ऑनलाइनमुळे "सेवायोजन'ची नावनोंदणी झाली सुकर

ऑनलाइनमुळे "सेवायोजन'ची नावनोंदणी झाली सुकर

जळगाव : सेवायोजन कार्यालय जानेवारी 2013 पासून ऑनलाइन करण्यात आले. यात आतापर्यंत जिल्ह्यातून 2 लाखांवर बेरोजगारांनी नावनोंदणी केली आहे. यातील 51 हजार बेरोजगार युवकांना प्रशिक्षणासह रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. 

काही वर्षांपूर्वी दहावी, बारावीचे निकाल घोषित होताच विद्यार्थी सेवायोजन केंद्राकडे नावनोंदणीसाठी रांगेत उभे राहून सेवायोजन कार्ड काढायचे. यामुळे रोजगार आणि स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी करण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडत होती. कार्यालयात नोंदणीसाठी गर्दी वाढल्यामुळे अनेकदा कार्यालयात पोलिस बंदोबस्तही ठेवावा लागत होता. मात्र, ही प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने या कार्यालयामध्ये शांतता पसरली आहे. वर्षानुवर्षे सेवायोजन (एम्प्लॉयमेंट) कार्यालयाकडून नोकरीचे कॉल येत नसल्याने अनेकांनी हे कार्ड काढण्याकडे दुर्लक्ष केले होते. शासकीय किंवा खासगी नोकरीसाठी एम्प्लॉयमेंट कार्ड आवश्‍यक बाब होती. मात्र, काळानुरूप संगणकाच्या युगात नोकरीची संधी संकेतस्थळावर उपलब्ध झाल्याने अनेक विद्यार्थी तथा बेरोजगारांनी एम्प्लॉयमेंट ऑफिसकडे पाठ फिरवत घरबसल्या ऑनलाइन नोंदणीला प्राधान्य दिले आहे. शासकीय खातेप्रमुख आणि खासगी कंपन्या पूर्वी सेवायोजन कार्यालयाकडे व्यक्तीची मागणी करायचे, त्यानुसार त्यांना सेवायोजना कार्यालयाकडून बेरोजगारांची नावे पुरविल्या जायची. आता हे काम www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाइन केले जाते. सेवायोजन कार्यालयात लागत असलेल्या रांगा आता कालबाह्य झाल्या आहेत. नूतनीकरण करणे हा विषय सेवायोजन केंद्रात संपुष्टात आणला आहे. आता तो उमेदवार केव्हाही, कुठेही लॉग-इनने आणि पासवर्ड घेऊन आपली माहिती अपडेट करू शकतो. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये आजपर्यंत 2 लाख 2 हजार 715 बेरोजगारांनी नोंदणी केली असून, यातील 51 हजार 58 उमेदवारांनी रोजगार व प्रशिक्षणाद्वारे यश प्राप्त झाले आहे.

जिल्ह्यात चार रोजगार मेळावे 
सन 2019- 20 या वर्षात जिल्ह्यातील चार ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे उदिष्ट होते. त्यात जळगाव येथे दोन तर भुसावळ व गाडेगाव (ता. जामनेर) येथे प्रत्येकी चार रोजगार मेळाव्यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात 928 बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदवला. यातून 376 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. यासाठी महास्वयंम ही साइट वेळोवेळी अपडेट करणे गरजेचे असून, यातील नवनवीन माहितीमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होत असल्याचे सेवायोजन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

कार्यालयाचे स्थलांतर 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटमध्ये असलेले जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र 15 फेब्रुवारीपासून शिवतीर्थ मैदानाजवळील शासकीय तांत्रिक विद्यालय आवारात नवीन जागेत स्थलांतरित करण्यात आली आहे. 

गेल्या सहा वर्षात झालेली ऑनलाइन नोंदणी 
2014- 19 हजार 469 
2015- 22 हजार 320 
2016- 18 हजार 388 
2017- 5 हजार 734 
2018- 28 हजार 220 
2019- 23 हजार 272 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com