esakal | अभाविप कार्यकर्त्यांना मारहाणीच्या प्रकरणाची चौकशी : सत्तार 
sakal

बोलून बातमी शोधा

abdul sattar

अभाविपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारठोक, लाठीचार्ज होत असताना पालकमंत्री सत्तार वाहनात बसून होते. त्यांच्यामागे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहने होती. मात्र, पालकमंत्री सत्तार, इतर अधिकारी वाहनातून उतरलेच नाहीत. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधण्याचेही टाळले.

अभाविप कार्यकर्त्यांना मारहाणीच्या प्रकरणाची चौकशी : सत्तार 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलक कार्यकर्ते अचानक वाहनासमोर आले. अशावेळी कुणाला दुखापत झाली असती, तर माझ्याबाबत वेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या असत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येता येत नाही. येथे तर २५ मुले घुसत होती. विद्यार्थ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, राजकीय पक्षासाठी, राजकारणासाठी असे आंदोलन असेल तर किमान कोरोना संकटाच्या काळात ते चुकीचे आहे. मारहाणीबाबत चौकशी करू, असे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी (ता.२६) याबाबत प्रसारमाध्यमांना सांगितले. 


संबंधीत बातमी : धुळ्यात अभाविपच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज 


अभाविपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारठोक, लाठीचार्ज होत असताना पालकमंत्री सत्तार वाहनात बसून होते. त्यांच्यामागे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहने होती. मात्र, पालकमंत्री सत्तार, इतर अधिकारी वाहनातून उतरलेच नाहीत. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधण्याचेही टाळले. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष योगेश जगताप यांनी पालकमंत्र्यांसमोर पोलिसांचा आंदोलक विद्यार्थी कार्यकर्त्यांवर झालेल्या अमानुष लाठीमाराचा निषेध केला, पालकमंत्र्यांनी यात बघ्याची भूमिका घेतली, अशोभनीय कृत्य धुळ्यात घडले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांनीही आंदोलकांना झालेल्या अमानुष मारहाणीचा तीव्र शब्दात निषेध केला. त्यांनी मारहाणकर्त्यांवर कारवाईची मागणी केली. या प्रकरणी आंदोलकांना अतिरेक्यासारखी वागणूक देत त्यांना मारहाण, लाठीचार्ज झाला. पोलिसांनी चुकीची भूमिका वठविली. यातील दोषी कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी ॲड. अमित दुसाने यांनी केली. अशीच भूमिका रोहित चांदोडे, मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रसाद देशमुख यांनी मांडत पोलिसांच्या कृतीचा निषेध केला. 

मंत्री सत्तार यांच्या परवानगीनेच पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मारहाण : गिरीश महाजन 
जळगाव
: शैक्षणिक परीक्षा घेण्यात येत नसतील, तर परीक्षा शुल्क माफ करा, या मागणीचे निवेदन देण्यास गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांना मंत्री अब्दुल सत्तार यांच्या परवानगीनेच पोलिसांनी मारहाण केली, असा आरोप राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला. संबंधितावर त्वरित कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत आपल्या फेसबुक वॉलवर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिस मारहाण करीत असलेला व्हिडिओ शेअर केला आहे.
 

संपादन : राजेश सोनवणे