नियम डावलून पदोन्नतीसाठी शिफारस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

अर्थ विभागात पदोन्नती घेऊन केवळ तीन वर्षे झाली असताना पुन्हा पदोन्नतीसाठी फाइल फिरविली जात आहे. मुळात अर्थ विभागाकडून फाइल मंजूर करून सामान्य प्रशासन विभागाकडे कशी फिरविण्यात आली, हा मोठा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

जळगावः शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे. परीक्षा उत्तीर्ण नसल्यास एका पदावर किमान पंधरा वर्षे सेवा पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा नियम असताना अर्थ विभागात पदोन्नती घेऊन केवळ तीन वर्षे झाली असताना पुन्हा पदोन्नतीसाठी फाइल फिरविली जात आहे. मुळात अर्थ विभागाकडून फाइल मंजूर करून सामान्य प्रशासन विभागाकडे कशी फिरविण्यात आली, हा मोठा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

जिल्हा परिषदेतील अर्थ विभागात काही पद रिक्‍त आहेत. या रिक्‍त जागा पदोन्नती देऊन भरण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदावरून वरिष्ठ सहाय्यक लेखा, वरिष्ठ सहाय्यक लेखा पदावरून कनिष्ठ लेखाधिकारी आणि कनिष्ठ लेखाधिकारी पदावरून सहाय्यक लेखाधिकारी या पदासाठी पदोन्नती देण्यात येणार आहे. या पदोन्नतीसाठीच्या फायली अर्थ विभागाकडून मंजूर करून सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आल्या होत्या. यात काही किरकोळ त्रुटी दाखवून त्या परत पाठविण्याचे काम प्रशासन विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र, पदोन्नतीसाठी पात्र असल्याची तपासणी झालेली नाही. 

नक्की पहा ः टि-शर्ट वरील वाचला मजकूर...अन्‌ सापडला डॉक्‍टर "मुन्नाभाई' 
 

पदोन्नती घेऊन केवळ तीन वर्ष 
पदोन्नती घेण्यासाठीची विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे. परंतु सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळविण्यासाठी कर्मचाऱ्याने त्या पदावर किमान पंधरा वर्षे सेवा पूर्ण करणे आवश्‍यक आहे. हा नियम असताना जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागात कनिष्ठ लेखाधिकारी या पदावर 2016 मध्ये पदोन्नती घेऊन तीनच वर्ष झाले असताना सहाय्यक लेखाधिकारी पदाकरिता पदोन्नती घेण्यासाठी फाइल फिरविली जात आहे. यात पाच- सहा जणांनी शिफारस केली असून, यातील एक देखील कर्मचारी परीक्षा उत्तीर्ण झालेला नाही किंवा पदावर पंधरा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नसल्याची वस्तुस्थिती आहे. 

हेपण पहा ः  लंघुशंकेसाठी थांबला...अन्‌ झाला अनर्थ
 

शासन आदेश काय म्हणतो 
पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळविण्यासाठी कर्मचाऱ्याने पदावर किमान पंधरा वर्ष सेवा पूर्ण करणे अनिवार्य आहे. यामुळे संबंधित पदावर कर्मचाऱ्याची पंधरा वर्ष सेवा पूर्ण झाल्याची तारीख किंवा त्याच्या वयाची 50 वर्ष पूर्ण झाल्याची तारीख यापैकी जे अंतर घडेल, त्यानंतर जवळची तारीख कर्मचाऱ्यास पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याची तारीख समजण्यात येईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news jilha parishad Recommendation for promotion below the rules