esakal | अगर भगवान होगा तो, तुम्हारे जैसाही होगा...!
sakal

बोलून बातमी शोधा

doctor

कोरोनामुळे मुंबईहून राजस्थानला निघालेल्या एका जथ्थ्यातील 30 वर्षीय युवक काल नगांव (ता. धुळे) येथील डॉ. हितेश पाटील यांच्या दवाखान्यात आला आणि आपल्या गर्भवती पत्नीला वाचवा हो...अशी विनवणी करु लागला.

अगर भगवान होगा तो, तुम्हारे जैसाही होगा...!

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर : "भैया दुनियामे अगर भगवान होगा तो तुम्हारे जैसाही होगा...अलग तो होही नही सकता...'हे शब्द त्या गर्भवतीच्या तोंडातून आपसूक निघाले आणि डॉक्‍टरांचे डोळेही पाणावले. हा प्रसंग काल नगांव (ता. धुळे) येथे घडला. कोरोनाच्या संकटात शेकडो किलोमीटर पायपीट करत जाणाऱ्या परप्रांतीय एका 25 वर्षीय गर्भवतीला रस्त्यातच त्रास सुरु झाला, तिच्या नवऱ्याने मदतीची याचना केली. शेवटी नगावमध्ये त्यांना डॉक्‍टररुपी देवदूत भेटला.

आवर्जून वाचा - बाळंतीन पत्नी, मुलांसह सायकलवरुन १४०० किलो मीटरची वाटचाल 

कोरोनामुळे मुंबईहून राजस्थानला निघालेल्या एका जथ्थ्यातील 30 वर्षीय युवक काल नगांव (ता. धुळे) येथील डॉ. हितेश पाटील यांच्या दवाखान्यात आला आणि आपल्या गर्भवती पत्नीला वाचवा हो...अशी विनवणी करु लागला. लगेचच दोन-तीन जण 25 वर्षीय गर्भवतीला उचलून दवाखान्यात घेऊन आले. मात्र, मुंबईहून आल्याचे म्हटल्यावर "ओपीडी'तील इतर पेंशटही एकमेकाकडे पाहू लागले. त्या गर्भवतीला तपासावे की नाही असा प्रश्‍न डॉक्‍टरांच्याही मनात उभा राहिला.

आणि डॉक्‍टरांनी तपासले
गर्भवतीच्या पती, सासू-सासऱ्यांनी यांनी डॉक्‍टरांना विनंती केली. गर्भवतीला खुपच त्रास होत असल्याचे पाहून डॉक्‍टर पाटील यांनी दवाखान्यातील सर्व रुग्णांना बाहेर काढून त्या गर्भवतीची तपासणी केली. आठ महिन्याची ती गर्भवती (गीताबेन) गेल्या आठ दिवसापासून साधारण 400 किलोमीटर पायी चालत होती शिवाय गेल्या तीन दिवसापासून ती उपाशीही होती. त्यामुळे तिला खूप अशक्तपणा आलेला होता, उलट्या होत होत्या. सुदैवाने तीला ताप, सर्दी, खोकला अशी कोणतीही लक्षणे नसल्याचे तपासणीत आढळुन आले.

जेवणाचीही व्यवस्था केली
डॉ. पाटील यांनी तिच्यावर औषधोपचार तर केलाच शिवाय घरुन त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था केली. त्यांच्याशी झालेल्या संवादावरुन ते दोन दिवसापासून दवाखाना शोधत असल्याचेही समजले. जेवणानंतर गीताबेनला बरे वाटले. जातांना तीने डॉक्‍टरांना उद्देशुन "भगवान तुम्हारे जैसाही होगा...' अशा भावना व्यक्त केल्या आणि डॉक्‍टर पाटील यांचे डोळे पाणावले. दरम्यान, ते गेल्यावर दवाखान्याचे निर्जंतुकीकरण डॉक्‍टर पाटील यांनी इतर रुग्णांची तपासणी सुरु केली. या प्रसंगाने समाजात डॉक्‍टरांप्रतीचा आदर अधिक वाढेलच पण इतर डॉकटरांनादेखील तो एक संदेश आहे असेच म्हणावे लागेल.