचे निदर्शनास आणून दिले. नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनी प्रभागात सफाई कर्मचारी वाढविण्याची मागणी केली. प्रभाग सभापती दातीर यांनी उघड्यावरील मांस विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश दिले.

कचराप्रश्नी तत्काळ व्यवस्था करण्याची मागणी

नगरसेवक डेमसे यांनी कचरा डेपोच्या काळ्या पाण्याची शिक्षा शेतकऱ्यांना होते. कचरा डेपोचा प्रश्‍न, परिसरात फवारणीचा प्रश्‍न, आरोग्याचा प्रश्‍न याबाबत तत्काळ व्यवस्था करण्याची मागणी केली. नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांनी रस्त्याच्या बाजूला होणारा कचरा, घंटागाडी, नाले स्वच्छता होत नसल्याने संपूर्ण प्रभागात आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित होत आहे, असे सांगत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com