esakal | धुळ्यात कोरोनाच्या संकटात ‘डेंगी’चा ताप गायब ! 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यात कोरोनाच्या संकटात ‘डेंगी’चा ताप गायब ! 

दर वर्षी ऑगस्टनंतर डेंगीचा ताप नागरिकांसह यंत्रणेला त्रासदायक ठरतो. यंदा डेंगीने अद्याप तरी डोके वर काढलेले नाही.

धुळ्यात कोरोनाच्या संकटात ‘डेंगी’चा ताप गायब ! 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः कोरोना संसर्गाच्या संकटामुळे या वर्षी सहा-साडेसहा महिने धुळेकर त्रस्त आणि भीतीच्या छायेत वावरत आहेत. मात्र, कोरोनाच्या संकटात डेंगी, मलेरियासारखे आजार गायब झाले की काय, अशी स्थिती सरकारी दप्तरी पाहायला मिळत आहे. दर वर्षी ऑगस्टनंतर डेंगीचा ताप नागरिकांसह यंत्रणेला त्रासदायक ठरतो. यंदा डेंगीने अद्याप तरी डोके वर काढलेले नाही. विशेष म्हणजे २०१८ ते १३ ऑक्टोबर २०२० दरम्यान डेंगी, मलेरियाने शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याचे सरकारी रेकॉर्ड म्हणते. 

आवश्य वाचा- कोरोनाच्या संसर्गानंतर  एमआयएस- सी आजारावर सहा बालकांची केली मात 

दर वर्षी साधारण ऑगस्टनंतर त्यातही सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व कधी-कधी डिसेंबरमध्येही डेंगीचे रुग्ण आढळण्याबाबत तक्रारी सुरू होतात. खासगी दवाखान्यांमध्येही उपचारासाठी गर्दी मावत नाही, अशी स्थिती असते. त्यामुळे नागरिकांसह लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांतर्फे तक्रारी सुरू होतात. महापालिकेच्या यंत्रणेला त्यासाठी धारेवर धरले जाते. दर वर्षी पाहायला मिळणारे हे चित्र यंदा मात्र अद्याप तरी दिसलेले नाही. 

एकाही रुग्णाची नोंद नाही 
डेंगीच्या निदानाबाबत खासगी दवाखाने व शासकीय, महापालिका आरोग्य विभागाकडून दावे-प्रतिदावे पाहायला मिळतात. दरम्यान, शासकीय निकषाप्रमाणे रुग्णांची नोंद करणाऱ्या महापालिकेकडेही यंदा जानेवारी ते १३ ऑक्टोबरदरम्यान डेंगी, मलेरियाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. विशेष म्हणजे मागील दोन वर्षांत याच कालावधीपर्यंत शहरात डेंगीचे रुग्ण आढळल्याच्या नोंदी आहेत. २०१८ मध्ये ऑक्टोबरअखेर ७५, तर २०१९ मध्ये १३४ डेंगी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. 

मनपाकडून उपाययोजना 
डेंगी, मलेरियाचे अद्याप रुग्ण आढळले नसले तरी महापालिकेच्या मलेरिया विभागाकडून प्रतिबंधासाठी उपाययोजना सुरू झाल्याचे मलेरिया विभागप्रमुख तथा सहाय्यक आरोग्याधिकारी लक्ष्मण पाटील यांनी सांगितले. खासगी दवाखान्यांमधून डेंगीच्या रुग्णांबाबत माहिती संकलित करण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंटेनर सर्व्हे, ॲबटिंग, फवारणीचे कामही सुरू केल्याचे श्री. पाटील म्हणाले. या कामासाठी मनपाचे ३३ व कंत्राटी ३० अशा एकूण ६३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. त्यातील २० कर्मचारी सध्या सॅनिटायझेशनच्या कामावर आहेत.

 
आवजर्जून वाचा- पर्यावरण विभागाची मान्यता मिळाल्यावर गिरणेवरील बलून बंधाऱ्यांचा निधीचा मार्ग मोकळा होणार  

डेंगी रुग्णांची स्थिती 
२०१८ 
महिना...संशयित रुग्ण...पॉझिटिव्ह रुग्ण...मृत्यू 

फेब्रुवारी...०२...००...०० 
एप्रिल...०४...००...०० 
जुलै...०४...००...०० 
ऑगस्ट...१३...००...०० 
सप्टेंबर...१२५...२२...०० 
ऑक्टोबर...१६९...५३...०० 
नोव्हेंबर...१२५...३२...०० 
डिसेंबर...३४...०९...०० 
एकूण...४७६...११६...०० 
जानेवारी, मार्च, मेमध्ये एकही रुग्ण नाही 

२०१९ 
महिना...संशयित रुग्ण...पॉझिटिव्ह रुग्ण...मृत्यू 

जानेवारी...००...०५...०० 
ऑगस्ट...१०...०१...०० 
सप्टेंबर...७९...२६...०० 
ऑक्टोबर...३६८...१०२...०० 
नोव्हेंबर...८५...३९...०० 
डिसेंबर...१९...१०...०० 
एकूण...५७२...१८१...०० 
फेब्रुवारी ते जुलै एकही रुग्ण नाही 
 

२०२० 
जानेवारी...०१...००...०० 
एप्रिल...०२...००...०० 
ऑगस्ट..०२...००...०० 
एकूण...०५...००...०० 

 
मलेरिया पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती 
२०१८ (जानेवारी ते डिसेंबर)...०४ 
२०१९ (जानेवारी ते डिसेंबर)...०० 
२०२० (जानेवारी ते सप्टेंबर)...०० 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image