डॉक्‍टराचा धाडसी निर्णय..स्‍वतःच उभारताय ऑक्‍सिजन उत्‍पादन संयंत्र

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार करण्यास मर्यादा येत
डॉक्‍टराचा धाडसी निर्णय..स्‍वतःच उभारताय ऑक्‍सिजन उत्‍पादन संयंत्र

शिरपूर (धुळे) : ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार करण्यास मर्यादा येत असल्याने डॉक्टरने स्वतंत्र ऑक्सिजन उत्पादन संयंत्र उभारणीला सुरवात केली आहे. येत्या काही दिवसातच तेथून २८० लिटर प्रति मिनिट क्षमतेने ऑक्सिजन तयार होणार आहे.

न्यू पल्स डायग्नोस्टिक हॉस्पिटल व कोविड क्रिटिकल केअर युनिटला नुकताच प्रारंभ झाला. दीडशे बेड्सचे हॉस्पिटल कोविड आयसीयू, व्हेंटिलेटर, २४ तास रुग्णवाहिका सेवा, इ मेडिकल आदी सुविधांनी सुसज्ज आहे. तालुक्यात कोविड रुग्णांसाठी यापूर्वी शासकीय कोविड हॉस्पिटल, शिंगावे येथील कोविड सेन्टरसह तीन खाजगी कोविड सेन्टर कार्यान्वित आहेत. मात्र आणीबाणीच्या परिस्थितीत व्हेंटिलेटरची सुविधा कुठेही नव्हती. पल्स हॉस्पिटलमुळे अत्यवस्थ रुग्णांवर उपचाराची सुविधा शहरातच उपलब्ध झाल्याने तेथे दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.

एका व्हेंटीलेटरसाठी तीन सिलेंडर

संपूर्ण १५० बेड्ससाठी ऑक्सिजन पुरवठा ठेवल्यामुळे हॉस्पिटलला दररोज मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासते. काही दिवसांपासून ऑक्सिजनचा पुरवठा ठप्प झाला आहे. ऑक्सिजन उत्पादकांना स्थानिक मागणी पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने पुरवठा कमालीचा विस्कळीत व अनियमित झाला. त्यामुळे गंभीर रुग्णांना अखंड ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आव्हान उभे राहिले. एका व्हेंटिलेटरसाठी दोन ते तीन सिलेंडरची गरज भासते. त्यामुळे अतिगंभीर रुग्णांना दाखल करावे किंवा नाही असा यक्षप्रश्न निर्माण झाला.

म्‍हणून घेतला धाडसी निर्णय

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील उत्पादकांशी संपर्क साधूनही उपयोग झाला नाही. त्यामुळे हॉस्पिटलचे प्रवर्तक डॉ. मनोज परदेशी यांनी स्वतःच ऑक्सिजन निर्मिती संयंत्र उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला. कोट्यवधींची गुंतवणूक असलेल्या या संयंत्राच्या उभारणीबाबत औपचारिकता पूर्ण झाली असून काही दिवसातच तेथे ऑक्सिजनचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईल.

असा मिळेल ऑक्सिजन

दैनंदिन २०८ लिटर प्रति मिनिट दराने ऑक्सिजन तयार करण्याची संयंत्राची क्षमता आहे. हवेतून ऑक्सिजन वेगळा करून तो शुद्ध करून घेत सिलेंडर्समध्ये भरला जातो. इतर वायू पुन्हा हवेत सोडले जातात. हा प्रकल्प पूर्णतः पर्यावरणपूरक आहे. शिरपूर-चोपडा रस्त्यावर वॉटर पार्कसमोर पल्स हॉस्पिटलच्या इमारतीलगतच हे संयंत्र कार्यान्वित केले जाणार आहे. दिवसभरात ५८ जम्बो सिलेंडर्स भरण्याची संयंत्राची क्षमता आहे.

प्रत्येक रुग्णाला ऑक्सिजन मिळावा या हेतूने सर्व १५० बेड्सची यंत्रणा आहे. मात्र ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठी समस्या उभी राहिली. त्यामुळे स्वतः संयंत्र उभारण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय गरजू रुग्णांसाठी टेलीमेडिसिन प्रॅक्टिसचीही सोय आहे. अधिकाधिक रुग्णांना एकाच छताखाली रास्त दरात उपचार देता याहेतूने सात एमडी (मेडिसिन) डॉक्टर्स व ५० जणांचा स्टाफ कार्यरत आहे. हॉस्पिटल आणि ऑक्सिजन प्लांटच्या प्रत्येक टप्प्यावर आ.अमरीशभाई पटेल, आ.कांशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

- डॉ. मनोज परदेशी, प्रवर्तक, पल्स हॉस्पिटल

संपादन- राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com