धुळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन ‘एटीएम’ फोडली पण प्रयत्न फसला !

धुळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन ‘एटीएम’ फोडली पण प्रयत्न फसला !

धुळे ः शहरातील मालेगाव रोडवर टायर दुकानाच्या तरुण मालकांवर खुनीहल्ला, नंतर वन विभाग कार्यालयासमोर पोलिस निरीक्षकाच्या घरी दागदागिन्यांची धाडसी चोरी झाली. या तपासात पोलिस गुंतलेले असताना, मंगळवारी (ता. १०) मध्यरात्रीनंतर वा पहाटे वेगवेगळ्या भागातील दोन ‘एटीएम’मधून रोकड लांबविण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. मात्र, भावसार कॉलनी, विद्यानगरीतील घरातून रोकड, दागदागिने लंपास करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. 

शहरात निरनिराळ्या गुन्ह्यांची मालिका सुरू असल्याने पोलिसांना ऐन दिवाळीत रात्रीची गस्त वाढविण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. विविध घटनांमुळे नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. 

‘एटीएम’वर संक्रांत 
चितोड रोड भागात क्रांती चौकात राजशेखर मोगलाईकर यांच्या मालकीच्या स्वामी संकुलातील टाटा कंपनीचे इंडिकॅश एटीएम आहे. ते चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर फोडण्याचा प्रयत्न केला. हाती रोकड न लागल्याने चोरट्यांनी एटीएमची नासधूस केली. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलत त्यासह लॉक तोडल्याचे दिसून आले. टाटा इंडिकॅशचे अधिकारी हेमंत पवार यांच्या माहितीनुसार, चोरट्यांनी तीन यूपीएस बॅटरी लंपास केल्या. पंचवटीजवळील मोठ्या पुलाजवळ ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडत रोकड लंपास करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. त्यांनी एटीएमची नासधूस केली. या घटनांची माहिती मिळताच एलसीबीचे पथक, शहर आणि देवपूर पोलिस ठाण्याचे पथक, ठसा आणि श्‍वानपथक कार्यक्षेत्रातील एटीएमस्थळी दाखल झाले. एलसीबीचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, देवपूरचे सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत पाटील, शहराचे निरीक्षक अनिल देशमुख, लोकेश पवार आदी घटनास्थळी तपास करीत होते.

घरांमध्ये हातसफाई 
जमनागिरी रोडवरील भावसार कॉलनीत घरफोडी झाल्याचे बुधवारी उघड झाले. कॉलनीत रविवारीच आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्याचे घर चोरट्यांनी फोडले होते. संबंधित कर्मचाऱ्याच्या घरामागे राहणाऱ्या सिंचन भवनातील कर्मचारी संदीप मोहन वैराग यांचे घर चोरट्यांनी फोडले. कॉलनीत ते प्लॉट क्रमांक पाचमध्ये भाडेकरू म्हणून राहतात. ते शनिवारी मुलाच्या वाढदिवसानिमित्त साक्री येथे आई-वडिलांकडे गेले होते. घरी परतल्यानंतर बुधवारी घरफोडी झाल्याचे त्यांना लक्षात आले. कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील दोन ते तीन हजारांची रोकड आणि सोन्याच्या पाच ते सात अंगठ्या लंपास केल्या. रविवारीच ही घटना घडल्याचा अंदाज आहे. परिसरातील सीसीटीव्हीत दोन चोरटे कैद झाले आहेत. देवपूरमधील विद्यानगरीत प्लॉट क्रमांक १५१ मध्ये बीएसएफमधील जवान विनोद चिंधा पाटील यांचे वास्तव्य आहे. त्यांच्या घरी चोरांनी डल्ला मारत तीन तोळे सोन्याची चेन, ५० हजारांची रोकड, तांब्याचे भांडे, घंघाळे, घागरी कळशी, पितळी दिवा असा मुद्देमाल लंपास केला. जवान पाटील कुटुंबीयांसह बाहेरगावी होते. ते बुधवारी परतल्यावर त्यांना घरातील कपाट फोडलेले दिसले. अशा एकूण चार घटनांप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com