esakal |  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सिमेंट कंपनीत केली तोडफोड 
sakal

बोलून बातमी शोधा

 राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सिमेंट कंपनीत केली तोडफोड 

कंपनीने शासकीय नियमानुसार ८० टक्के स्थानिक बेरोजगारांना नोकरी देण्याचे टाळले. त्यामुळे स्थानिकांवरील अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांनी दिला.

 राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सिमेंट कंपनीत केली तोडफोड 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

सोनगीर ः स्थानिक तरुणांना नोकऱ्या देत नाहीत, कर्मचाऱ्यांची पदोन्नती, पगारवाढ होत नाही म्हणून मोर्चाद्वारे बाभळे फाट्यालगत नरडाणा (ता. शिंदखेडा) एमआयडीसीतील वंडर सिमेंट कंपनीत तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध नरडाणा पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला.

वाचा- अनुदानित आश्रमशाळेतील ३४ हजार कर्मचारी वेतनापासून वंचित ! 
 

राष्ट्रवादी काँग्रेसचीही राज्यात सत्ता आहे. उद्योगमंत्र्यांमार्फत सामंजस्याने प्रश्न सोडविण्याऐवजी कंपनीचे नुकसान करण्यातून मोर्चेकऱ्यांनी काय निष्पन्न केले, असा प्रश्‍न धुळेकर उपस्थित करीत आहेत. काही कर्मचाऱ्यांच्या तक्रारींमुळे आणि विविध मागण्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मंगळवारी (ता. २७) गेले असता, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेटीसाठी तिष्ठत ठेवले. उडवाउडवीची उत्तरे दिल्याने कंपनी कार्यालयात विविध साहित्यांची तोडफोड झाली. कंपनीविरोधात प्रचंड घोषणाबाजी झाल्याचे संबंधितांनी सांगितले. 

नरडाण्यात गुन्हा दाखल 
कंपनीत तोडफोड झाल्याप्रकरणी सुरक्षा पर्यवेक्षक नामदेव निकम यांनी संशयित कार्यकर्ते चिराग माळी, डॉ. कैलास ठाकरे, मयूर पाटील व अन्य १५ ते १७ जणांविरुद्ध फिर्याद दिली. जमावबंदी आदेश असताना बेकायदेशीरपणे गर्दी जमवून वंडर सिमेंट कंपनीत अनधिकृत प्रवेश करत कार्यालयातील खुर्ची, टेबल व झाडाच्या कुंड्या फेकून आर्थिक नुकसान केले. कोरोनाप्रश्‍नी मास्क लावला नसल्याने संशयित कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 
 

बेडसे यांचा इशारा 
या प्रकारामुळे कंपनीचे संचालक व वरिष्ठ अधिकारी नाराज झाले. कंपनी पुढे चालविण्याची मनःस्थिती नसल्याचे व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितले. मोर्चेकरी श्री. बेडसे, तालुकाध्यक्ष कैलास ठाकरे, जिल्हा युवक शाखाध्यक्ष मयूर बोरसे, ॲड. एकनाथ भावसार, चिराग माळी, बळवंत सिसोदे, दुर्गेश पाटील, महेंद्र सिसोदे, जगदीश ठाकरे, चेतन भदाणे, नितीन पाटील, निखिल पाटील आदींनी कंपनीचे युनिट हेड बिपिन शर्मा व एचआर हेड अशोक पवार यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा केली. दरम्यान, कंपनीने शासकीय नियमानुसार ८० टक्के स्थानिक बेरोजगारांना नोकरी देण्याचे टाळले. त्यामुळे स्थानिकांवरील अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, तालुकाध्यक्ष कैलास ठाकरे यांनी दिला. 

आवश्य वाचा- रोहयो, फलोत्‍पादन योजनेत केळी, पपईचा समावेश करा ! 
 

आंदोलनांना कंटाळलो ः कंपनी 
कंपनी व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले, की वंडर सिमेंट कंपनीत एकूण १८० कर्मचारी असून, शासकीय नियमानुसारच स्थानिक कर्मचारी घेतले आहेत. फारसा खप नसल्याने सिमेंट कंपनी सुरवातीपासून तोट्यात आहे. कोरोनाच्या संकट काळात एकही कर्मचारी कमी न करता कंपनीने कर्मचाऱ्यांना घरबसल्या पगार दिला. कोरोनाचा मोठा फटका कंपनीला बसला. या स्थितीत अद्याप अपेक्षित उत्पादन घेता येत नाही. त्यात वारंवार अशा आंदोलनांना तोंड देऊन कंटाळलो आहोत. त्यामुळे नाराज व्यवस्थापन यापुढे कंपनी न चालविण्याच्या निर्णयाप्रत आली आहे. गर्दी करून कोण काय बोलतो तेच कळत नव्हते, तर आम्ही काय आश्वासन देणार?  
 

संपादन-भूषण श्रीखंडे