esakal | धुळे मनपाने तीन कोटींची दिले बिले; पण ते संशयाच्या भोवऱ्यात ! 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे मनपाने तीन कोटींची दिले बिले; पण ते संशयाच्या भोवऱ्यात ! 

कोरोनाचे संकट धडकल्यानंतर मनपाची आर्थिक स्थिती अधिकच बिकट झाल्याचे कुणीही नाकारणार नाही. अशा आर्थिक आणीबाणीच्या काळात ठेकेदारांची बिले अदा करताना काय निकष लावला हा प्रश्‍न आहे.

धुळे मनपाने तीन कोटींची दिले बिले; पण ते संशयाच्या भोवऱ्यात ! 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे  ः अलीकडच्या काळात मनपा प्रशासनाने अदा केलेली ठेकेदारांची जुनी बिले नियुक्त समितीच्या संमतीने, प्राधान्यक्रमाच्या निकषावर दिली गेली की ‘जिसकी लाठी-उसकी भैस' या निकषावर, हा प्रश्‍नच आहे. तीन दिवसांपूर्वी आंदोलनाचे हत्यार उपसणाऱ्या नगरसेवक शीतल नवले यांनी कोरोना संसर्गाचे संकट असताना मनपा प्रशासनाने हितसंबंधातील ठेकेदारांची बिले काढून दिल्याचा आरोप केला आहे. तब्बल तीन कोटींच्या बिलांचा हा विषय त्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात आहे. 

वाचा ः धुळे जिल्ह्यातील बेहेड गावात अतिवृष्टी; लाखोंचे नुकसान*
 

शहरात विविध कामे केलेल्या ठेकेदारांचे कोट्यवधी रुपये अद्यापही महापालिकेकडे घेणे आहे. हे दायित्व प्राधान्यक्रमाने चुकते करण्यासाठी प्रशासनाने समिती आहे. या समितीच्या माध्यमातूनच बिले अदा होतात की की हा केवळ देखावा आहे, याबाबत मात्र साशंकता आहे. 

नवलेंच्या आरोपामुळे संशय दाट 
कामे होत नसल्याच्या कारणावरून तीन दिवसांपूर्वी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक शीतल नवले यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. या आंदोलनादरम्यान त्यांनी महापालिका प्रशासनावर ठेकेदारांच्या बिल अदायगीवरुन गंभीर आरोप केले. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांना सोयीसुविधा पुरविणे आपले कर्तव्य असताना त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या हितसंबंधातील ठेकेदारांची कोट्यवधींची बोगस जुनी बिले काढून दिली, त्यापैकी एकही काम आपल्या काळात झालेले नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. अदा केलेल्या सुमारे तीन कोटींच्या बिलांची यादीही त्यांनी दिली होती. 

कोरोना संकटात अदायगी कशी? 
कोरोनाचे संकट धडकल्यानंतर मनपाची आर्थिक स्थिती अधिकच बिकट झाल्याचे कुणीही नाकारणार नाही. अशा आर्थिक आणीबाणीच्या काळात ठेकेदारांची बिले अदा करताना काय निकष लावला हा प्रश्‍न आहे. श्री. नवले यांनी दिलेल्या यादीत ४१ कामांपोटी ठेकेदाराची बिले अदा केल्याचे दिसते. यातील १७ कामांचे एक कोटी ६४ लाख आठ हजार ४५९ रुपयांची बिले २ ते १९ मार्चदरम्यान काढल्याचे दिसते. अर्थात कोरोना संकटापूर्वी ही कार्यवाही झाली. मात्र, कोरोना धडकल्यानंतरही ४ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान प्रशासनाने २४ बिलांपोटी एकूण एक कोटी १० लाख २० हजार २८३ रुपयांची बिले अदा केली. ही बिले अदा करताना कोणता निकष लावला हा खरा प्रश्‍न आहे. या यादीव्यतिरिक्त इतर किती बिले अदा झाली हाही प्रश्‍न आहे. 

 आवर्जून वाचा ः ऑफलाइन सभा घेण्याची सूट द्या; जि. प. अध्यक्ष डॉ. रंधेंची मागणी

अलीकडचीही बिले अदा 
श्री. नवले यांनी दिलेल्या यादीत काही कामे अलीकडच्या काळातच झालेली असताना त्यांची लाखो रुपयांची बिले अदा झालेली दिसतात. त्यामुळे प्रशासनाच्या बिल अदा करण्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह आहे. 

संपादन - भूषण श्रीखंडे

loading image