esakal | मर्यादित चौपदरीकरणाने अपघातांचा धोका कायम 

बोलून बातमी शोधा

मर्यादित चौपदरीकरणाने अपघातांचा धोका कायम 

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर गेल्या काही वर्षांत वाहतूक प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण आणि पर्यायाने त्यात बळी जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.

मर्यादित चौपदरीकरणाने अपघातांचा धोका कायम 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव  : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्गी लागले असले तरी ते खोटेनगर ते कालिंकामाता चौक एवढेच मर्यादित असल्याने या कामामुळे या टप्प्यात होणारे अपघात तेवढे वाचतील. मात्र, संपूर्ण महामार्गात पाळधी ते खोटेनगर व पुढे कालिंका माता चौक ते तरसोद फाट्यापर्यंतच्या चौपदरीकरणाचे काय? हा प्रश्‍न कायम आहे. हे चौपदरीकरण होत नसेल तर शहरातून होत असलेल्या चौपदरीकरणाच्या पलीकडे अपघात होतील, असे मानले जात आहे. 
जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर गेल्या काही वर्षांत वाहतूक प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण आणि पर्यायाने त्यात बळी जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. राष्ट्रीय महामार्गावर फागणे- तरसोद व तरसोद- चिखली असे चौपदरीकरण होत असताना जळगाव शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विशेष बाब म्हणून हे काम मंजूर करून त्यासाठी निधीही दिला. कामाचे कार्यादेश होऊन काम सुरू झाले आहे. 

मर्यादित कामाचा परिणाम 
खरेतर जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचा टप्पा खोटेनगर ते कालिंकामाता चौक एवढाच मर्यादित नाही. जळगाव शहराची हद्द बांभोरी पुलापर्यंत व खेडीकडे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत आहे. हा जवळपास 13 किलोमीटरचा टप्पा असताना शहरातील महामार्ग चौपदरीकरण केवळ खोटेनगर ते कालिंका माता चौक या सात किलोमीटरच्या टप्प्यातच होत आहे. 

आर्वजून पहा : ग्रा.प.निधीचे काय झाले, विचारणाऱ्याची...कापली जीभ
 

अपघातांच्या जागा बदलणार 
अपघात टाळण्यासाठी शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. मात्र, ते सात किलोमीटरपर्यंत मर्यादित असल्याने त्यामुळे केवळ अपघातांच्या जागा (accident spot) बदलतील. या सात किलोमीटरच्या टप्प्यात अपघातांचे प्रमाण कमी होणार असले तरी त्या पुढे काय? असा प्रश्‍न कायम आहे. 

दोन टप्प्यांचे भवितव्य अंधारात 
संपूर्ण राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण फागणे- तरसोद व तरसोद- चिखली असे दोन टप्प्यात होत आहे. फागणे- तरसोद टप्प्यात चौपदरी महामार्ग पाळधीपासून बायपास जात आहे. त्यामुळे जळगाव शहरात जर खोटेनगरपासून चौपदरीकरण होत असेल तर पाळधी ते खोटेनगरपर्यंतचा 7 किलोमीटरचा टप्पा तसेच पुढे कालिंकामाता चौक ते तरसोद फाट्यापर्यंतचा 3 किलोमीटरच्या टप्प्याचे काय? असा प्रश्‍न आहे. 

क्‍लिक कराः  सत्तापालट होऊनही मुख्यमंत्री म्हणून फडणवीस कायम...!
 

या टप्प्यातही वाहतुकीची वर्दळ 
जळगाव- भुसावळ ये-जा करणाऱ्यांची संख्या खूप आहे. तसेच जळगाव शहरातून पाळधीकडे विद्यापीठ, जैन इरिगेशन, त्रिमूर्ती कॉलेज, एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय, पोदार स्कूल तसेच अन्य शैक्षणिक व व्यावसायिक संस्था या परिसरात आहेत. तेथे जाणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात असताना हा रस्ताही चौपदरी होणे आवश्‍यक आहे. असे असताना हे दोन भाग चौपदरीकरणातून सुटल्याने त्या टप्प्यात अपघात वाढू शकतात, असे बोलले जात आहेत. लोकप्रतिनिधींनी या कामांसाठी विशेष प्रयत्न करून मंजुरी आणावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. 

नक्की वाचा : सातपुड्यातील सिकलसेल वर ठोस उपाययोजनांची गरज