आमदारकीची संधी पक्षाने आता तरी द्यावी : एकनाथराव खडसे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

आपल्याला राज्याच्या राजकारणात रस असून, विधानपरिषदेवर उमेदवारी देताना आपला विचार करण्यात यावा, अशी आपण पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे.

जळगाव :  आपल्याला राज्याच्या राजकारणातच रस असून, राज्यात पक्षासाठी आपण काम करीत आहोत. त्यामुळे विधानपरिषदेवर तरी आपल्याला संधी मिळावी, अशी इच्छा भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

राज्यात विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी 21 मे रोजी मतदान होत आहे. यात भाजपच्या वाट्याला तीन जागा येत आहेत. त्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उमेदवारीसाठी अनेकांच्या नावाची चर्चा त्याबाबत होत आहे. श्री. खडसे यांना विधानपरिषदेवर संधी देवून त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत पक्षात विचार सुरू असल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. त्यामुळे पक्ष नेतृत्वातही त्यांना विधानपरिषदेवर घेण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. 

क्‍लिक कराः विद्यार्थ्यांची घरवापसी चक्क घोड्यावरून 
 

श्री. खडसे आज जळगाव येथे शिवरामनगरातील त्यांच्या निवासस्थानी आले होते. त्यावेळी "सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, की आतापर्यंत पक्षासाठी केलेल्या मेहनतीचा विचार करता आता तरी विधानपरिषदेवर पक्षाने संधी दिली पाहिजे, अशी आपली इच्छा आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी पक्षातर्फे आपल्याला विचारणा झाली होती, त्यावेळी महाराष्ट्र भाजपने आपल्या नावाची राज्यसभेसाठी शिफारसही केली होती. मात्र, राज्यसभेत रस नसल्याचे आपण श्रेष्ठींना स्पष्टपणे कळविले होते. त्यामुळे त्या कालखंडात ते होऊ शकले नाही. आपल्याला राज्याच्या राजकारणात रस असून, विधानपरिषदेवर उमेदवारी देताना आपला विचार करण्यात यावा, अशी आपण पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे. याबाबत योग्य तो निर्णय पक्ष घेईल, याची खात्री आहे. 

नक्की वाचा : सकाळी अंत्यसंस्कार सायंकाळी "पॉझिटिव्ह' ;जळगावात आणखी एक "कोरोना`ने मृत्यू
 

भाजपमध्ये स्पर्धा 
श्री. खडसे यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर विधानपरिषदेसाठी भाजपतर्फे मोठी स्पर्धा लागली आहे. पक्षातर्फे माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासह विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, माधव भंडारी यांच्याही नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. तथापि, खडसे यांनी आता स्वतःच मागणी केल्यामुळे पक्षनेतृत्वाला त्यांचा निश्‍चित विचार करावा लागणार आहे. कारण पक्षाने विधानसभेतही त्यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांचा पक्षाकडे क्‍लेम कायम होता. खडसे हे पक्षाचे अनुभवी नेते आहेत. विधानसभेत त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून आपला वेगळा ठसाही उमटविला आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांना तेवढ्याच ताकदीने घेरण्याची त्यांची आक्रमकता आजही कायम आहे. याचा विचार पक्षपातळीवर केला जाईल, असे सध्या तरी दिसत आहे. 
 

आर्वजून पहा : जुगाऱ्यांना कोरोना पेक्षा कॅमेराची भिती जास्त ; जळगावात जुगार अड्ड्यावर राजकिय पुढारी अटकेत 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Eknathrao Khadse bjp opportunity of MLA