धुळे: कर्जमाफीसाठी शिवसेनेचे 'जलसमाधी' आंदोलन

विजय बागल
गुरुवार, 8 जून 2017

गळ्यापर्यंत पातळी असलेल्या तापी नदीच्या पाण्यात आंदोलक उभे असून ते मागे हटत नसल्याने पोलिस हतबल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याचे पत्र मिळत नाही, तोपर्यंत जलआंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलकांनी कायम ठेवल्याने जिल्हा प्रशासन पेचात व चिंतेत पडले आहे.

निमगूळ - शेतकरी संपाला पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांवर राज्य सरकारने दोन दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास "आम्ही दोन दिवस असेच पाण्यात उभे राहू, नंतर अन्नत्याग करू, प्रसंगी जलसमाधी घेऊ' असे सांगत शिंदखेडा तालुक्‍यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बुधवारपासून साहूर (ता. शिंदखेडा, जि. धुळे) गावालगत तापी नदीपात्रात जलआंदोलन सुरू केले. ते अद्याप सुरूच आहे. रात्रभर पाच ते सहा आंदोलक कार्यकर्ते पाण्यातच उभे होते.

गळ्यापर्यंत पातळी असलेल्या तापी नदीच्या पाण्यात आंदोलक उभे असून ते मागे हटत नसल्याने पोलिस हतबल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याचे पत्र मिळत नाही, तोपर्यंत जलआंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलकांनी कायम ठेवल्याने जिल्हा प्रशासन पेचात व चिंतेत पडले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी बुधवारी दुपारी पाचनंतर मुसळधार पावसाला सुरवात झाल्याने तापी नदीची पातळी वाढती आहे. त्यात जलआंदोलनातील शिवसेनेचे कार्यकर्ते माघार घेत नसल्याने त्यांच्या मागणीचे पत्र अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सायंकाळनंतर "फॅक्‍स' केले. प्रभारी तहसीलदार रोहिदास वारुळे, मंडलाधिकारी एम. एन. शास्त्री, करमणूक कर निरीक्षक पंडित धावळे, साहूरचे तलाठी मनोहर पाटील आदी संबंधित आंदोलकांची मनधरणी करण्यात गुंतलेले आहेत.

आंदोलक पाण्यात आणि महसुली अधिकारी, पोलिस काठावर असे चित्र रात्री दहानंतरही कायम आहे. आंदोलनात ग्रामीण जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंखे, उपजिल्हाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे, तालुकाप्रमुख विश्‍वनाथ पाटील, कल्याण बागल, शहरप्रमुख चेतन राजपूत, राजू रगडे, मयूर निकम, गिरीश पाटील, हिरालाल बोरसे आदी सहभागी आहेत. रात्रभर जनआंदोलन सुरु आहे. रात्रभर शानाभाऊ सोनवणे, राजू रगडे, मयूर निकम, गणेश भदाणे, राकेश राजपूत, कैलास ठाकूर , योगेश सोनवणे, राकेश सोनवणे, हितेंद्र सोनवणे पाण्यात होते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन 
धुळे - शेती कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यात एक जूनपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाची तीव्रता कायम असून शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिरूड चौफुली (ता. धुळे) येथे बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे पाच तास वाहतूक ठप्प झाली. संतप्त आंदोलक शेतकऱ्यांनी दूध, भाजीपाला रस्त्यावर ओतत सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तालुका पोलिसांनी आंदोलकांना अटक करीत वाहतूक सुरळीत केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेती आणि शेतकऱ्यांचे दु:ख कळत नाही, असे म्हणत आंदोलक निषेधाच्या घोषणा देत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे, प्रभाकर पाटील, कमलाकर गर्दे, चितेश कुळकर्णी, अंकुश देवरे, अमोल पाटील, विनोद बच्छाव, किशोर गायकवाड, अभिजित राजपूत, सुरेश पाटील, बंडू पवार आंदोलनात सहभागी झाले. 

लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन 
धुळे - सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे नेते कॉ. किशोर ढमाले, शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रवी देवांग यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार अनिल गोटे, आमदार कुणाल पाटील, आमदार डी. एस. अहिरे यांच्या धुळे शहरातील निवासस्थानाजवळ बुधवारी आंदोलन झाले. पंधरा ते वीस किलोमीटर पायपीट करत दोन हजारांवर आदिवासी व इतर घटकातील महिला, पुरुष शेतकऱ्यांनी शेती कर्जमाफीसह विविध मागण्यांचे निवेदन लोकप्रतिनिधींना दिले. खोट्या शेतकरी नेत्यांशी चर्चा करून संप संपला, असे जाहीर करण्याचा प्रयत्न युती सरकारने केला. संपात फूट पाडण्याचा निष्फळ प्रयत्न सरकार करीत आहे. तो धुडकावून शेतकऱ्यांनी संप सुरूच ठेवला असून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी ढमाले, देवांग यांनी जाहीर सभेत केली. दिवसभर चाललेल्या विविध आंदोलनांमुळे जिल्हा ढवळून निघाला आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
मुख्यमंत्री येईपर्यंत जाळू नका; शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून केली आत्महत्या
तिडके, डोईफोडेचे अपराध अन् निशब्द पंकजा
पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय​
#स्पर्धापरीक्षा - बुद्धिबळ : कार्लसनची जगज्जेतेपदाची हॅट्ट्रीक​
शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेले सरकार आंदोलनावरून काँग्रेस, माकपचे टीकास्त्र​
जनावरे खरेदी-विक्री निर्बंधास सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Web Title: Dhule news Shiv Sena agitation against BJP on farmers loan waive