Dhule News : कचरा ठेका वाद; आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांची उच्चस्तरीय चौकशी करा | Garbage contract dispute Conduct high level inquiry of Commission shiv sena request to municipal corporation Dhule News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Municipal Corporation

Dhule News : कचरा ठेका वाद; आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांची उच्चस्तरीय चौकशी करा

Dhule News : शहरातील कचरा संकलनाच्या ठेक्यात महापालिकेचे आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांची भूमिका संशयास्पद आहे, असा गंभीर आरोप करत या दोन्ही अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने विभागीय आयुक्त नगरसचिवांकडे केली आहे.

या प्रकरणी कार्यवाही न झाल्यास महापालिकेसमोर सत्याग्रह आंदोलन करू व त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्यास विभागीय आयुक्त जबाबदार असतील, असा इशाराही दिला आहे. (Garbage contract dispute Conduct high level inquiry of Commission shiv sena request to municipal corporation Dhule News)

धुळे शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिकेने ठराव करून स्वयंभू ट्रान्स्पोर्ट (पुणे) या कंपनीला सात वर्षांसाठी दिले आहे.

५६ कोटी रुपयांच्या ठेक्याचे काम गेल्या १४ महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात ठेका दिल्यानंतरही धुळे शहरातील कचऱ्याची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

ठेकेदाराचे १२ महिन्यांचे एकूण आठ कोटी दहा लाखांचे देयक मनपा प्रशासनाने मंजूर केले असून, शासनाच्या निर्देशानुसार विविध कर कपात करून सात कोटी ७५ लाखांचे बिल स्वयंभूला अदा झाले आहे.

प्रशासनाकडे असंख्य तक्रारी

स्वयंभूला बिल अदा झाले असले तरी धुळे महापालिकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांनी, स्थायी समिती सदस्यांनी कचरा संकलनासह ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण होत नसल्याच्या असंख्य तक्रारी प्रशासनाकडे केल्या.

घंटागाड्या बंद असणे, गटार भुगली न उचलणे, कचऱ्याचे वर्गीकरण नसणे आदी कारणांमुळे ठेकेदाराला तीन लाख ७१ हजार रुपये दंड करण्यात आला. याचा अर्थ घंटागाड्या बंद ठेवल्या जातात, कचऱ्याचे वर्गीकरण होत नाही हे स्पष्ट आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पाहणी केली नसती तर...

धुळे शहराच्या जागरूक महापौर प्रतिभा चौधरी यांनी ५ मे २०२३ ला शहरातील नवरंग पाण्याची टाकी येथील दुय्यम कचरा संकलन केंद्राला भेट दिली. त्या वेळी ओला-सुका कचरा एकत्र वाहून नेणे, २४ घंटागाड्या बंद आढळणे, कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधणे न पुरविणे असे गैरप्रकार समोर आले.

या प्रकरणात स्वयंभूला १८ हजार ५२५ रुपये दंड करण्यात आला. दरम्यान, महापौर श्रीमती चौधरी यांनी ही पाहणी केली नसती तर स्वयंभूचा हा गैरव्यवहार सुरूच राहिला असता. अर्थात गेल्या सहा-सहा महिन्यांपासून ठेकेदार भ्रष्टाचार करत होता हे सिद्ध झाल्याचे शिवसेना (उबाठा) पक्षाने म्हटले आहे.

ठेकेदार पाठीशी का?

शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे कचरा संकलन केंद्रावर पुराव्यासह आंदोलन केले. मात्र या प्रकरणात ठेकेदार आर्थिक देवाणघेवाण करून मनपा प्रशासनातील प्रमुख अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांना मॅनेज करत आहे.

हप्ते सुरू असल्याने ठेकेदाराच्या भ्रष्टाचाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला.

आयुक्त देवीदास टेकाळे, करारनाम्यावर स्वाक्षरी करणारे अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांना भ्रष्टाचाराचे पुरावे मिळूनदेखील ठेकेदाराला ते पाठीशी का घालत आहेत? त्यामागे काही आर्थिक देवाणघेवाण झाली आहे का? याचा सोक्षमोक्ष लावण्यात यावा यासाठी उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाने केली आहे. याबाबत ॲन्टिकरप्शन ब्यूरोकडेही तक्रार केल्याचे पक्षाने म्हटले आहे.

कारवाई न झाल्यास आंदोलन करू, असे शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, संघटक देवीदास सोगारी, राजेश पटवारी, ललित माळी, भरत मोरे, माजी महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, प्रफुल पाटील आदींनी म्हटले आहे.