चाळीसगावच्या २० जणांचे अहवाल तपासणीसाठी रवाना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

नगरपालिकेने संपूर्ण हॉस्पिटल व परिसराचे निर्जंतुकीकरण केले. या २० जणांचे नमुने धुळे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून दोन दिवसात याचा अहवाल प्राप्त होइल​

चाळीसगावः शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचार घेऊन नाशिक येथे दवाखान्यात दाखल झालेल्या ५० वर्षीय रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याच्याशी संपर्कात आलेल्या २० जणांचे स्वॅब (नमुने) आज धुळे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. साधारणतः दोन दिवसांत त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनाने खबरदारी उपाय म्हणून ही तपासणी केल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर यांनी सांगितले.

नक्की वाचा : रस्त्यावरील बेशिस्त फळ-भाजी बाजार होणार बंद ! 

आमोदे (ता. नांदगाव) येथील ५० वर्षीय रुग्ण शहरातील लक्ष्मी नगर परिसरातील दवाखान्यात काही दिवसांपूर्वी उपचारासाठी आलेला होता. ऍन्जीओग्राफी करण्यासाठी त्याला नाशिक येथे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्याची तपासणी केली असता, त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. या पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथील आरोग्य यंत्रणेने या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या जवळपास २० जणांचे नमुने आज घेतले. यात हॉस्पिटलचे डॉक्टर, कर्मचारी, लॅब मधील कर्मचारी तसेच इतर ठिकाणी त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा समावेश आहे. नगरपालिकेने संपूर्ण हॉस्पिटल व परिसराचे निर्जंतुकीकरण केले. या २० जणांचे नमुने धुळे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून दोन दिवसात याचा अहवाल प्राप्त होइल, अशी माहिती डॉ. बाविस्कर यांनी दिली.

आर्वजून पहा : भाजपचा फौजफाटा खडसेंना घेरण्याच्या तयारीत ! 
 

५०० घरांचा सर्वे करणार
चाळीसगाव तालुक्यात अद्यापपर्यंत कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, कालच्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हॉस्पिटलच्या परिसरातील तब्बल पाचशे घरांचा सर्व्हे करण्याचे नियोजन केले आहे. यात सर्वांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, ज्या २० जणांचे अहवाल तपासणीसाठी धुळे येथे पाठवले आहेत, अशा सर्वांना अहवाल प्राप्त होईपर्यंत होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. शिवाय पुढील आदेश येईपर्यंत शहरातील संबंधित रुग्णालय बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, २० जणांचे अहवाल काय येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon twenty coron suspected report chekig Departed