शौचालयांच्या वापरासाठी विद्यार्थ्यांनी घातली पालकांना साद

रमेश धनगर
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

तीन गटात केली विभागणी
शाळेतील विद्यार्थांची तीन गटात विभागणी करण्यात येऊन त्यांनी ही पत्रे लिहिली. त्यात पहिला गट ज्याच्याकडे शौचालय नाही, दुसरा गट ज्यांच्याकडे शौचालय आहे आणि तिसरा गट की ज्यांच्याकडे शौचालय आहे पण ते त्याचा ते वापर करीत नाही.

गिरड (ता. भडगाव) : राज्यात सर्वत्र हगणदारीमुक्तीसाठी सर्वार्थाने प्रयत्न होत आहे. ग्रामीण भागात शौचालयांचे महत्त्व वेगवेगळ्या माध्यमातून पटवून दिले जात आहे. मात्र, तरीही उघड्यावर शौचाला जाण्याचे प्रमाण पाहिजे त्या प्रमाणात कमी झालेले नाही. आपल्या कुटुंबीयांना शौचालयाचे महत्त्व कळावे, यासाठी विद्यार्थ्यांनीच पालकांना
पत्र लिहून शौचालयांचा वापर करण्याची भावनीक साद घातली आहे.

जळगाव जिल्ह्यातील भातखंडे (ता. भडगाव) येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाने हा अनोखा उपक्रम राबविला असून त्याचे कौतुक होत आहे. "स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत संपूर्ण राज्य हगणदारीमुक्त करण्यासाठी संकल्प करण्यात आला आहे.

शौचालयांच्या बांधकामासाठी शासनातर्फे अनुदानही दिले जात आहे. मात्र, अद्यापही शौचालयाचे पाहिजे त्या प्रमाणात बांधकाम होताना दिसत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या संकल्पनेतून शाळेतील प्रत्येक विद्यार्थी आपल्या पालकांना पत्र पाठवित असून या पत्राद्वारे शौचालय बांधण्याचे भावनिक आवाहन विद्यार्थी करीत आहे. या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी शौचालयाचे महत्त्व या विषयावर आपल्या पालकांना पत्रे लिहिली आहेत. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जी. जे. पाटील व ज्येष्ठ शिक्षक तथा स्वच्छतादूत बी. एन. पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. पत्रे लिहिण्यापूर्वी स्वच्छतेसह शौचालयांचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. याबाबतीत विशेषतः महिलांनी जागरूकता बाळगून स्वतः उघड्यावर शौचाला न जाण्याची भूमिका घेतली तरच गावात शौचालयांची बांधकामे होणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी एक शौचालय बांधले जावी, यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांना शौचालयाचे महत्त्व विशद करणारे पत्र पाठवून त्यांच्यात जाणीव जागृती करून दिली आहे.

तीन गटात केली विभागणी
शाळेतील विद्यार्थांची तीन गटात विभागणी करण्यात येऊन त्यांनी ही पत्रे लिहिली. त्यात पहिला गट ज्याच्याकडे शौचालय नाही, दुसरा गट ज्यांच्याकडे शौचालय आहे आणि तिसरा गट की ज्यांच्याकडे शौचालय आहे पण ते त्याचा ते वापर करीत नाही. या प्रमाणे गट तयार तयार करून विद्यार्थ्यांनी आपापल्या पालकांना पत्रे पाठवली आहेत. ज्यामुळे पालकांची मानसिकता बदलायला या पत्रांमुळे निश्‍चित मदत होईल, असा विश्‍वास मुख्याध्यापक जी. जे. पाटील यांनी असल्याचे त्यांनी "सकाळ'ला सांगितले. शाळेने राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पत्रप्रपंचाच्या या माध्यमातून पालकांनी बोध घेऊन शौचालय बांधले व त्याचा वापर केला तर नक्कीच काही तरी फलश्रुती होणार आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Jalgaon news toilet news school student