शेतात नव उत्पादनासाठी लागवड पण जुनं ते जाईना! 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवडीची तयारी सुरू झाली असून, यंदाच्या हंगामात साधारण सव्वा लाख हेक्‍टरवर लागवड होण्याचा अंदाज आहे. 25 मेपासून शेतकऱ्यांना बियाणे कृषी केंद्रांवर उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांची देखील बियाणे खरेदी सुरू झाली आहे.

जळगाव : कापसाची शासकिय खरेदी खानदेशात सहा मेपासून सुरू झाली. या खरेदीची गती सध्या संथ झाली आहे. अनेक खरेदी केंद्रांमध्ये कापूस व सरकीचा साठा वाढल्याने खरेदी बंद करण्याची वेळ आली आहे. एकिकडे शेतीची मशागत होवून पुर्वहंगामी लागवडीला सुरवात झाली असून शेतात नवीन कापूस उत्पादनासाठी लागवड होत असताना दुसरीकडे मात्र घरात जुना कापूस पडूनच आहे. 

आवर्जून वाचा - म्हणून प्राध्यापकच म्हणू लागला "मै हू डीन'

खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवडीची तयारी सुरू झाली असून, यंदाच्या हंगामात साधारण सव्वा लाख हेक्‍टरवर लागवड होण्याचा अंदाज आहे. 25 मेपासून शेतकऱ्यांना बियाणे कृषी केंद्रांवर उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांची देखील बियाणे खरेदी सुरू झाली आहे. काही भागात पुर्वहंगामी कापूस लागवडीला सुरवात करण्यात आली आहे. 

हेपण वाचा - कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याचठिकाणी अंत्यसंस्कार
 

साठा वाढला अन्‌ मजूर कमी 
कापूस महामंडळाचे (सीसीआय) खानदेशात धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील शहादा, नंदुरबार तर जळगावमधील बोदवड, जामनेर, पहूा, शेंदुर्णी (ता. जामनेर), भुसावळ, चोपडा, जळगाव, पाचोरा येथे खरेदी केंद्र सुरू होते. यातील जळगाव व इतर दोन केंद्रे कापसाचा साठा वाढल्याने आणि मजूर टंचाईमुळे बंद करण्यात आली आहेत. "सीसीआय'च्या केंद्रात लॉकडाउनच्या काळात सुमारे दीड लाख क्‍विंटल कापसाची खरेदी झाली आहे. तर पणन महासंघानेदेखील धुळे, मालेगाव (जि.नाशिक), धरणगाव, पारोळा, अमळनेर, एरंडोल येथील केंद्रामध्ये लॉकडाउनच्या काळात मिळून एक लाख 51 हजार क्‍विंटलपेक्षा अधिक खरेदी केली आहे. परंतु "सीसीआय'ची खरेदी बोदवड, जळगाव, जामनेर, पाचोरा भागात संथ गतीने सुरू आहे. यामुळे आता खरेदी बंद होण्याची स्थिती आहे. 

सहा लाख क्‍विंटल कापूस घरातच 
गतवर्षी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. शिवाय, पाऊस चांगला झाल्याने कापसाचे उत्पादन देखील बऱ्यापैकी झाले. मात्र ऐन कापसाचा हंगाम संपण्यावर आला असताना कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन सुरू झाले. यात कापूस खरेदी पुर्णपणे थांबली होती. पण शेतकऱ्यांच्या घरात पडून असलेला कापूस खरेदीसाठी पणन महासंघाने 27 एप्रिलला तर सीसीआयचे खरेदी केंद्र 6 मेपासून सुरू झाले. खरेदी संथ होत असल्याने आजही जळगाव जिल्ह्यात सुमारे सहा लाख क्‍विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. 

चुकारे अप्राप्तच 
लॉकडाउनच्या काळात पणन महासंघ व सीसीआयच्या केंद्रात जेवढ्या कापसाची खरेदी झाली. त्यापोटी एकाही शेतकऱ्याला चुकारे (पैसे) प्राप्त झालेले नाही. पणन महासंघ व सीसीआयच्या औरंगाबाद येथील कार्यालयात कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर कर्मचारी कमी संख्येने येतात. तसेच औरंगाबादमधील संबंधीत बॅंकांमध्येही कोरोनामुळे अडचणी येत असल्याचे सुत्रांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon cotton kharedi slow cci center farmer home cotton