गेला डमी ग्राहक...दिला मिसकॉल...मग "हायप्रोफाइल' कुंटणखाना उद्‌ध्वस्त ! 

गेला डमी ग्राहक...दिला मिसकॉल...मग "हायप्रोफाइल' कुंटणखाना उद्‌ध्वस्त ! 

जळगाव ः येथील पिंप्राळा परिसरातील भरवस्तीतील अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यासह पथकाने शनिवारी दुपारी छापा टाकला. या कारवाईत कुंटणखाना मालकिणीसह वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या दोन मुली, तीन महिला व तीन ग्राहकांना ताब्यात घेतले. यात वेश्‍या व्यवसायासाठी कुंटणखाना मालकिणीने बंगाली तरुणी आणल्याचे उघड झाले. भरवस्तीत फ्लॅट घेऊन सुरू असलेल्या या व्यवसायाबाबत शेजाऱ्यांनाही माहिती नव्हती. पोलिसांच्या छाप्यानंतर रहिवाशांसह फ्लॅट मालकास कळाल्यावर त्यांना धक्काच बसला. समाजसेविका असल्याचा बनाव करून ही महिला ठराविक दिवसांनंतर घरे बदलत असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. 

उपअधीक्षक डॉ. रोहन यांना शहरातील पिंप्राळा परिसरातील भवानी मंदिराजवळील तलाठी कार्यालयामागील अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये वेश्‍या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून कारवाईचे नियोजन करून स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहम, महिला उपनिरीक्षक नीता कायटे, सुनील पाटील, दिनेश बडगुजर, विनयकुमार देसले, रवींद्र मोतीराया, अशोक फुसे, छाया मराठे, किशोर राठोड, रमेश जाधव, सुनील दामोदरे, अनिल देशमुख यांनी साध्या वेशात संशयित परिसराला घेरले व डमी ग्राहक तयार करून पंचासमक्ष त्याला तेथे पाठविले. तेथे त्याने खात्री केल्यावर डॉ. रोहन यांना मोबाईलवर मिसकॉल दिला. तद्‌नंतर पथकाने अपार्टमेंटला वेढा घालून फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यावर आत कुंटणखाना मालकिणीसह पाच तरुणी, दोन ग्राहक वेगवेगळ्या खोल्यांमध्ये मिळून आले. 

पाच हजार रुपये भाड्याने घर 
कुंटणखाना मालकिणीकडून पिंप्राळ्यातील उच्चभ्रू रहिवास असलेल्या परिसरात पाच हजार रुपये महिन्याप्रमाणे फ्लॅट, घर भाड्याने घेऊन तेथे सर्रास वेश्‍या व्यवसाय चालविला जात होता. या महिलेने अठरा वर्षांची बंगाली तरुणीही त्यासाठी आणलेली आहे. तिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, येथे मिळून आलेल्या महिला व मुलीकडून मालकीण घरभाडे आणि कमिशन घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडित मुलींना आशादीप महिला वसतिगृहात रवाना करण्यात आले. 

समाजसेवी संस्थेच्या नावे कुंटणखाना 
वेश्‍या व्यवसाय चालविणारी महिला स्थानिक असून, आमची समाजसेवा करणारी संस्था असल्याचे सांगत खोटी माहिती देऊन घरे मिळवत होती. पिंप्राळ्यात पूर्वीही अशा प्रकारे या महिलेने इतर ठिकाणी भाड्याने घरे घेऊन वेश्‍या व्यवसाय चालविल्याची माहिती समोर आली असून, मोठे धेंडही या महिलेच्या संपर्कात असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com