esakal | हिरे मेडिकलमध्ये दहा व्हेंटिलेटर कार्यान्वित; दोन डॉक्टरांची सेवा वर्ग

बोलून बातमी शोधा

ventilator machine

हिरे मेडिकलमध्ये दहा व्हेंटिलेटर कार्यान्वित; दोन डॉक्टरांची सेवा वर्ग

sakal_logo
By
टिम इ सकाळ

धुळे : शहरातील साक्री रोडवरील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ११, तर कार्यक्षेत्रातील शिरपूर व दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात अनुक्रमे नऊ व पाच, अशी एकूण २५ व्हेंटिलेटर वर्षभरापासून धूळखात पडून असल्याचा गंभीर प्रकार ‘सकाळ’ने उजेडात आणला. त्याची दखल घेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर दोन दिवसांत व्हेंटिलेटर सुरू करण्याचा आदेश दिला. त्यास सिव्हिल हॉस्पिटल जुमानले नाही. सरतेशेवटी मंत्री टोपे यांच्या कठोर भूमिकेनंतर दहा व्हेंटिलेटर कार्यान्वित झाल्याने गरजूंना दिलासा मिळाला आहे.

सिव्हिलमधील ११ पैकी दहा व्हेंटिलेटर चक्करबर्डीतील हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयास मनुष्यबळासह चार दिवसांपूर्वी दिली होती. ती क्षमतेने कार्यान्वित झाली आहेत. मात्र, शिरपूर, दोंडाईचा येथील व्हेंटिलेटर अद्याप धूळखात असल्याने गरजूंनी नाराजी व्यक्त केली आहे.

चौदा व्‍हेंटिलेटर पडून

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, व्हेंटिलेटरची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या गंभीर स्थितीत १४ व्हेंटिलेटर पडून असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वी यंत्रणेने जवाहर मेडिकल फाउंडेशनला दोन व्हेंटिलेटर दिली आहेत. या धर्तीवर कराराने काही रुग्णालयांना १४ व्हेंटिलेटर दिली गेली, तर गरजू रुग्णांची गरज भागू शकेल. मात्र, याकामी पुढाकार घेईल कोण? या स्थितीमुळे मशिन असूनही वापरात नसल्याचे चित्र आहे.

दोन डॉक्टरांची सेवा वर्ग

सिव्हिल हॉस्पिटलमधील दहा व्हेंटिलेटर हिरे मेडिकलच्या रुग्णालयात कार्यान्वित झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे यांनी दिली. कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी सिव्हिलला पीएम केअर निधीतून ११ व्हेंटिलेटर मिळाली होती. ती कार्यान्वित होण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना वेळोवेळी सूचना दिली. याप्रश्‍नी सिव्हिलच्या कारभारात शेवटी आरोग्यमंत्री टोपे यांना हस्तक्षेप करावा लागला. यानंतर सिव्हिलने दहा व्हेंटिलेटरसह हिरे मेडिकलकडे भूलतज्ज्ञ डॉ. रवींद्र सोनवणे, डॉ. निखिल मसणे यांची सेवा वर्ग केली आहे.

हिरे मेडिकलला ७५ व्हेंटिलेटर

हिरे मेडिकलच्या रुग्णालयात ‘सिव्हिल’चे मिळून एकूण ७५ व्हेंटिलेटर झाली आहेत. त्यात पाच ते सहा मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. ती दुरुस्तीसाठी अभियंत्याला पाचारण केले आहे.