esakal | खानदेशात नऊ नवे रुग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोना'बाधित रुग्णांमध्ये भुसावळ येथील 15 वर्षीय मुलगा, अमळनेर येथील 55 वर्षीय, पाचोरा येथील 56 वर्षीय, तर जळगाव येथील 30 व 57 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.

खानदेशात नऊ नवे रुग्ण 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील "कोरोना'बाधित वृद्धेचा येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी (ता. 29) मध्यरात्री मृत्यू झाला. आजअखेर "कोरोना'बाधित सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तपासणीअंती धुळे जिल्ह्यात आज दिवसभरात आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात धुळे शहरातील दोन, तर डांगुर्णे (ता. शिंदखेडा) येथील एका तरुणाचा समावेश आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आज सहा नवे रुग्ण आढळून आल्याने खानदेशातील आजच्या नव्या रुग्णांची संख्या नऊ झाली आहे. 

नक्‍की पहा - मालेगावात बंदोबस्तावरील जळगावचे दोन पोलिस कोव्हिड पॉझेटिव्ह 


सर्वोपचार रुग्णालयात शहरातील 75 वर्षीय महिला दाखल होती. पूर्वीच तिचा "कोरोना' तपासणीचा अहवाल "पॉझिटिव्ह' आला होता. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती अधिकच बिघडल्याने बुधवारी (ता. 29) रात्री पावणेबाराच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. साक्रीपाठोपाठ सलग धुळे शहरातील "कोरोना'बाधिताचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. 
रुग्णालयात तपासणीअंती आणखी काही अहवाल प्राप्त झाले. त्यात दिवसभरात तीन जणांना "कोरोना'ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यात शिंदखेडा तालुक्‍यातील डांगुर्णे येथील 28 वर्षीय तरुणाचा, तर धुळे शहरातील वडजाई रोडवरील 19 वर्षीय तरुणी, आझादनगर हद्दीतील 25 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील "कोरोना'बाधितांची एकूण संख्या 28 झाली आहे. नवीन तीन "कोरोना'बाधितांचे कुटुंबीय, नातेवाइक व संपर्कात आलेल्यांची माहिती प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. त्यानंतर त्यांची तपासणी केली जाईल. 
 
जिल्ह्यात 28 "पॉझिटिव्ह' 
"कोरोना'बाधित रुग्ण, त्यांचे कुटुंबीय व नातेवाइक, त्यांच्या संपर्कातील लोकांची तपासणी सुरू आहे. 74 जणांची थर्मल स्कॅनिंग झाली. तपासणीनंतर काहींना दाखल करून घेण्यात आले असून, सध्या 57 जण दाखल आहेत. 29 जणांच्या शरीरातील नमुन्यांची तपासणी करून घेण्यात आली. आज सकाळी प्राप्त माहितीनुसार, 39 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आजअखेर पाच हजार 569 जणांचे थर्मल स्कॅनिंग झाले. 794 जणांची नमुने तपासणी झाली. त्यातील 731 अहवाल "निगेटिव्ह', तर 28 अहवाल "पॉझिटिव्ह' आहेत. अधिष्ठाता डॉ. एन. एन. रामराजे, सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी आढावा घेतला. 
 
धुळे शहरात सर्वाधिक 20 
जिल्ह्यात आतापर्यंत धुळे शहरात सर्वाधिक 20 "कोरोना पॉझिटिव्ह' आढळले असून, पैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. यापाठोपाठ साक्री शहरात चार रुग्ण, बाह्मणे, डांगुर्णे (ता. शिंदखेडा) येथे मिळून दोन, आमोदे (ता. शिरपूर) येथील माय-लेकी मिळून दोन, असे 28 रुग्ण आढळले आहेत. साक्रीतील दोघांचाही मृत्यू झाला आहे. धुळे शहरातील ताशा गल्ली, मच्छीबाजार, गजानन कॉलनी, रेल्वेस्थानक परिसरातील रुग्णाचा मृत्यू झाला. साक्री शहरातील 80 वर्षीय वृद्धाचा काल पहाटे आणि काल मध्यरात्री धुळे शहरातील एका वृद्धेचा मृत्यू झाला. 

जळगाव जिल्ह्यात पाच नवे रुग्ण 
जळगाव : येथील जिल्हा रुग्णालयाला आज रात्री जिल्ह्यातील 56 संशयित रुग्णांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून, यापैकी 51 जणांचे अहवाल "निगेटिव्ह' आले आहेत, तर पाच रुग्ण "कोरोना'बाधित आढळून आले आहेत. 
"कोरोना'बाधित रुग्णांमध्ये भुसावळ येथील 15 वर्षीय मुलगा, अमळनेर येथील 55 वर्षीय, पाचोरा येथील 56 वर्षीय, तर जळगाव येथील 30 व 57 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्णांची संख्या 37 झाली असून, यापैकी दहा बाधितांचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण "कोरोना'मुक्त झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे. आता प्राप्त झालेल्या "निगेटिव्ह' अहवालातील 51 पैकी 16 जण हे अमळनेरचे, सहा जण पाचोरा, 4 भुसावळचे, तर उर्वरित जळगावचे आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे. 
 

loading image