esakal | ठेवीदारांची 10 कोटींवर फसवणूक 
sakal

बोलून बातमी शोधा

ठेवीदारांची 10 कोटींवर फसवणूक 

वीदारांना आकर्षक व्याजदरासह प्रेक्षणीय सहल व सोने चांदीचे आमिष दाखविले. ठेवीदारांकडून सुमारे 10 कोटींहून अधिक रकमेच्या ठेवी स्वीकारून कार्यालय बंद करीत संचालक फरार झाले.

ठेवीदारांची 10 कोटींवर फसवणूक 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे  : नाशिकस्थित माउली मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शिरूड (ता.धुळे) येथील कार्यालयाने येथील ठेवीदारांना आकर्षक व्याजदरासह प्रेक्षणीय सहल व सोने चांदीचे आमिष दाखविले. ठेवीदारांकडून सुमारे 10 कोटींहून अधिक रकमेच्या ठेवी स्वीकारून कार्यालय बंद करीत संचालक फरार झाले. 1 हजार 461 ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी संचालकांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

गोंदूर येथील इलेक्‍ट्रिक दुकानचालक किशोर चिंधू पाटील (वय 46) यांनी आज तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की विष्णू रामचंद्र भागवत (रा. गवंडगाव, ता. येवला जि. नाशिक, ह. मु. नाशिक) याच्यासह अन्य संचालकांनी माउली मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची ऑक्‍टोबर 2015 मध्ये स्थापन केली. विष्णू भागवत याच्यासह काही अज्ञात संचालकांनी पूर्वनियोजित कट रचला. ठेवीदारांना रोख स्वरूपाच्या ठेवी ठेवण्यास प्रोत्साहित केले. त्यापोटी आकर्षक व्याजदरासह विविध प्रेक्षणीय सहलीचे स्थळ, तसेच 
सोने-चांदी देण्याचे आमिष दाखविले. को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे स्थानिक प्रतिनिधींकडून शहरासह जिल्ह्यात प्रचार केला. सोसायटीचे तालुका कार्यालय शिरूड (ता. धुळे) येथे सुरू केले, तेथे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करीत ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारल्या. ठेवींची मुदत पूर्ण झाल्यानंतरही ठेवीदारांचे पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. ठेवीदारांची ओरड सुरू असताना शिरूड येथील कार्यालय बंद करून कर्मचारी व अधिकारी पसार झाले. एकूण 1 हजार 461 ठेवीदारांनी सोसायटीत 10 कोटी 29 लाख 41 हजार 956 रुपयांची गुंतवणूक केली होती. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात संबंधित एका संस्थाचालकासह अन्य संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे तपास करीत आहेत. 

नक्की पहा : केरळला फिरण्यास नेत खोलीत डांबत अत्याचार 

"सेबी'चे दुर्लक्षच 
मैत्रेय, माउली मल्टी स्टेट सोसायटी यासारख्या फसवणूक करणाऱ्या कंपन्या ग्राहकांना आकर्षक व्याजदरासह विविध स्वरूपाचे आमिष दाखवून विश्‍वास संपादन करतात. या आमिषाला सर्वसाधारण वर्ग मोठ्या प्रमाणात बळी पडतो. मात्र अशा फसवणूक करणाऱ्या सोसायट्या किंवा कंपन्यांवर नियंत्रण व वचक ठेवण्यासाठी केंद्रीयस्तरीय स्थापित "सेबी' हे बोर्ड कार्यरत आहे. मात्र सेबीकडून अशा कोणत्याही स्वरूपाच्या कार्यवाही होत नाही किंवा होताना दिसून येत नाही. याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केल्याचे या फसवणुकीच्या प्रकारावरून स्पष्ट होते. 

हेपण पहा : व्हॅलेंटाईनची चॉकलेट घेवून गेली तुरूंगात 
 

loading image