खास आहे ही बटरफ्लाय साडी; महिलांच्या नजरेला भावतेय

जगन्नाथ पाटील
Thursday, 24 December 2020

कपाटात कितीही साड्या असल्या तरी प्रत्येक नवी साडी खुणावतेच. यातही दर दोन चार महिन्यांनी नाविन्यपूर्ण साड्या बाजार दाखल होत असतात. अन महिलांना भुरळ पडत असते.

कापडणे (धुळे) : एक नूर आदमी दस नूर कपडा असे म्हटले जाते. सध्या महिला वर्गामध्ये सतत साड्या घेण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. यात गरीब श्रीमंत भेदभाव राहिलेला नाही. साडी म्हणजे भारतीय स्त्रियांच्या मनाचा हळवा कोपरा आहे. कपाटात कितीही साड्या असल्या तरी प्रत्येक नवी साडी खुणावतेच. यातही दर दोन चार महिन्यांनी नाविन्यपूर्ण साड्या बाजार दाखल होत असतात. अन महिलांना भुरळ पडत असते. सध्या खानदेशसह राज्यात बटरफ्लाय साड्यांची क्रेझ निर्माण होवून मागणी वाढली आहे. बटरफ्लायमधील विविध प्रकारांची भुरळ महिलामनावर पडली आहे.

हेपण वाचा-  मोठी बैलगाडी तयार करायला मिळेना म्हणून पोटासाठी बनविली छोटी बैलगाडी; आता महिन्याकाठी मिळतात ४५ हजार

राज्यासह देशभर विविध पोताच्या, प्रांतांतल्या, शैलीतल्या व चित्रकारीतेने सजलेल्या साड्या असतात, की महिलांचे चित्त आकर्षुन घेत असतात. नाविन्याची हौस कुणाला नसते? पण स्‍त्रियांना थोडी अधिकच असते, असे म्हटले जाते. गेल्या एक-दोन वर्षांत ’100 पॅक्ट साडी’ म्हणून वर्षात किमान शंभरवेळा साडी नेसण्याचीही टूम निघाली आणि ज्यांनी यात भाग घेतला त्यांनी मनापासून ती एंजॉयही केला आहे.

खानदेशात लग्नसराईसाठी साड्यांना मागणी
थ्रीडी बटरफ्लाय, नेट बटरफ्लाय साडी, चिकनी चमेली, लुंगी डान्स, टिश्यू, चिमणी उडाली, पावडर या साड्यांची मागणी वाढली आहे. मराठी व हिंदी चित्रपटातील प्रसिध्द गाण्यांची नावे देवून साडी विक्री वाढली आहे. दुरचित्रवाहिनीवरील मालिकांमधील अभिनेत्री वारंवार परीधान करीत असलेल्या साड्यांना त्याच मालिकेचे नाव देवून साडी व्यवसायास भरभराटी आली आहे. विशेष म्हणजे या साड्या तीनशेपासून ते तीन हजारापर्यंत उपलब्ध होतात. त्यामुळे मागणी वाढत आहे. ऑनलाईन साडी खरेदीतही वाढ झाली आहे.

साड्यांची पारख
अर्धरेशमी, रुंद काठाची, काठा पदराची, खडी कामाची, चिटाची चितार, जरतारी, जरीपदरी, जाडीभरडी, रमरम ठिपक्याची, पाचवारी, पावडा, सुरतेची, खादी कॉटन, नेट, खणांच्या साड्या आदी प्रकारे साड्यांची पारख करण्यात महिला मंडळी माहिर आहेत.

देशातील प्रत्येक राज्यात भुरळ पाडणाऱ्या साड्या
चेन्नई सिल्क (सर्वात महाग), रेशमी साड्या (प्रांतनिहाय प्रकार), कांजीवरम, पोचमपल्ली, पैठणी, इरकल, बनारसी, टसर सिल्क, युग्गा सिल्क (युग्गा रेशमी किड्यापासून), माहेश्वरी, कालुचेरी (पौराणिक कथांचे चित्रण), काश्मिरी आदी.

साडी हा महिलांच्या सौंदर्याचा अवीट ठेवा असतो. साडी ही संस्कृती रक्षक आहे. कितीही आधुनिकता आली तरी साडी महती आणि वापर कमी होणार नाही.
- इंदीरा पाटील, माजी सरपंच तथा तनिष्का गटप्रमुख कापडणे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news women saree in butterfly design