अमरिशभाईंनी पक्ष बदलल्यामुळे वेदना : खा. सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

राष्ट्रीय नेते शरद पवार यांना "इडी'ची नोटीस आणि त्यांचे पावसातील भाषण यामुळे महाराष्ट्र एकवटला आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्याचा परिपाक कुणालाही ध्यानीमनी नसताना मतदारराजाच्या आशीर्वादामुळे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.

 धुळे ः पवार कुटुंबाशी सख्य, जवळीक, पारिवारीक संबंध असलेले माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षाची (भाजप) वाट धरली. त्यांचा हा निर्णय आमच्यासाठी वेदनादायक आहे. काही अडचणी असल्याशिवाय ते असा निर्णय घेणार नाहीत, असे वाटते. ते जाणण्यासाठीच त्यांची भेट घेणार आहे. त्यांचा आता विचार काय? अशी विचारणा करणार आहे, असे जाहीरपणे सांगत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला. नेत्या तथा खासदार सुळे प्रमुख मार्गदर्शक होत्या. प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे, इर्शाद जहागीरदार, शहराध्यक्ष कैलास चौधरी, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, संदीप बेडसे, किरण पाटील, माजी आमदार रामकृष्ण पाटील, एन. सी. पाटील, डॉ. जितेंद्र ठाकूर, रणजित भोसले, तेजस गोटे आदींसह माजी नगराध्यक्षा हेमा गोटे, माजी महापौर कल्पना महाले, डॉ. सुवर्णा शिंदे, महिला शाखेच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, शहराध्यक्षा सरोज कदम व्यासपीठावर होते. 

आर्वजून पहा : आम्हाला बांगड्यांचा सार्थ अभिमान फडणवीसांनी सांभाळून बोलावे : खा. सुप्रिया सुळे...
 

पवारांमागे महाराष्ट्र एकवटला 
खासदार सुळे म्हणाल्या, की पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांना "इडी'ची नोटीस आणि त्यांचे पावसातील भाषण यामुळे महाराष्ट्र एकवटला आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्याचा परिपाक कुणालाही ध्यानीमनी नसताना मतदारराजाच्या आशीर्वादामुळे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या निवडणुकीत आपल्या पक्षाच्या जवळचे कोण आणि दूरचे कोण ते कळाले. कोण कामाचा तेही समजले. संघटनेची बांधणी करण्यात कमी पडलो, त्यावर आत्मचिंतन करावे लागेल तेही उमगले. 

क्‍लिक कराः चोरीच्या वाहनांच्या तपासात पुण्यातील खुनाचा उलगडा 
 

अमरिशभाईंमुळे धक्का 
कॉंग्रेस व राष्ट्रवादी भाऊच आहेत. मात्र, आमचा हक्काचा माणूस माजी मंत्री अमरिशभाई पटेल हे कॉंग्रेस विचारसरणीचे असताना दुसऱ्या पक्षात (भाजप) का गेले ते कळाले नाही? त्यामागची कळत असलेली कारणे धक्कादायक वाटतात. पूर्वीच्या सरकारमध्ये सत्तेचा गैरवापर, दबावतंत्र असल्याने राज्यात काही जणांना आपला पक्ष सोडावा लागला असेल, असे वाटते. भाजप सरकारची उज्ज्वला योजना महिलांना मारक ठरली आहे. मोफत गॅस सिलिंडर तर मिळत नाही, शिवाय स्वयंपाकासाठी रॉकेलचे वितरण बंद करून त्या सरकारने महिला वर्गाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. श्री. गोटे यांच्या मागणीनुसार मनमाड- इंदूर रेल्वे मार्गाच्या स्थितीबाबत दिल्लीत पोहोचल्यावर माहिती घेतली जाईल आणि हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा करेल. तसेच येथे सफारी गार्डन होण्यासाठी राज्य सरकारशी चर्चा करून जमीन मिळविण्यासाठी प्रयत्न होतील, अशी ग्वाही खासदार सुळे यांनी दिली. खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी या रेल्वे मार्गाबाबत दिशाभूल चालविली असून जिल्ह्याचा विकास, बेरोजगारी, मागासलेपणा दूर होण्यासाठी रेल्वे मार्ग, तसेच सफारी गार्डनचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी खासदार सुळे यांना साकडे घालतो, तसेच त्यांनी धुळे व नंदुरबार दत्तक घ्यावे, असे श्री. गोटे म्हणाले. 
 

नक्की वाचा : रेल्वे विभागाला ‘अल्झायमर’ची लागण 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule ncp supriya sule stetment by amrish patel