esakal | जखमेवर मीठ चोळले; धुळे जिल्ह्याला फक्त ७२ रेमडेसिव्हिर

बोलून बातमी शोधा

Remdesivir
जखमेवर मीठ चोळले; धुळे जिल्ह्याला फक्त ७२ रेमडेसिव्हिर
sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः संसर्गजन्य कोरोनाप्रश्‍नी जिल्ह्यातील सर्वच भागांतून रेमडेसिव्हिरची मोठी मागणी, त्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची अहोरात्र वणवण, अनेक तरुणांचाही बळी, धुळे शहरातील अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी वेटिंग, रात्री-अपरात्री मदतीसाठी महापालिकेचे पथक नाही, त्यात लाकडांसाठी कसरत आदी विदारक चित्र काळीज पिळवटून टाकणारे ठरत आहे. यात जिल्ह्याला सोमवारी फक्त ७२ रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळाल्याने जखमेवर मीठ चोळल्याची संतप्त भावना व्यक्त झाली. या स्थितीत जिल्ह्याचे भवितव्य आता महाविकास आघाडी सरकारच्या हाती असल्याचा सूर विविध पातळ्यांवरून उमटत आहे.

हेही वाचा: कोरोनामूळे महामार्गाच्या चौपदरीकरणाला गती मिळेना !

नाशिक महसूल विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये सोमवारी फक्त दोन हजार १०० इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला. शिवाय धुळे जिल्ह्याला सोमवारी अपेक्षित एकूण ३२ टनांपैकी केवळ १६ टन मेडिकल ऑक्सिजन मिळाला. उर्वरित १६ टन ऑक्सिजन आणि वाहतुकीसाठी टँकर शोधण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली. या स्थितीमुळे अस्वस्थ जिल्हाधिकारी संजय यादव रात्री साडेआठपासून दुसरा टँकर मिळविण्याची धडपड करीत होते. मेडिकल ऑक्सिजनचा ३२ टन साठा मिळविण्यासाठी रोज होणारी दमछाक जिल्हा प्रशासनाची घाम गाळणारी ठरत आहे. अनेक रुग्णांकडून ऑक्सिजनची मागणी कायम असल्याने आणि उपचारात बाधा येऊ नये, म्हणून ते सुरतसह ही सुविधा मिळेल त्या जिल्ह्यात जात आहेत.

हेही वाचा: मनपा प्रशासन झोपेतच; ट्रेसिंग, टेस्टिंग विलगीकरणापर्यंतच मजल

सर्वत्र गांभीर्याची स्थिती

उपचाराला विलंब लावणारे अनेक रुग्ण रेमडेसिव्हिरची मागणी करीत आहेत. तुलनेत जिल्ह्याला अत्यल्प पुरवठा होत असल्याने स्थिती गंभीर होत चालली आहे. वैद्यकीय व्यावसायिक रेमडेसिव्हिर आणण्याचा सल्ला देत असल्याने सर्वत्र या इंजेक्शनचीच मागणी होत आहे. शिवाय हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाचे सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालयाकडेही इंजेक्शन नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. सद्यःस्थितीत काही तरुणांचे बळी जात असल्याने समाजमन सुन्न होत आहे. अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी अक्षरशः तास-दोन तासांची प्रतीक्षा करावी लागत असल्याने स्थितीचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज व्यक्त होते. रात्री-अपरात्री कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला, तर अंत्यविधीसाठी पीडित नातेवाइकांना सोयी-सुविधा मिळत नाहीत. त्यांना लाकडाची शोधाशोध करावी लागते. चढ्या दराने लाकडे घ्यावी लागतात. बाधिताच्या मृत्यूनंतर संबंधित रुग्णालय तातडीने मृतदेह नेण्यासाठी नातेवाइकांच्या मागे लागतात. रुग्णवाहिकांनीही दर वाढविले असून, कोरोनाग्रस्तांची सर्व बाजूने आर्थिक कोंडी करण्याचे गंभीर प्रकार सर्रास सुरू असल्याचे दिसते.

हेही वाचा: ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंट’ त्रिसूत्रीचा राऊत पॅटर्न !

यंत्रणा हताश; सरकार करतेय काय?

मेडिकल ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरच्या तुटवड्यामुळे जिल्हा सरकारी यंत्रणा सोमवारी हताश झाल्याचे दिसले. एकीकडे जिल्ह्यातील भाजपचे नेते रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळवून वाटप करताना दिसतात. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे स्थानिक नेते, आमदार, प्रमुख पदाधिकारी जिल्ह्याला पुरेसा ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर मिळविण्यासाठी आपापल्या मंत्र्यांवर दबाव निर्माण करताना का दिसत नाहीत, असा धुळेकरांना प्रश्‍न पडला आहे. त्यामुळेच विदारक स्थितीत जिल्ह्याचे भवितव्य महाविकास आघाडी सरकारच्या हाती असल्याचा सूर उमटत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे