राज्यातील आरटीओ कार्यालयामधील तीनशे कर्मचाऱ्यांची सेवा खंडीत 

rto office
rto office

कापडणे (धुळे) : राज्यातील विभागीय व उपविभागीय प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) कार्यरत असलेले कंत्राटी ३१९ लिपिक कर्मचाऱ्यां‍ची सेवा खंडित केली आहे. पाच महिन्यांपासून सेवेत पुन्हा दाखल करून घेण्याची आस त्यांना आहे. पन्नास टक्के कर्मचारी कमी असलेल्या या कार्यालयांमधील कामाचा डोलारा हे कर्मचारी हाकीत होते. विशेष म्हणजे त्यांना जानेवारीपासून वेतनही मिळालेले नाही. कामावर घेऊन दिवाळीची सुखद भेट मिळण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्‍यक्‍त होत आहे. 

राज्यातील विभागीय व उपविभागीय प्रादेशिक परिवहन कार्यालयात फेब्रुवारी २०१७ पासून ३१९ कंत्राटी कर्मचारी लिपिकपदाचा कार्यभार सांभाळत होते. त्यांची मे २०२० मध्ये सेवासमाप्ती केली. प्रत्येक वर्षी मार्चनंतर सेवावाढीचे आदेश मिळत होते. मेपर्यंत राज्य शासनाने सेवावाढीचे आदेश न काढल्याने या कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागले आहे. त्यांचे जानेवारीपासून वेतन रखडले आहे. मेपर्यंतचे पाच महिन्यांचे वेतन देऊ नका पण सेवेत दाखल करून घेण्याचे आर्जव हे कर्मचारी करीत आहेत. 

अनुदान नसल्याने वेतन अन्‌ सेवाही नाही 
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य शासन अनुदान देत असते. अद्याप अनुदान मिळाले नसल्यानेच वेतन अदा झालेले नाही. पुढील सेवेचीही शाश्वती नसल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. तीन-सव्वातीन वर्षे सेवेत असलेल्या ३१९ कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. सेवेत अद्याप घेण्याबाबत शासनाचा कोणताही निर्णय झाला नसल्याने या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधकारमय झाली आहे. 

एकाची आत्महत्या 
पिंपरी चिंचवडमधील एका कर्मचाऱ्याने रोजगाराचे साधन गेल्याने आत्महत्या केली होती. तीच वेळ इतर कर्मचाऱ्यांवर येण्याचे नाकारता येत नसल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. दरम्यान, कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे. दिवाळी गोड करावी, अशी अपेक्षावजा मागणी कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 

खानदेशातील सेवासमाप्ती झालेले कर्मचारी 
जिल्हा कर्मचारीसंख्या 
धुळे ०७ 
नंदुरबार ०३ 
जळगाव ०१ 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com