धुळे जिल्हात नाराज गटाला सीमोल्लंघनाची वाट मोकळी ! 

निखिल सूर्यवंशी 
Thursday, 22 October 2020

एकनाथ खडसे यांच्यामुळे धुळे शहरासह जिल्हा, तसेच नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बांधणीला बळ मिळणार आहे. पुढील विधानसभेच्या निवडणुकीवेळी `राष्ट्रवादी`ला चांगला लाभ मिळू शकणार आहे. 

धुळे ः भाजपमधून सीमोल्लंघन करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा धुळे- नंदुरबार जिल्ह्यात थेट प्रभाव नसला तरी त्यांच्या अप्रत्यक्ष प्रभावाचा `राष्ट्रवादी`ला थेट लाभ मिळू शकतो. तसेच या जिल्ह्यातील भाजपच्या नाराज गटालाही खडसेंबरोबर सीमोल्लंघनाची वाट मोकळी झाली आहे. त्यांच्या `राष्ट्रवादी`तील अधिकृत प्रवेशानंतर स्थानिक पातळीवर होणाऱ्या घडामोडींकडे धुळे- नंदुरबार जिल्ह्याचे बारीक लक्ष असेल. 
 

आवश्य वाचा- देवेंद्र फडणवीसांनी माझे आयुष्य उद्धवस्थ केल्यामुळेच भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला - खडसे
 

ज्येष्ठ नेते खडसे यांना ज्याप्रकारे राज्याच्या निर्णय प्रक्रियेत डावलले जात होते. त्याप्रमाणे भाजपमधील नाराज गट, मूळ भाजपमधील पूर्वीचा निष्ठावंत गट जिल्ह्याच्या निर्णय प्रक्रियेत डावलला गेला. ज्यांनी भाजपच्या बांधणीत, पक्ष उभारणीच्या प्रक्रियेत खस्ता खाल्या त्यांच्यात जिल्हाच्या निर्णय प्रक्रियेत डावलले गेल्याची भावना आजही कायम आहे. असा निष्ठावंत गट निष्ठा प्रकट करणे आणि राग व्यक्त करण्यासाठी खडसेंबरोबर जाऊ शकतो. 

लक्ष्य स्थानिक स्वराज्य संस्था 
धुळ्यात जी मंडळी मोठ्या अपेक्षेने भाजपमध्ये गेली. नगरसेवक झाले. त्यांनी नगरसेवक म्हणून काय- काय मिरविता येईल, अशी काही स्वप्ने पाहिली. त्याची पूर्तता दोन वर्षांत होऊ शकलेली नाही. किंबहुना, सत्तेची फळे चाखता आलेली नाही. उलट ठरावीक गट वर्चस्व राखून असून त्याने नाराजांना गोंजारण्यासाठी महापालिका प्रशासनावर खापर फोडण्यात धन्यता मानली आहे. यातील नाराज गटाला खडसेंबरोबर सीमोल्लंघनाची वाट मोकळी झाल्याचे मानले जाते. परिणामी, धुळे महापालिका आणि जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता भोगणाऱ्या भाजपला टीच पोहोचविण्याचे, दरी रूदांविण्याचे काम खडसे यांच्या मदतीने होऊ शकते. या स्थितीत आगामी काळात धुळे महापालिका व जिल्हा परिषदेत भाजपचे वर्चस्व संपुष्टात आणण्याचे प्रयत्न खडसे यांच्या माध्यमातून दिसू शकतात. ही संधी साधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस, राज्याच्या सत्तेतील महाविकास आघाडी करू शकते. 

 

एकगठ्ठा मतांचा लाभ 
खडसे यांच्या `राष्ट्रवादी`मधील प्रवेशाचा लागलीच परिणाम आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीवर दिसू शकतो. भाजपमधील ज्या इच्छुकांनी एकछत्री अमल असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्व-संख्याबळावर उमेदवारीचे, आमदारकीचे इमले बांधले आहेत. त्यांना खडसे यांच्या पक्ष बदलाच्या निर्णयाचा धक्का बसला आहे. खडसे यांच्यामुळे धुळे शहरासह जिल्हा, तसेच नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बांधणीला बळ मिळणार आहे. पुढील विधानसभेच्या निवडणुकीवेळी `राष्ट्रवादी`ला चांगला लाभ मिळू शकणार आहे. वेगळ्या विचाराने भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठीशी असलेला दोन्ही जिल्ह्यातील लेवा- पाटील, गुजर समाज खडसे यांच्या नेतृत्वात एकत्र येऊ शकेल. तसेच `ओबीसी`मध्ये समाविष्ट वाणी समाज आणि तत्सम संवर्गाचे समुदाय आदींच्या एकगठ्ठा मतांचे ध्रुवीकरण `राष्ट्रवादी`त होऊ शकते. 

आवर्जून वाचा-  माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी फडणवीसांनी पोलिसांना केला फोन - खडसे
 

पक्ष प्रभावाची पवारांची स्वप्नपूर्ती... 
राष्ट्रवादी काँग्रेसची ग्रामीण जनतेशी नाळ जुळली आहे. किंबहुना, या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या माध्यमातून वेळोवेळी ग्रामीण जनता, शेतकरीहिताचे असंख्य निर्णय झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या तुलनेत `राष्ट्रवादी` ग्रामीण जनतेचा चेहरा असल्याची प्रतिमा तयार करण्यात श्री. पवार व अन्य नेत्यांना यश आले. त्याचा फायदा खडसे यांना खानदेशात मिळू शकेल. त्यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यासह खानदेशात `राष्ट्रवादी` बळकट करण्याची श्री. पवार यांची स्वप्नपूर्ती होणार आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Eknath Khadse was joining NCP, disgruntled BJP groups in Dhule district were free to join NCP