सावधान इंडिया..! वकिली चालत नाही म्हणून चालवले डोके..अन्‌ आला तावडीत 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

फारसे उत्पन्न निघत नसल्याने तो खिन्न होता. कॉलसेंटरला काम करणारा त्याचा मित्र विक्रम यादव याच्यासोबत त्याची "टेबलावर' गाठ-भेट झाली. त्यातून त्यांनी डोकं लावून बनावट बॅंक खाते, केवायसी, आयपी तयार करून प्रति कॉलसेंटर उभारून फसवणुकीचा धंदा सुरू केला होता. 

जळगाव  : म्हसावद (ता. जळगाव) येथील ऑटोमोबाईल अभियंता बेरोजगार तरुणाने "नोकरी डॉट.कॉम.' या वेबसाइटवर ऑनलाइन ऍप्लिकेशन केले होते. हाच डाटा हॅक करून सायबर गुन्हेगारांच्या टोळीने सचिन संजय मराठे याला सावज म्हणून हेरले. एचडीएफसी बॅंकेत नोकरीचे आमिष देत या तरुणाला तब्बल 93 हजारांत गंडवले होते. पोलिसांत गुन्हा दाखल होऊन एका वकिलास अटक केली आहे. दरम्यान, या भामट्याने बेरोजगारांच्या माहितीच्या आधारे त्यांना गंडवल्याचे समोर आले असून, न्यायालयाने संशयिताला 27 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले आहेत. 

असा घडला प्रकार 
म्हसावद (ता.जळगाव) येथील सचिन संजय मराठे याचा ऑटोमोबाईल डिप्लोमा झाल्यावर तो नोकरीच्या शोधात होता. प्रख्यात ऑनलाइन "नोकरी डॉट कॉम' या वेबसाइटवर जॉब प्रोफाइल नुसार नोकऱ्या उपलब्ध असल्याच्या माहितीवरून सचिन याने नोंदणी करून अर्ज केला होता. 22 ऑगस्ट ते 22 ऑक्‍टोबर 2018 दरम्यान त्याला रविसिंग, करण भातपूर, संग्राम भालेराव, करण लुत्रा, अनुभूती तनेजा, अनिल सिंग, श्रेया अशा वेगवेगळ्या नावाने मोबाईल फोन आले. संबंधितांनी सचिन यास एचडीएफसी बॅंकेत तुम्हाला नोकरी निश्‍चित झाल्याचे सांगत नोंदणी, ऑनलाइन मुलाखत, लॅपटॉप कीट, प्रोसेसिंग फी अशा वेगवेगळ्या माध्यमातून संबंधितांनी सचिनला सिंध बॅंक तसेच पंजाब नॅशनल बॅंकेच्या अशा दोन खाते क्रमांकावर वेळोवेळी असे 93 हजार रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार ही रक्कम भरल्यावर संशयितांनी एचडीएफसी बॅंकेचा सही- शिक्का असलेले नियुक्तीपत्र पाठवले. खात्री केल्यावर हे नियुक्तीपत्रच खोटे असल्याचे आढळून आल्यावर सचिन मराठे यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली होती. 

आर्वजून पहा : अरे बापरे...! हे काय...चक्क दररोज हे गिळतात 100 ग्रॅम धुळ ! 
 

14 महिने संशयितांचा शोध 
सायबर पोलिसांनी फिर्यादी यास आलेले मेल, ज्या मोबाईलवरून बोलणे झाले त्याचे नंबर व बॅंक खाते अशा तांत्रिकदृष्ट्या पाळत ठेवली. कॉलसेंटर चालवणारा संशयितच वकील असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीचा संपूर्ण अभ्यास त्याला होता. त्यामुळे, चौदा महिने उलटल्याने त्याला गुन्हा व पैसे पचल्याची खात्री झाली होती. परिणामी, त्याच आयपी ऍड्रेस आणि बनावट खात्यांमधून व्यवहार सुरू असल्याचे सायबर पोलिसांनी शोधून काढले. संशयित दिल्लीत असल्याची खात्री पटल्यावर पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक बळिराम हिरे यांच्या पथकातील वसंत बेलदार, दिलीप चिंचोले, गौरव पाटील यांच्या पथकाने दिल्ली गाठत दोन दिवस या वकिलांचा पिच्छा पुरवून राहुल चौरासिया याला ताब्यात घेतले. 

आक्षेपार्ह साहित्य केले जप्त 
दिल्ली मेट्रोचे कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड, बॅंक ऑफ इंडियाचे डेबिट कार्ड, 1 लाखाचा एक व 40 हजार रुपये किमतीचा दुसरा असे दोन महागडे मोबाईल, 500 रुपये रोख जप्त केले आहे. गुन्ह्याचा मास्टरमाईंड तसेच नोकरी डॉटकॉम या वेबसाइटचा डेटा मिळवणारा विक्रम यादव याचा पोलिस शोध घेत असून, फसवणुकीचे हे जाळे देशभर पसरले असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

क्‍लिक कराः  भाऊ आढे रेंजच नही तर कर्जमाफी कशी हुईन... 
 

"सावधान इंडिया..' 
देशात बेरोजगारीचा दर प्रचंड वाढला असून, सरकारी नोकऱ्याच मिळत नसल्याने खासगीतच नोकऱ्या शोधणाऱ्या बेरोजगारांचा ऑनलाइन डाटा चोरून सायबर गुन्हेगारांकडून गंडवण्याचे प्रकार वाढले आहे. नोकरीसाठी पैशांची देवाण-घेवाण करू नये. ऐकीव माहितीवर आणि आकर्षक ऑनलाइन जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहनही पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, सायबर तज्ज्ञांनी केले आहे. 

वकील साहेब.. तुम्हीसुद्धा! 
अटक करण्यात आलेला अजय चौरसिया सधन व उच्चशिक्षित कुटुंबातील असून, त्याचे वडील मोठ्या ग्रुपच्या एका वृत्तपत्रात ज्येष्ठ पत्रकार व भाऊदेखील पत्रकार आहे. एलएलबीचे शिक्षण घेऊन न्यायालयात दोन वर्षापासून प्रॅक्‍टिस करतो. मात्र, फारसे उत्पन्न निघत नसल्याने तो खिन्न होता. कॉलसेंटरला काम करणारा त्याचा मित्र विक्रम यादव याच्यासोबत त्याची "टेबलावर' गाठ-भेट झाली. त्यातून त्यांनी डोकं लावून बनावट बॅंक खाते, केवायसी, आयपी तयार करून प्रति कॉलसेंटर उभारून फसवणुकीचा धंदा सुरू केला होता. 

नक्की वाचा : पुलावरुन ट्रॉला कोसळल्याने चालक ठार
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Delhi Lawyers Become a cyber criminal