साहेब!... अंत्ययात्रांमधील गर्दीला आवरा !

साहेब!... अंत्ययात्रांमधील गर्दीला आवरा !

जळगाव  : एकीकडे "अपार्टमेंट'च्या अंतर्गत प्रांगणात "किटी पार्टी'साठी जमलेल्या महिलांवर गुन्हे दाखल करण्याची तत्परता 
पोलिस यंत्रणा दाखविते. मात्र, दुसरीकडे "कोरोना'च्या उद्रेकाला कारणीभूत ठरणाऱ्या अंत्ययात्रा, मृत व्यक्तीच्या निवासस्थानी सांत्वनाला जाणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात ही यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे. 

नक्की वाचा :  जळगावात येथे होता हायप्रोफाईल कुंटनखाना; महाविद्यालयीन युवतींना घेतले ताब्यात 

अमळनेर, भडगावचे उदाहरण ताजे असताना जळगावातील वाघनगरात बाधित मृताच्या अंत्ययात्रेसाठी व त्याच्या द्वारावर समूह जमला आणि त्यातून "कोरोना'चा उद्रेक झाल्याचे गुरुवारी (21 मे) समोर आले. परंतु तरीही प्रशासन जागे होण्याची तसदी घेत नाही. तर आपणच मृत व्यक्तीच्या कुटुंबाचे तारणहार म्हणून त्या ठिकाणी द्वारावर जाऊन गर्दी करणाऱ्यांची बेफिकिरीही कमी झालेली नाही. अशांवर पोलिस यंत्रणा गुन्हे दाखल करेल का? असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. 

अंत्ययात्रेची गर्दी ठरतेय घातक 
मंगळवारी (19 मे) वाघनगरातील एक व्यक्ती "कोरोना'बाधित आढळून आली होती, तिच्या अंत्ययात्रेवेळी घराजवळ नातलग व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसले. नंतर या व्यक्तीच्या संपर्कातील पंधरा-वीस व्यक्तींचा अहवाल "पॉझिटिव्ह' आल्याने गुरुवारी (21 मे) शहरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करणाऱ्यांनीही गर्दी केली होती. त्यातूनच हा उद्रेक झाल्याचे समोर येत आहे. 

अमळनेर, भडगावचे उदाहरण 
या आधीही अमळनेर येथील महिलेचा मृतदेह अहवाल येण्याआधीच नातलगांच्या ताब्यात दिल्याने तेथील अंत्ययात्रेतही गर्दी उसळली होती. भडगावनेही तोच कित्ता गिरविला. त्यातून अमळनेर, भडगावमध्ये उद्रेक झाला. असे असताना मृत व्यक्तीचे नातलग, मित्रपरिवार काहीही ऐकायला तयार नाही आणि प्रशासन, पोलिस दलालाही त्याचे फारसे गांभीर्य नाही, अशी स्थिती आहे. 

 
थेट गुन्हे दाखल करा 
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिकरित्या झालेला असला, तरी त्याच्या अंत्यसंस्काराला 20 पेक्षा अधिक जणांनी एकत्र जमू नये, असे निर्देश आहेत. "लॉकडाउन'मुळे कलम 144 लागू असल्याने गर्दी जमल्यास कलमाचे उल्लंघन ठरते. अशा स्थितीत अंत्यसंस्कारावेळी आणि त्यानंतरही संबंधित व्यक्तीच्या घरी "द्वारा'वर येणाऱ्या अनेकांची गर्दी होताना दिसते. तीन दिवसांपूर्वी शाहूनगरातील महिलेचा "कोरोना'ने मृत्यू झाला. तिच्या अंत्ययात्रेलाही शंभरावर जमाव जमला होता. अशा लोकांवर व मृत व्यक्तीच्या नातलगांवरही गुन्हे दाखल केले पाहिजे, अशी मागणी होत आहे. 

 क्‍लिक कराः पांढरे सोने विक्रीसाठी बळीराजा होतोय पिवळा 

किती गुन्हे दाखल केले? 
"कोरोना' संसर्गाच्या या काळात "लॉकडाउन' व त्यासंबंधी विविध आदेश काढण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. त्यादृष्टीने काही दिशानिर्देशही जारी केले जात आहेत. मात्र, त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कुणाची? हा प्रश्‍न आहे. कलम 144 चे उल्लंघन होत असल्यास पोलिस यंत्रणेची ती जबाबदारी आहे, मात्र पोलिस हतबल झालेले दिसतात. "किटी पार्टी'वर कारवाई करत त्या महिलांची गुन्हेगारांप्रमाणे चौकशी करणाऱ्या पोलिस यंत्रणेने आतापर्यंत अंत्ययात्रेत गर्दी जमविणाऱ्या किती जणांवर गुन्हे दाखल केले? असा प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. 

मूर्ख नागरिकांना नाही गांभीर्य 
प्रशासन कठोरपणे प्रयत्न नाही, तर किमान प्रामाणिकपणे शिस्तीचे आवाहन करतेय. पण अंत्ययात्रेलाच नव्हे; तर कारण नसतानाही घराबाहेर पडून शहरभर हिंडण्याचा मूर्खपणा करणारे काही महाभाग आहेत. दुचाकीवर सिंगल सीटलाच परवानगी असताना दोन, तीन सीट जाताना दिसतात. भाजीबाजार, किराणा दुकानांसमोरील गर्दीही कायम आहे. नागरिकांना त्याचे गांभीर्यच नसल्याने आता हाती असलेला दंडुका चालविण्याची पोलिसांना आवश्‍यकता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com